स्वरांत/मृत्यूव पथे

विकिस्रोत कडून




मृत्यूव पथे

 आभाळ कोसळून जावं, नि मग आकाशाचा रेशमी पोत मंदपणे झुलत राहावा तसं मन, निरभ्र सुस्नात.
 असीम एव्हाना दूर पोचला असेल. कदाचित पोलिसांच्या गोळयांनी छिन्नभिन्न होऊन चिखलात पसरला असेल. सारे प्रसंग कसे स्वच्छ आठवताहेत.
 मनीष परवाच कलकत्त्याला गेला आहे. पैसे आणायचेत. शिवाय बरीन् चा खून कुणी केला त्याचे धागेही शोधायला हवेत.
 ...आठ दिवसांपूर्वीच बरीन् आला होता. या वेळी फार बोलला. खूप थकलेला, तळापासून उखडून आलेला, असा.
 "रीनादी, आज या क्षणी वाटतयं, सारं व्यर्थ आहे. कैक खून केले. रक्तानं हातमाखून घेतले. शत्रू निपटून काढला की क्षणभर वाटायचं, आपण जिंकलो ... पण क्षणभरच ! मग पुन्हा पाठलाग चुकवीत अखंड धावणं. प्रत्येक क्षण मृत्यूच्या जवळिकेचा.
 " असं वणवण भटकताना मन अतृप्तच राहिलं. दिदी, गेल्या सहा वर्षांत निवान्त मनानं पोटभर भातही खाल्ला नाही मी. कुणास ठाऊक, या जन्मी तरी ..."
 बोलताना तो मध्येच थांबला होता. आणि मग अचानक भरती यावी तसं बोलला होता-
 "परवा कलकत्त्याला शामली दिसली होती. काही क्षण असे येतात, की तनमन पेटून निघतं. वाटतं, सारं सोडून द्यावं. पुन्हा एकदा समाजाच्या चौकटीत स्वतःला झोकून द्यावं. पण सारे रस्ते माझ्यासाठी बंद आहेत. समोर आहे फक्त एकच रस्ता- "
 आणि एक दिवस बरीन् मरून पडला. अतृप्त ... असहायसा.
 क्रांतीच्या कल्पनेनं, नव्या राज्याच्या कल्पनेनं तिचंही मन इतके दिवस बेभानून जायचं.
 अलीकडे वाटायचं, सारं खोटं आहे.
फोल आहे. पण मनीषच्या मागे फरफटत जाण्याशिवाय दुसरा मार्ग कुठं होता?
 " इथली माणसं मेलेलीच जन्मतात रे ! त्यांची मनं रक्ताच्या रंगानी पेटतील असं वाटतं तुला ? "
 " चल सारं सोडून. पाटोलला जाऊ. शेती पाहू. मला एक घर हवं आहे. आणि एक इवलंसं ..." ती एक दिवस मनीषला म्हणाली होती. पण तिचे शब्द तोडीत मनीषनं कळवळून सांगितलं होतं, " रीना, प्लीज हळू बोल. सारे विचार मनात पुरून टाक. भिंतीनं जरी हे ऐकलं तरी आपली प्रेतं गिधाडांपुढं पडतील. आय स्टिल बिलीव्ह मिन् माओ... अवर चेअरमन.
 'पण तुझं हे असलं मरणही मी सोसू शकणार नाही."
 बरीन् गेल्यापासून वाटतं, प्रत्येक क्षण कल्पान्ताचा आहे. तो आकंठ भोगून घ्यावा. हातात गच्च पकडून ठेवावा.
 गेले तीन दिवस पाऊस कोसळतोय. पाण्याचे प्रचंड लोट झोपडीच्या खालून वाहून जाताहेत. खेड्यातली घरं तशी दूरच; पण हे त्याहूनही दूर. शाळाही लांब पडते. पण खूपच सोयीचं. रात्रीअपरात्री येणाऱ्यांना सुरक्षित आसरा देणारं. चारीखांबावर तोललेलं घर पाऊस माथ्यावर झेलीत, मातीत घट्ट रोवून बसलंय. गेले दोन दिवस कुठली शाळा नि कुठलं काय ! तिला आठवतं, शाळेतल्या मागांवर शाली अर्धवट विणून पडल्या आहेत. त्या भिजल्या नाहीत म्हणजे मिळवली.
 शारदानं सुंदर वेलबुट्टी विणलीय शालीवर. येत्या दिवाळीला ती सत्येन् ला शाल देणार आहे. सांगताना केवढी लाजत होती. शालीचा भिजून चिखल झाला तर किती दुःखी होईल शारदा !
