सत्यार्थ प्रकाश/६. पाचवा समुल्लास

विकिस्रोत कडून

पाचवा समुल्लास


वानप्रस्थ - संन्यास

    ब्रह्मचर्याश्रमं समाप्य गृही भवेत्,
    गृही भूत्वा वनी भवेद्वनी भूत्वा प्रव्रजेत्।।-शत. कां. १४।।

मनुष्यांना योग्य आहे की त्यांनी ब्रह्मचर्याश्रम समाप्त केल्यावर गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. तो संपल्यावर वानप्रस्थाश्रम स्वीकारावा व नंतर संन्यास घ्यावा, हे क्रमानुसार आश्रमाचे विधान आहे.

    एवं गृहाश्रमे स्थित्वा विधिवत्स्नातको द्विजः।
    वने वसेत्तु नियतो यथावद्विजितेन्द्रियः।।१।। मनु.अ.६।श्लो.१।

अशाप्रकारे स्नातक अर्अर्थम ब्रह्मचर्य पूर्वक गृहस्थाश्रम करता द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य या द्विजांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. गृहस्थाश्रमात राहून त्यांनी निश्चितात्मा व यथावत जितेंद्रिय बनून आणि वानप्रस्थाश्रमासाठी वनात जाऊन राहावे. ।।१।।

    गृहस्थस्तु यदा पश्येद्वलीपलितमात्मनः।
    अपत्यस्यैव चापत्यं तदारण्यं समाश्रयेत्।।२।। मनु.अ.६।श्लो.२।

जेव्हा गृहस्थाच्या डोक्यावरील केस पांढरे होतात, अंगावरील चामडी ढिली झाल्याने सुरकुत्या पडतात आणि मुलाला जेव्हा मुलगाही झाला तेव्हा त्याने वनात निवास करावा. ।।२।।

    सन्त्यज्य ग्राम्यमाहारं सर्वं चैव परिच्छदम्।
    पुत्रेषु भार्यां निःक्षिप्य वनं गच्छेत्सहैव वा।।३।। मनु.अ.६।श्लो.३।

गावातील सर्व आहार व कपडेलत्ते वगैरे सर्व उत्तमोत्तम वस्तू सोडून देऊन आपल्य पत्नीला मुलांजवळ ठेवून अथवा आपल्या बरोबर घेऊन त्याने वनात जाऊन रहावे. ।।३।।

    अग्निहोत्रं समादाय गृह्यं चाग्निपरिच्छदम्।
    ग्रामादरण्यं निःसृत्य निवसेन्नियतेन्द्रियः।।४।। मनु.अ.६।श्लो.४।

आपल्या गावातून निघताना त्याने सांगोपांग अग्निहोत्र बरोबर घ्यावे व दृढ जितेंद्रिय बनून अरण्यात जाऊन राहावे.।।४।।

    मुन्यन्नैर्विविधैर्मेध्यैः शाकमूलफलेन वा।
    एतानेव महायज्ञान् निर्वपेद्विधिपूर्वकम्।।५।। मनु.अ.६।श्लो.१।

नानाप्रकारचे साहित्यादि अन्न, सुंदर भाज्या, कंदमुळे, फळे, फुले वगैरे अन्नाद्वारे त्याने पंचमहायज्ञ करावेत आणि त्याच अन्नाने अतिथीची सेवा करून त्यानेच आपला निर्वाह करावा.।।५।।

    स्वाध्याये नित्ययुक्तः स्याद्दान्तो मैत्रः समाहितः।
    दाता नित्यमनादाता सर्वभूतानुकम्पकः।।८।। मनु.अ.६।श्लो.८।

स्वाध्यायामध्ये म्हणजे अध्ययन-अध्यापनात सदैव गढून गेलेला, जितात्मा, सर्वांचा मित्र, इंद्रियांचे नित्य दमन करणारा, विद्यादान करणारा, सर्वांवर दया करणारा, कोणाकडून काहीही पदार्थ न घेणारा, असा वानप्रस्थाश्रमी सर्वकाळ राहावे .।।८।।

