Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २०३

म्हणतात, त्याची स्तुती करतात व त्यांस धर्मप्रभू म्हणतात. तस्मात् या ब्राह्मणांच्या समजुती किती बदलल्या पाहिजेत ! अस्तु.
 आमची सर्व लोकांस विनंती आहे की, आपली प्रतिष्ठा या श्वानरूपी भटांमध्ये मिरवण्याकरिता त्यांस कदापि धर्म करू नये. जो धर्म कराल, त्यांस सत्पात्र आहे, असे पूर्वी लक्षात आणा. एक अगदी भिकारी, दरिद्री लंगडा, पांगळा, रोगादिक प्रारब्धाचे योगाने भिकारी झालेला आणि जर त्याचा काही उपाय चालत नाही, तर त्यांस आसरा द्या. आणि दुसरे, जे पुस्तके लिहितील व लोकांस शहाणे करण्यास मेहनत करतीलव जे वर्तमानपत्रे व ग्रंथ इत्यादी उपयोगी वस्तू छापून प्रगट करतील, त्यांस तुम्ही मोठे विद्वान् व लोकांचे हितकर्ते समजून त्यांस सत्पात्र जाणून धर्म करा; व त्यांचे ग्रंथ घेऊन लोकांमध्ये वाटा व हीच वायने समजा; तीच संक्रांतीची तिळपात्रे, श्रावणीची दीपदाने, माघस्नानाची संपूर्णे, चातुर्मासाची संपूर्णे व तुळशी आणि लाखोल्या त्याच समजा. ज्ञानवृद्धीत पुण्य आहे, असे माना. लाखो लोक अज्ञानी स्थितीत आहेत, त्यांस काहीही कळत नाही. त्यांस ज्ञानी करण्यापेक्षा दुसरा योग्य धर्म कोणता ? यास्तव मरतेसमयी देऊळ बांधावयास सांगू नका; पण नवे छापखाने व नवी पुस्तके करण्यास सांगा. देवळे पुष्कळ आहेत, तितकी पुरेत. हे समजा.

♦ ♦


भिकारी

पत्र नंबर : ९२

 आमचे लोकांत सोवळ्याओवळ्यामुळे अनेक अडचणी पडल्या आहेत. जर ब्राह्मणास एका गावाहून उठून दुसऱ्या गावास जावयाचे आहे, तर किती खटपट केली पाहिजे की, बरोबर भांडी व वस्त्रे घेतली पाहिजेत. कारण की, दुसऱ्या जातीचे येथे जाऊन त्यांचे भांड्यात खाता येत नाही. बरे आणखी कोठे कोठे धर्मशाळा वगैरे नाहीत, म्हणून कोठे जाऊन उतरावे, तर आपला जिन्नस चोरीस जाईल की काय, याचे भय पडते. सर्व गावात फिरून एका ठिकाणाहून लाकडे, दुसरे ठिकाणाहून पीठ असे जमवून आणावे लागते. जर कोणाचे घरी उतरले आणि त्याची जात भिन्न असली, तर त्याचे पाणी उपयोगी