 ' हे भगवान्, सारे माग सुरक्षित राहू देत.'
 ती मनोमन परमेश्वराची आळवणी करते.
 दुसऱ्याच क्षणी तिला स्वतःचं हसू येतं. रीना... आणि परमेश्वराची प्रार्थना करणार ?
 परमेश्वराची कल्पना प्रस्थापितांनी आपल्या सोयीसाठी आणली असं सांगणाऱ्या आपण...
 जंगलखोऱ्यातून काम करणाऱ्यांना हक्काचा आसरा मिळावा म्हणून दूर आसामात येणाऱ्या आपण...
 संघटनेनं आदेश दिला म्हणून केवळ सोयीसाठी मनीषशी विवाह करणाऱ्या आपण...
 दिवसभर मास्टरदी बनून मुलांना शिकवायचं नि रात्री पत्रं टाईप करायची. कधी बरीन् नाहीतर ज्योतिर्मयसारख्यांना निवान्तपणे लपवून ठेवायचं, यात गुंतणाऱ्या आपण...
 आणि आज, परमेश्वराची प्रार्थना करणाऱ्या आपण. तिला स्वतःचं हसू येतं. पण तरीही मनात कुठंतरी निवांत वाटतं. खूप निवांत.
  
 'कालची रात्र. सगळीकडे भरून राहिलेला पावसाचा आवाज. पडत्या पावसाची खर्जातली धिमी लय. वाहत्या पाण्याची ओढाळ लय. आणि एकाकी दीर्घ रात्र.
 इतक्यात शिडीवर पावलं वाजली होती. तिला वाटलं, मनीष आला असणार. तिनं लगबगीनं कडी उघडली. विजेच्या झोतासारखा तो आत आला, नि झटकन् दार लावून घेतलं. कंदिलाची वात कमी केली.
 रेनकोटवर चिखलाचे ओघळ. केसांतून निथळणारं पाणी आणि डोळ्यात वादळ.
 तो असीम होता.
 "बस. कॉफी आणते."
 "कडक कर. खूप कडक.' असं म्हणत त्यानं कोट काढला नि कोपऱ्यात भिरकावला.
 गादीवर तो अस्ताव्यस्त बसला होता. मागच्या उशीवर मान झोकून दिली होती. डोळे मिटलेले. त्या बंद डोळयांतून कुठलंतरी काहूर धुमसतंय हे तिला दिसत होतं.
 असीमला जायफळ घातलेली कॉफी फार आवडते. डबीतून तिनं जायफळाचा तुकडा काढला. पदरात धरून दाताखाली दाबला, नि कॉफीत टाकला. कॉफीच्या गंधानं त्याला तरतरी आणली.
 "रीनू, मला कॉफीत जायफळ आवडतं हे लक्षात आहे तुझ्या अजून ? अशी कडक कॉफी दे की खूप गाढ झोप यावी वाटतं, गाढ झोपेत कायमचं बुडून जावं. कधीही जागं न होण्यासाठी."
 "छी... छी... असीम !" असं म्हणत तिनं त्याच्या ओठांवर हात ठेवला होता.
 तिचा हात बाजूला काढीत त्यानं विचारलं होतं,
 "रीनू, खरंच तुला असं वाटतं का की मी मरू नये? गिधाडांनी माझं सडलेलं प्रेत विचकू नये? देन् आय मस्ट थँक गॉड-"
 तिनं हात सोडवून घेतला होता, आणि ती भात टाकायला उठली होती.
 तिच्यासाठीच असीम या वाटेनं आला. त्यांच्या घरासमोरच्या वस्तीत ती राहायची. दिवसभर शाळेत शिकवायची आणि रात्री कॉलेजात जायची. गव्हाळ रंग. तरतरीत, शेंड्याला किंचित उचललेलं नाक, झगमगणारे डोळे, पाठीवरून थेट खाली धावणारा पिंगट जाड शेपटा.
 रेल्वेस्टेशनसमोरच्या त्या झोपडपट्टीत फक्त तीच जीवंत असायची. वस्तीतल्या बायका तिच्या भोवती असायच्या. वस्तीतल्या दादानं गोंधळ घातला तर त्याला जाब विचारण्याची ताकद फक्त हिच्यातच होती. त्या बकाल, बेसहारा वस्तीला तिच्यामुळे टवटवी असायची. पलीकडे झोपड्या. मध्ये रस्ता नि अलिकडे असीमचं टुमदार घर. त्याच्या नळाचं पाणी घेण्यासाठी पहाटे झुंबड उडायची. रोजचा कचकचाट नि भांडणं. काकीमाँ म्हणायची, 'उखडून टाक नळ. रोजची विकतची कटकट.'
