Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०२ : शतपत्रे

त्याचे शरीरास सुख होते. म्हणून हा पहिल्या प्रकारचा धर्म झाला; परंतु तसे नाही. पहिल्या प्रकारच्या धर्मास पात्र कोण, याचा विचार केला पाहिजे. शरीराचे पोषणाकरिता धर्म करणे याजवर गरीब व व्यंग यावाचून कोणाचा दावा नाही व त्यामध्ये जाति, नियम वगैरे काही अडचण असू नये. व दुसरे प्रकारचा धर्म जो आहे, जो विद्वानांस मात्र करावा व त्यास कोणतेही प्रकारची काळजी न ठेवता त्यांनी लोकांस ज्ञान सांगावे व लोकांस शहाणे करावे. या प्रकारचे पंतोजी वगैरे धर्माध्यक्ष व उपदेश वगैरे सर्व यास पात्र आहेत. तेव्हा असा धर्म करण्यास भट व पंडित हे पात्र आहेत की काय ? यांस पहिल्या प्रकारचा धर्म करावा, तर हे आंधळे, लंगडे, पांगळे नाहीत. व दुसऱ्या प्रकारचा धर्म करावा, तर यांची योग्यता दुसऱ्यांस शहाणे करण्याची नाही. व यांस काही स्वतः समजत नाही; हे दुसऱ्यांस कसे शिकवतील ? यांस धर्म कळतच नाही. सोदे, लबाड, भडवे, आर्जवी, कुटाळ असतात, त्यांच्याहूनही यांची वर्तणूक बरी नसते, हे सर्वांस प्रसिद्ध आहे. भट हे गृहस्थांचे घरी सर्व वाईट कर्म करतातच. तसेच शास्त्री पंडित आहेत. यांच्या वर्तणुकी बाजीरावाने वाईट कर्म करून उघड केल्या. तेव्हा त्यास धर्म केल्याने हा धर्म कोणत्या प्रकारचा होईल ? अलीकडे एकाने काशीयात्रेस जाताना लाख रुपयांचे जिन्नस, पवित्रके, नथा वगैरे सुवासिनींस व भटास वाटावयाकरिता खरेदी करून बरोबर नेले, व याप्रमाणे सर्व धनवान करतात व लाखो रुपये विष्णुपदावर घालतात व गयावळांस देतात, परंतु हा धर्म होतो की काय ? आळसाची मात्र वृद्धी होते. यापासून फळ काय होते, ते मला समजत नाही. जन्मापासून असे मूर्ख व अज्ञानाने आंधळे लोकांपासून पैसा काढून त्याजवर निर्वाह, काही एक काम न करता, करणारे हे भट व शास्त्री यांस आणखी पैका दिला, तरी त्यांच्या पूर्वीच्या खोडी जातील काय ? त्यांनी काम करावे, उद्योग, प्रयत्न व लोकांची सुधारणा करावी, हे जरूर आहे. हे कदापि समजणार नाहीत. इंग्रजी राज्यात असा धर्म बहुत श्रीमंत लोक कमी झाल्यामुळे बंद जहाला; यास्तव इंग्रज लोकांस ब्राह्मण लोक वाईट म्हणतात; त्यांस दुसरे काही समजत नाही.
 स्वसत्ता गेली व स्वराज्य गेले. हे आपले देशांतील सर्व लोकांस अनिष्ट आहे; इत्यादि स्वदेशाभिमानाच्या गोष्टी त्यांस ठाऊक नाहीत. त्यांस जेवावयास मिळाले, म्हणजे कोणीही राज्य करीत असले, तरी चिंता नाही; त्याची स्तुती करतील; असे हे ब्राह्मण स्वार्थतत्पर आहेत. स्वदेशाचे व इतर जातीचे लोकांविषयी त्यांचे मनात काही येत नाही. फक्त आपले जेवण व मान कमी जहाला, एवढ्याचेच त्यांस दुःख आहे व बाजीरावाने इतके वाईट केले, तरी त्यांस ते अद्याप चांगला