    अप्रयत्नः सुखार्थेषु ब्रह्मचारी धराशयः।
    शरणेष्वममश्चैव वृक्षमूलनिकेतनः।।२६।। मनु.अ.६।श्लो.२६।

शरीरसुखासाठी फार धडपड करू नये परंतु ब्रह्मचारी अर्थात पत्नी बरोबर असली तरी तिच्याशी वैषयिक व्यवहार करू नये. जमिनीवर झोपावे. आपल्या आश्रित व स्वकीय गोष्टींवर ममता कलू नये. वृक्षाखाली राहावे.।।२६।।

    तपःश्रद्धे ये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्षचर्य्यां चरन्तः।
    सूर्य्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रऽमृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा।।११।। -मुण्ड. खं. २। मं. ११।।

जे शांत व विद्वान लोक वनामध्ये राहून तप व धर्मानुष्ठान करतात, सत्यावर श्रद्धा ठेवून भिक्षावृत्तीचा अवलंब करून वनात राहतील आणि जेथे अविनाशी पूर्ण पुरुष, लाभहिनरहित परमेश्वराचा वास आहे तेथे निर्मळ बनून प्राणाच्या द्वाराने त्या परमेश्वाराला प्राप्त करून घेऊन आनंदित होतात.।।११।।

    अभ्यादधामि समिधमग्ने व्रतपते त्वयि ।
    व्रतञ्च श्रद्धां चोपैमीन्धे त्वा दीक्षितो अहम् ।।२४।। -यजुर्वेदे अध्याये २०। मन्त्र २४।।

वानप्रस्थाश्रमी व्यक्तीला उचित आहे ' मी अग्निमध्ये होम करून, दीक्षित व्रती होऊन, सत्याचरण शव श्रद्धा यांना प्राप्त करून घेईन ' अशी इच्छा मनात बाळगून नाना प्रकारची तपश्चर्या, सत्संग, योगाभ्यास, सुविचाराने ज्ञान व पावित्र्य मिळवावे. त्यानंतर जेव्हा संन्यास घेण्याची इच्छा होईल तेव्हा पत्नीला आपत्याकडून पाठवून द्यावे आणि स्वतः संन्यास घ्याआ. हा संक्षिप्त वानप्रस्थ विधी आहे.

संन्यास विधि

    वनेषु च विहृत्यैवं तृतीयं भागमायुषः।
    चतुर्थमायुषो भागं त्यक्त्वा संगान् परिव्रजेत्।। मनु.अ.६।श्लो.३३।
    अशा प्रकारे वनांमध्ये आयुष्याचा तिसरा भाग, म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षापासून पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत, वानप्रस्थाश्रमात घालवून आयुष्याच्या चौथ्या भागात सर्वसंग परित्याग करून परिव्राट संन्यासी व्हावे.
    (प्रश्न) गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम यांचा स्वीकार न करता ब्रह्मचर्याश्रमातून एकदम संन्यासाश्रमात प्रवेश केदा तर पाप होते किंवा नाही ?
    (उत्तर) होते व होत ही नाही.
    (प्रश्न) असे दुटप्पी उत्तरे कसे देता ?
    (उत्तर) यात दुटप्पीपणा नाही. कारण, जल कोणी बाल्यावस्थेत विरक्त होऊन पुढे विषयवासनेत फसले तर महापापी; आणि जर कोणी तसे गुंतले नाहीत तर ते महापुण्यात्मा सत्पुरूष आहेत.
    यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेद्वनाद्वा गृहाद्वा ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेत ।। जाबालोपनिषद खंड ।।४।।
    हे ब्राह्मण ग्रंथातील वचन आहे. " ज्या दिवशी वैराग्य प्राप्त होईल त्याच दिवशी घराचा अथवा वनाचा त्याग करून संन्यास घ्यावा." प्रथम संन्यासाचा पक्षक्रम या वचनात सांगितला आहे आणि त्यात विकल्प अथवा पर्याय आहे की वानप्रस्थाश्रमात प्रवेश न करता गृहस्थाश्रमातूनच सरळ संन्यास घ्यावा. तिसरा पक्ष असा की जो पूर्ण विद्वान, जितेंद्रिय, विषयवासनांनी रहित परोपकार करण्याची इच्छा बाळगणारा असेल त्याने ब्रह्मचर्याश्रमातूनच संन्यास घ्यावा आणि वेदांमध्येही ‘यतयः ब्राह्मणस्य विजानतः’ इत्यादि मंत्राशयातून संन्यासाचे वर्णन आलेले आहे. परंतु,
    नाविरतो दुश्चरितान्नाशान्तो नासमाहितः।
    नाशान्तमानसो वापि प्रज्ञानेनैनमाप्नुयात्।। -कठन वल्ली २। मं० २४।।