 एक दिवस पहाटे डोळा लागला होता. जाग आली रीनाच्या चढेल आवाजानं. तो बाहेर आला नि कावून ओरडला, "रीना, तू तर पढीलिखी आहेस ना? वचावचा भांडणं शोभतं तुला? ओळीनं पाणी घ्याल तर बिघडेल ?"
 "लाईनबाईन तुम्हा बाबू लोकांसाठी! अशा लाइनी लावून बसलो तर लाइनीतच मरावं लागेल." रीनानं झटक्यात उत्तर दिलं होतं.
 येताजाता रीना कुठं दिसते का याचा वेध डोळे आपोआप घ्यायचे. तिच्या जळजळीत कटाक्षांनी लगन आणखीनच वाढायची. ती दिसली नाही तर मन हुरहुरायचं.
 एक दिवस रात्री तो बाहेर आला होता तेव्हाची गोष्ट. त्याच्या घराच्या कडेच्या भिंतीला शिडी लावून एक पोरगा तिच्यावर चढला होता. एका मोठ्या पत्रकाला खळ लावून ते त्याच्या हातात देत होती.
 " अरे एक पत्रक पुरायचं नाही या कोबीच्या गड्याच्या घराला. चांगली चार पाच लाव- " रीना म्हणत होती- खुसखुस हसत होती. पत्रकावर लाल रंगात लिहिलं होतं-
 'आमार चेअरमन माओ.
 माओ चिरायू होवो.
 बाजूला माओचं रेखांकित चित्र.
 तिच्या ओढीनं तो या वाटेला आला. वाटायचं, तिच्या जवळ जाता येईल. गुप्त बैठकांना जायचा. कॅम्पस् ना हळूहळू तिचं आकर्षण फिकट बनत गेलं होतं.
 विचारांचं ... नव्या क्रांतीचं ... उगवत्या राज्याच्या स्वप्नांचं आकर्षण वाढत गेलं. तो पुरा अडकला. आता रीना होती एक निष्ठावंत सहकारिणी.
 आदिवासी, दलित, झोपडपट्टी अशा वस्त्यांतून मनं पेटवीत हिंडायचं. संघटनेच्या शक्तीचं दर्शन म्हणून एखाद्या क्रूर जमीनदाराचा वा कारखान्यातल्या अधिकाऱ्याचा खून पाडायचा. पुन्हा जंगलात दडून बसायचं. पुन्हा खून. पुन्हा सीमेलगतची वणवण. कधी भूतान- तिबेट करीत शस्त्रं आणायची.
 कधीतरी घरही खूप दूर राहिलं होतं. उरला होता सततचा पाठलाग. खुनी प्रत्युत्तरं आणि बंदुकीच्या फैरीचे आवाज. पोलिसांना झुकांड्या देण्यात, प्रस्थापितांची डोकी छाटण्यात मस्त कैफ असायचा. मदिरेचा फेस फसफसून खाली सांडावा तसं मन झिंगून जायचं.
 दहा वर्ष कशी संपली कळलं नाही. या विचारानं पीडलेली माणसं पेटून निघतील असं वाटलं होतं. शतकानुशतकांच्या चौकटी चूर होतीलसं वाटलं होत. पण माणसांची मनं तिथंच, आणि होती तशीच होती. अलीकडे दहशत कमी व्हायला लागली होती. सरकारात उलथापालथ झाली. रोज संघटनेतल्या कुणा ना कुणाचा खून होऊ लागला. गेल्या दोन महिन्यांत वरच्या फळीतले चारजण मारले गेले होते.
 चार दिवसांपूर्वी बरीन् मारला गेला होता. प्रचंड झोताच्या आवेगात सापडावं नि पुढेपुढे लोटलं जावं तसं आयुष्य. घरापासून तुटलेलं !
 नव्या बांगला देशातून शस्त्रं आणताना पाठलाग झाला. मोठ्या मुष्कीलीनं तो इथवर येऊन पोचला होता. त्या चढत्या रात्री.
 "चल भात खाऊन घे -"
 रीनानं त्याला तंद्रीतून जागं केलं.
 मोकळे केस पाठीवर फैलावून रीना त्याला वाढत होती. याच रेशमी केसांची मऊ शाल अंगावर पांघरून झोपण्याचं सुंदर स्वप्न त्यानं फार पूर्वी रंगवलं होतं. आता त्या केसात एखादा सोनेरी केस चमकू लागला होता. तेच धारदार नाक. दाट केस चकमकते डोळे. एक प्रचंड वादळ त्याच्या तनामनातून वाहून गेलं.
 "पोटभर खा, बाबा ! कधी जेवला असशील कुणास ठाळक !" त्याच्या ताटात भात वाढीत रीना म्हणाली होती.
