Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २०१

विद्या करणे सोडून दिले. फुकट मिळाल्यावर श्रम कोण करितो ? जुने ग्रंथ पाहून निर्वाह करू लागले. जुने ज्योतिष, जुने वैद्यक, जुने धर्मशास्त्र, हेच संपूर्ण आहे, असे त्यांस वाटू लागले. राजांनी तीच प्रवृत्ती घातली आणि ब्राह्मणांस आळशी केले. जेवणापलीकडे त्यास कर्तव्य राहिलेच नाही. ब्राह्मणाचे हातून विद्यावृद्धी व्हावी व लोकांची सुधारणा व्हावी व जो वतन खातो, त्याचे हातून काम व्हावे, हे कोणाचे लक्ष्यातच नाहीसे झाले. त्यास सुखी ठेवावे आणि त्यांनी आशीर्वाद द्यावा, म्हणजे त्यात सर्व आहे असे समजू लागले व अद्यापि बहुतकरून अडाणी लोक हेच समजतात. आणि या प्रकारचा धर्म करीतात. उद्योगवृद्धी होण्याचा धर्म करीत नाहीत.
 कोणी असा नाही की शाळेकरिता किंवा तारवांत बसून, किंवा देशांतरास जाऊन नाना प्रकारचे पदार्थांचा व लोकांचा शोध करण्याकरिता, किंवा ग्रंथ करण्याकरितां अमुक एक वस्त्र करण्याची वगैरे रीत आहे, ही सुधारण्याकरितां रुपये खर्च केले आहेत. असा एकही पुरुष आढळत नाही; परंतु ब्राह्मणांची लक्षभोजने व सहस्रभोजने तशीच दक्षिणा, तशीच यात्रा, इत्यादिकांत पैसा उधळलेले लोक गावोगाव आहेत. वास्तविक पाहिले, तर, जन्मापासून भट हे धर्माचे खातात; पण करतात काय ? याचा हिशेब कोणी पुसला, तर उत्तर नाही. पूर्वी अहिल्याबाईसारखी धर्मकृत्ये करणारी झाली, तरी तिणे धर्म केला तो व्यर्थ गेला. तिने आपले ज्ञानाप्रमाणे उत्तम केले आणि तिला जे चांगले वाटत होते व तिच्या देशात जे मोठे शहाणे होते, त्यांचे अनुमत पडावयाजोगे तिने सर्व केले. जे तिला ठाऊक नाही, ते होईल कोठून ? असो.
 आम्ही तिला शब्द लावीत नाही, परंतु आजपासून पुढे धर्म करावयाचा तो असाच की काय ? एवढे आम्हास तात्पर्य कळविले पाहिजे. हे लोक समजावयास लागतील तर बरे. व जितके लवकर समजतील तितके चांगले. जो तो धर्म करण्याची इच्छा बाळगितो व हिंदू लोकांप्रमाणे धर्मावर दुसरे लोकांचे चित्त नाही. यास्तव विशेषकरून आम्हास त्यांचे लक्ष्यात ही गोष्ट आणून दिली पाहिजे की ते ज्या गोष्टीस धर्म म्हणतात, तो धर्म खरा आहे की नाही ? अशा प्रकारचा दानधर्म केल्यास ईश्वराजवळ पसंत पडेल की काय ?
 आम्हास वाटते की मूर्खपणाचा धर्म कदापि भगवंतास मान्य होणार नाही. धर्मच्या रीती दोन आहेत. एक गरिबास त्याचे शरीराचे रक्षणार्थ व सुखाकरिता धर्म द्यावा. दुसरा, ज्ञानवृद्धी होण्याकरिता व लोकांस बोध होऊन मन सुधारण्याकरिता धर्म द्यावा. या दोन प्रकारांहून हिंदूचा कोणत्या प्रकारात धर्म आहे बरे ? कोणी म्हणतील की भटास आम्ही जेवावयास घातले, तर