जो दुराचारापासून अलिप्त नाही, ज्याच्या मनाला शांती नाही, ज्याचा आत्मा योगी नाही, ज्याचे मन शांत नाही त्याने संन्यास घेतदा तरीही प्रज्ञानाच्या द्वारे त्याला परभेश्वाराची प्राप्ती होत नाही. म्हणून,

    यच्छेद्वाङ्मनसी प्राज्ञस्तद्यच्छेद् ज्ञान आत्मनि।
    ज्ञानमात्मनि महति नियच्छेत्तद्यच्छेच्छान्त आत्मनि।। -कठन वल्ली ३। मं० १३।।

बुद्धिमान संन्याशाने वाणीला व मनाला अधर्मापासून परावृत्त करावे; व त्यांना ज्ञान व आत्मा यांच्या ठिकाणी लावावे. मग त्या ज्ञानाला व स्वात्म्याला परमात्म्यामध्ये लावावे. अना मार्गाने प्राप्त होणार्‍या विज्ञानाला शांतस्वरूप आत्म्यामध्ये स्थिर करावे.

    परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन।
    तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्।। -मुण्ड० खण्ड २। मं० १२।।

सर्व लौकिक भोगांना कर्माने संचित झाले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणजे संन्याशाला वैराग्य प्राप्त होते. कारण अकृत म्हणजे न केलेले असा परमात्मा कृताने म्हणजे केवळ कर्माने प्राप्त होत नाही. म्हणून त्याने गुरूला अर्पण करण्यासाठी काही पदार्थ हातात घेऊन वेदवित व परमेश्वर यांना जाणणार्‍या गुरूजवळ विज्ञानप्राप्तीसाठी जाऊन त्यांच्याकडून सर्व संदेह दूर करून घ्यावेत. मात्र याकरिता खाली वर्णिलेल्या लोकांची संगत त्याने कायमची सोडावी :-

   अविद्यायामन्तरे वर्त्तमानाः स्वयं धीराः पण्डितम्मन्यमानाः।
    जघंन्यमानाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः।।१।। -मुण्ड० १। खण्ड २। मं० ८।

जे अविद्येत गुरफटलेले असूनही आपण धैर्यवान व पंडित आहोत असे समजतात ते मूढ नीच गतीला प्राप्त होतात जसे आंधळ्यांच्या मागे जाणाऱ्या आंधळ्यांच्या मागे जाणाऱ्या आंधळ्यांची दुर्दशा होते तसे ते दुःख प्राप्त करतात.

