पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८० ]

[माझा जन्मभरचा


तोंपर्यंत तयार झालेला भाग सर्व वाचून दाखविला, तेव्हा अगदी अुडी घातल्यासारखें करून ते म्हणाले, “बस्स, नाटक आमचें झालें. आम्ही तें अुद्यापासून बसविणार. अुरलेला भाग आता वाटेल तेव्हा लिहा. " त्याप्रमाणें त्यांनी तें बसविण्यास सुरुवातहि केली. नंतर शेवटच्या प्रवेशापर्यंत अुरलेला भाग लवकरच त्यांना लिहून दिला. शेवटचा प्रवेश तर खरोखरच पहिल्या रंगीत तालमीच्या दिवशींच दिला ! भारत नाटक मंडळीला माझें हें नाटक मिळालें हें पाहून महाराष्ट्र नाटक मंडळीला सहजच फार वैषम्य वाटलें व तें नाटक आम्हाला द्या असें तेहि म्हणूं लागले. पण भारत मंडळीला देण्याचें कवूल करून त्यांनी तें बसविण्यासहि घेतलें, तेव्हा महाराष्ट्र मंडळीची विनंति मान्य करणें सहजच अशक्य झालें. मात्र माझें नाटक भारत ना. मंडळीला दिलें तें महाराष्ट्र मंडळीचे प्रतिस्पर्धी म्हणून विशेष अुत्तेजन देण्याकरितां किंवा विशेष मदत करण्याकरितां दिलें नव्हतें. कारण वास्तविक माझें व महाराष्ट्र मंडळीचें चांगलेंच सख्य होतें. पण योग तसा आला व देखावाहि विनाकारण तसा दिसला खरा ! यामुळे महाराष्ट्र मंडळीनी मजवर अेक प्रकारचा बहिष्कार, अर्थात् नाटकापुरता, घालण्याचें धोरण स्वीकारले. त्यानंतर तें करण्याचा हक्क ज्या चित्ताकर्षक नाटक मंडळीला दिला तीहि लवकरच नामशेष झाली. आणि मुंबअी, नागपूर विद्यापीठांतून हें नाटक बी. अे., अेम्. अे. च्या परीक्षांना ठेवलें जातें, व बहुतेक लोक त्याला माझ्या नाटकांत अग्रस्थान देतात, असें असतां महाराष्ट्र मंडळीनी तें करण्याची अिच्छा पुढे केव्हाही दर्शविली नाही. माझा योगच असा दिसतो की, माझीं नाटकें अप्रसिद्ध कंपन्यांच्या हातीं तरी पडावीं, किंवा ज्या चांगल्या कंपन्यांच्या हातीं तीं पडलीं त्या लवकरच बुडाव्या. कसेंहि असलें तरी, कांही नाटकें चांगलीं असतांहि तीं राहावीं तशीं रंगभूमीवर राहिलीं नाहीत अितकें मात्र खरें.
 (६७) भारत नाटक मंडळीचा स्वभाव प्रथम मला माहीत नव्हता. नाटक मागून घेतांना तर त्यांनी लीनता, आदर, आज्ञाधारकत्व, हौस हीं अितकीं कांही दाखविलीं की बोलून सोय नाही. पण त्यांच्या खऱ्या स्वभावाची परीक्षा नंतर लवकरच झाली. हातीं नवें किंवा चांगलें नाटक नाही. पुण्यास कंपनीचा मुक्काम पडलेला. तेव्हा कसें तरी नवें नाटक पुढे आणून