 "रीना, तुझे हे फैलावलेले केस. तुझ्या नजरेतला आग्रह. वाटतंय, एखादं घर तृप्त केलं असतंस. कशाला आलीस या वाटेनं ?"
 " ... मनीष तुला"
 त्याला काहीतरी विचारायचं होतं. तो एकदम गप्प झाला. नि मनापासून जेवू लागला.

 " बरीन् चा खून झाला. तुला कळलं ?
 मनीष कलकत्याला गेलाय." तिनं सांगितलं.
 "हं ..." म्हणत त्यानं हातातला घास पानात टाकला होता-
 " कधीतरी तो जायचाच होता. काल तो ... उद्या मी... परवा मनीष."
 पुन्हा गप्प बसत त्यानं दोन घास खाल्ले होते. आणि पुन्हा आवेगानं बोलू लागला होता.
 " रीना ! पाय, मन, सारं थकलंय. एक सुंदर स्वप्न मनाशी जपलं नि नकळत्या कोवळ्या वयात जाळ्यात अडकलो. तेव्हा ध्यास होता फक्त तुझा. तुझे न्हालेले ओले केस ... भांगातून कपाळावर उतरणारी सिंदुरी रेघ. त्या केसांचा मंद ओलसर गंध माझ्या नाकात दरवळायचा. जिवाला हवी असायचीस तू. फक्त तू.
 "तुला लाल पत्रक लावताना पाहिलं. तुझ्या जवळ यावं, तुझ्या मनात माझ्याविषयी जवळिक निर्माण व्हावी म्हणून या वाटनं आलो.
 " आल्यावर कळलं, तू कधीच मिळणार नव्हतीस. नि परतण्याच्या वाटा विजेरी काटयांनी येताक्षणीच बंद झाल्या होत्या. न संपणारा, क्षितीजहीन"
 आपल्याठी, फक्त आपल्यासाठी असीम घरदार सोडून या वाटेनं आला ह्या जाणीवेनं ती सैरभैर होऊन गेली होती. आजवर जे कधी मिळालं नव्हतं, कधी मागितलं नव्हतं असं काहीतरी विलक्षण हाती यावं आणि अनामिक तृप्तीच्या लाटांनी सारा भूतकाळ झोकाळून जावा तशी ती भारून गेली. त्या क्षणी तिला असीम हवासा वाटला, फार हवासा वाटला.  " एकच इच्छा आहे. आता मरण लवकर यावं. खूप निवान्त व्हायचंय ... एकान्त हवाय मृत्यूच देईल तो-"
 " नाही ... नाही. मी तुला असं अतृप्त मरू देणार नाही. बरीनला शामली हवी होती. सुंदरसं घर हवं होतं. तो तसाच मेला. अतृप्त राहिला ... मी तुला घर देऊ शकणार नाही.
 .... पण माझे हे रेशमी केस ... मी माझं मन. असीम ! आता उशीर नको. मृत्यूच्या वाटेवरून जाताना एका सुंदर स्वप्न सत्यात आकंठ डुंबून घ्यायचंय मला. प्लीज...असीम..."
 असीमचे शब्द तोडीत ती आवेगानं म्हणाली होती. आपल्या घनदाट केसांचा पिसारा त्याच्या अंगावर उधळून तिनं स्वतःला त्याच्या बाहूत झोकून दिलं होतं.
 काल पहाटे असीम निघून गेला.
 असीमचं शरीर तिला आठवत नाही. सतत आठवताहेत दोन तृप्त डोळे. मृत्यूची वाट शोधणारे.
 शिडीवर चाहूल लागते. मनीष आत येतो. त्याच्याही डोळयांत आहे एक उध्वस्त्, भीषण भाव.
 " असीमला पोलिसांनी गाठलं. त्यानं स्वतःच स्वतःच्या अंगावर पिस्तुल झाडून घेतलं. रीना, मलाही वाटतंय की उद्याचा दिवस माझ्यासाठी असेल की नाही !
 "... तुला घर हवं होतं, भुरभुरत्या जावळाचं इवलंसं बाळ हवं होतं. काहीच दिलं नाही मी. द्यावं, द्यायला हवं असं वाटलंच नाही. पतिपत्नीचं नातं जोडलं होतं केवळ सोयीसाठी. पण आज मला तू हवी आहेस. तुझा आधार हवाय."
 असं म्हणत मनीष तिला जवळ ओढतोय. पण रीनाच्या थंड शरीराला आठवत असतात, असीमचे दोन तृप्त डोळे. सरणाच्या वाटेवरून संथपणे जाणारे.

* *