    अविद्यायां बहुधा वर्त्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः।
    यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात्तेनातुराः क्षीणलोकाश्च्यवन्ते।।२।। -मुण्ड० १। खण्ड २। मं० ८। ९।।

जे बालीश वृत्तीचे बहुधा अविद्येमध्येच रममाण होणारे असतात आणि तरीही आपण कृतार्थ आहोत असे समजतात, ज्यांना केवळ कर्मकांडी लोक मोहाने मोहित होऊन त्याला समजू अथवा समजावू शकत नाहीत ते मोहातूर होऊन जन्ममरणरूपी दुःखात पडून राहतात. म्हणून,

    वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः।
    ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे।।-मुण्ड० ३ । खण्ड २। मं० ६।।

जे लोक वेदान्त म्हणजे परमेश्वरप्रतिपादक वेदमंत्राचे अर्थज्ञान जाणतात, आणि जे आचरणाने चांगल्याप्रकारे संन्यासयोगाने निश्चितपणे शुद्धांतःकरण संन्यासी बनलेले असतात ते परमेश्वरामध्ये असलेल्या मुक्तीच्या सुखाला प्राप्त होतात. त्या सुखाचा उपभोग घेतल्यानंतर मुक्तीच्या सुखाचा अवधी पूर्ण होतो तेव्हा तेथून सुटून ते जगात परत येतात. मुक्तीखेरीज दुःखाचा नाश होत नाही. कारण,

    न (वै) सशरीरस्य सतः प्रियाप्रिययोरपहतिरस्त्यशरीरं वाव सन्तं न प्रियाप्रिये स्पृशतः।। -छान्दोन.प्रपा.८।खं.१२।व.१

जो देहधारी आहे तो सुख-दुःखाच्या प्राप्तीपासून कधीच वेगळा राहू शकत नाही; आणि जो शरीरहित जीवात्मा मुक्तीमध्ये सर्वव्यापक परमेश्वाराबरोबर शुद्ध होऊन राहतो तेव्हा त्याला सांसारिक सुखदुःखे स्पर्श करीत नाहीत. म्हणून,

    लोकैषणायाश्च वित्तैषणायाश्च पुत्रैषणायाश्चोत्थायाथ भैक्षचर्यं चरन्ति।। -शत० कां० १४।।

लोकांकडून मानसन्मान लाभ, धनदौलतीने अभिलाषा, पुत्रादि भोग किंवा माता यांच्या मोहांपासून दूर राहून संन्यासी लोक भिक्षावृत्तीचा अवलंब करून रात्रंदिवस मोक्षाची साधना करण्यात गढून गेलेले असतात.

    प्राजापत्यां निरूप्येषिंट तस्यां सर्ववेदसं हुत्वा ब्राह्मणः प्रव्रजेत्।।१।। -यजुर्वेदब्राह्मणे।
    प्राजापत्यां निरूप्येष्टि सर्ववेदसदक्षिणाम्।
    आत्मन्यग्नीन्समारोप्य ब्राह्मणः प्रवजेद् गृहात्।।१।। मनु.अ.६।श्लो.३८

प्रजापतीची म्हणजे परमेश्वाराची प्राप्ती व्हावी म्हणून इष्टि म्हणजे यज्ञ करून, त्या यज्ञामध्ये यज्ञोपवीत (जानवे), शिखा(शेंडी) इत्यादी चिह्नांचा त्याग करून, आहवनीय आदी पाच अग्नींचे प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पाच प्राणांमध्ये आरोपण करून ब्रह्म जाणणार्‍या ब्राह्मणाने घरातून बाहेर पडून संन्यासी व्हावे.।।१।।

    यो दत्त्वा सर्वभूतेभ्यः प्रव्रजत्यभयं गृहात्।
    तस्य तेजोमया लोका भवन्ति ब्रह्मवादिनः।।२।। मनु.अ.६।श्लो.३९।

जो सर्व प्राणिमात्रांना अभय देऊन घरातून बाहेर पडतो व संन्यासी बनतो त्या ब्रह्मवादी म्हणजे परमेश्वर प्रकाशित वेदोक्त धर्मादी विद्यांचा उपदेश करणाऱ्या संन्याशाला प्रकाशमय म्हणजे मुक्तीचा आनंद स्वरूप लोक प्राप्त होतो.।।२।।

    (प्रश्न) संन्याशांचा कोणता धर्म आहे ?
    (उत्तर) पक्षपातरहित न्यायाचरण, सत्याचा स्वीकार व अस्त्याचा त्याग, वेदोक्त ईश्वराच्या आज्ञेचे पालन, परोपकार, सत्यभाषण ही सर्वच आश्रमस्थांची लक्षणे असून सर्व मनुष्यमात्राचा धर्म एकच आहे. तरीपण संन्याशाचा विशेष धर्म हा आहे की,
    दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत्।
    सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत्।।१।। मनु.अ.६।श्लो.४६।

जेव्हा संन्यासी रस्त्याने चालत असेल तेव्हा त्याने इकडे तिकडे न पाहता खाली जमिनीकडे नजर ठेवून चालावे; नेहमी वस्त्रातून गाळलेलेच प्यावे, निरंतर सत्य बोलावे; सर्वदा मनाने विचार करून सत्याचे ग्रहण करावे व असत्य सोडून द्यावे.।।१।।

    क्रुद्धयन्तं न प्रतित्रफ़ुध्येदात्रफ़ुष्टः कुशलं वदेत्।
    सप्तद्वारावकीर्णां च न वाचमनृतां वदेत्।।२।। मनु.अ.६।श्लो.४८।

उपदेश किंवा संभाषण-संवाद करताना कोणी संन्याशावर रागावला अथवा त्याची निंदा केली तर संन्याशास आवश्यक आहे की त्याने त्याच्यावर रागावू नये. तथापि नेहमी त्याच्या कल्याणाचाच उपदेश करावा आणि एक मुख, नासिकेची दोन छिद्रे, दोन डोळे आणि दोन कान या सात द्वारांमध्ये विखुरलेल्या वाणीने कधीही कोणत्याही कारणाने खोटे बोलू नये.।।२।।

    अध्यात्मरतिरासीनो निरपेक्षो निरामिषः।
    आत्मनैव सहायेन सुखार्थी विचरेदिह।।३।। मनु.अ.६।श्लो.४९।

त्याने आपला आत्मा व परमात्मा यांच्यात स्थिर होऊन, अपेक्षारहित होऊन मद्यमांसादी वर्ज्य करून, आत्म्याच्याच सहायाने सुखार्थी होऊन या जगात धर्म व विद्या यांची वृद्धी करण्याचा उपदेश करीत सदा फिरत राहावे.।।३।।

    क्लृप्तकेशनखश्मश्रुः पात्री दण्डी कुसुम्भवान्।
    विचरेन्नियतो नित्यं सर्वभूतान्यपीडयन्।।४।। मनु.अ.६।श्लो.५२।

केस, नखे, दाढी व मिशा काढून टाकाव्यात. सुंदर पात्र व दंड घेऊन, कुसुंभादिने रंगविलेली भगवी वस्त्रे धारण करून, स्थिरात्मा होऊन, कोणत्याही प्राण्याला पीडा न देता सर्वत्र संचार करावा.।।४।।

   इन्द्रियाणां निरोधेन रागद्वेषक्षयेण च।
   अहिसया च भूतानाममृतत्वाय कल्पते।।५।। मनु.अ.६।श्लो.६०।

इंद्रियांना अधर्माचरणापासून परावृत करावे, मोह व द्वेष यांचा त्याग करावा. सर्व प्राण्यांशी निर्वैर भावनेने वागून मोक्षप्राप्तीचे सामर्थ्य वाढवित असावे.।।५।।

    दूषितोऽपि चरेद्धर्मं यत्र तत्रश्रमे रतः।
    समः सर्वेषु भूतेषु न लिंगं धर्मकारणम्।।६।। मनु.अ.६।श्लो.६६।

जगामध्ये त्याला कोणी दूषण दिले किंवा त्याचा गौरव केला तरी त्याची पर्वा न करता त्या-त्या आश्रणात असणार्‍या पुरूषाने म्हणजे संन्याशाने सर्व प्राण्यांच्या बाबतीत निष्पक्ष वृत्ती ठेवून स्वतः धर्मात्मा बनावे व इतरांना धर्मात्मा बनविण्याचा प्रयत्न करावा. त्याने आपल्या मनात हे पूर्णपणे ओळखून असावेशकी दंड, कमंडलू व भगवी वस्त्रे वगैरे चिह्ने धारण करणे है काही धर्माचे कारण नव्हे. सर्व मानवांना सत्याचा उपदेश व विद्यादानाने त्यांची उन्नती करणे हे संन्याशाचे प्रमुख कर्तव्य आहे.।।६।।

    फलं कतकवृक्षस्य यद्यप्यम्बुप्रसादकम्।
    न नामग्रहणादेव तस्य वारि प्रसीदति।।७।। मनु.अ.६।श्लो.६७।

कारण, निवळीच्या वृक्षाचे फळ चूर्ण करून गढूळ पाण्यात टाकले असता ते पाणी शुद्ध करते; पण तसे ते पाण्यात न टाकता केवळ नामस्मरण किंवा त्याचे कथन-श्रवण केल्याष गढूळ पाणी कधीही शुद्ध होणार नाही. ।।७।।

    प्राणायामा ब्राह्मणस्य त्रयोऽपि विधिवत्कृताः।
    व्याहृतिप्रणवैर्युक्ता विज्ञेयं परमं तपः।।८।। मनु.अ.६।श्लो.७०।

म्हणून ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञानी संन्याशास उचित आहे की ओंकारपूर्वक, सप्तव्याहृतींनी युक्त, विधिपूर्वक प्राणायाम यदाशक्ती करावेत. मात्र किमान तीन पेक्षा कमी प्राणायाम करू नयेत हेच संन्याशाचे परम तप आहे.।।८।।

    दह्यन्ते ध्मायमानानां धातूनां हि यथा मलाः।
    तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात्।।९।। मनु.अ.६।श्लो.७१।

कारण ज्याप्रमाणे अग्नीत तापविल्याने व वितळविल्याने धातूंमधील मळ नष्ट होतो त्याचप्रमाणे प्राणांच्या निग्रहाने मन वगैरे इंद्रियांचे दोष भस्म होतात.।।९।।

    प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्।
    प्रत्याहारेण संसर्गान् ध्यानेनानीश्वरान् गुणान्।।१०।। मनु.अ.६।श्लो.७२।

म्हणून संन्याशांनी नित्येनेमाने प्राणायामांद्वारे आत्मा, अंतःकरण व इंद्रिय यांचे दोष, धारणेद्वारे पाप, प्रत्याहाराच्या योगे संसर्गदोष, ध्यानाद्वारे हर्ष, शोक, अविद्या आदी अनीश्वरी गुणांचा व आत्मासंबंधी अविद्यादि दोषांचा नाश करावा. ।१०।।

    उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयामकृतात्मभिः।
    ध्यानयोगेन सम्पश्येद् गतिमस्यान्तरात्मनः।।११।। मनु.अ.६।श्लो.७३।

अयोगी व अविद्वान यांना समजण्यास अवघड आणि सर्व लहान मोठ्या पदार्थांना व्यापलेल्या परमेश्वाराची व्याप्ती ध्यानयोगाने जाणून घ्यावी आणि आपला आत्मा व अंतर्यामी परभेश्वर यांची गती जाणावी.

   अहिसयेन्द्रियासंगैर्वैदिकैश्चैव कर्म्मभिः।
   तपसश्चरणैश्चोग्रैस्साधयन्तीह तत्पदम्।।१२।। मनु.अ.६।श्लो.७५।

सर्व भूतांशी निर्वैर होणे, इंद्रियांच्या वाईट विषयवासनांचा त्याग करणे, वेदोक्त कर्मे आणि अत्यंत उग्र तपश्चर्येने पूर्वोक्त जगामध्ये राहून संन्याशीच मोक्षाची प्राप्ती करतात व करवितात. इतरांना ते शक्य नाही.।।१२।।

   यदा भावेन भवति सर्वभावेषु निःस्पृहः।
   तदा सुखमवाप्नोति प्रेत्य चेह च शाश्वतम्।।१३।। मनु.अ.६।श्लो.८०।

जेव्हा संन्यासी सर्व भाव म्हणजे सर्व पदार्थांच्या ठिकाणी निःस्पृह, आकांक्षारहित बनतो आणि सर्व बाहेरच्या व आंतरिक व्यवहारांत पवित्र भावना बाळगतो तेव्हाच त्याला या देहामध्ये व मरणानंतर शाश्वत सुख प्राप्त होते.।।१३।।

    चतुर्भिरपि चैवैतैर्नित्यमाश्रमिभिर्द्विजैः।
    दशलक्षणको धर्मः सेवितव्यः प्रयत्नतः।।१४।। मनु.अ.६।श्लो.८१।

म्हणून ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी यांना उचित आहे की त्यांनी दहा लक्षणांनी युक्त असलेल्या खालील धर्माचे नित्य पालन करावे.।।१४।।

    धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः।
    धीर्विद्या सत्यमत्रफ़ोधो दशकं धर्मलक्षणम्।।१५।। मनु.अ.६।श्लो.९१।

धर्मची १० लक्षणे

    (१) (धृति) नेहमी धैर्य बाळगणे. (२) (क्षमा) निंदा-स्तुती, मानापमान, हानी-लाभ, इत्यादि दुःखांमध्ये सहनशील राहणे. (३) (दम) मनाला सदैव धर्माचरणासाठी प्रवृत्त करणे आणि अधर्मापासून परावृत्त करणे. अधर्माचरणाची इच्छाच मनात निर्माण होऊ नये. असे करणे. (४) (अस्तेय) चौर्य कर्म त्याग अर्थात मालकाच्या परवानगी शिवाय छल, कपट, विश्वासघाताने, कोणताही व्यवहार करून, वेदाविरूद्ध उपदेश करून दुसर्‍याच्या वस्तूंचा अपहार करणे ही चोरी होय. चोरी न करणे हेच अस्तेय होय. (५) (शौच) रागद्वेष व पक्षपात सोडून अंतःशुद्धी करणे आणि पाणी, माती, मार्जन इत्यादींद्वारे बाह्य पावित्र्य ठेवणे. (६) (इंद्रियनिग्रह) इंद्रियांना अधर्माचरणापासून परावृत्त करून त्यांना धर्माच्या मार्गाने चालविणे. (७) (धीः) मादक द्रव्ये, इतर बुद्धिनाशक पदार्थ, दुष्टांची संगत, आळस, प्रमाद आदी दोषांचा त्याग करून; श्रेष्ठ पदार्थांचे सेवन व सज्जनांची संगती, योगाभ्यास, धर्माचरण, ब्रह्मचर्य आदी शुभ कर्मांनी बुद्धीचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे. (८) ( विद्या) पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत असणाऱ्या सर्व पदार्थांचे यथार्थ ज्ञान मिळविणे आणि त्यापासून यथायोग्य उपकार करून घेणे. सत्य जसे आत्म्यात असेल तसे ते मनात आणणे, जसे सत्य मनात असेल तसेच ते वाणीने व्यक्त करणे, वाणीमध्ये जे सत्य असेल तेच आचरणात आणणे, ही विद्या होय, याहून जी विपरीत ती अविद्या होय. (९) (सत्य) जो पदार्थ जसा असेल त्याला तसाच समजणे, तसेच बोलणे व तसेच करणे म्हणजे सत्य होय. (१०) (अक्रोध) क्रोधादी दोषांचा त्याग करून शांतता वगैरे गुणांचे ग्रहण करणे, ही धर्माची दहा लक्षणे आहेत. या दशलक्षयुक्त, पक्षपातरहित, न्यायाचरण युक्त धर्माचे पालन चारही आश्रमातील लोकांनी करावे. आणि या वेदोक्त धर्मानुसार स्वतः आचरण करणे आणि इतरांना समजावून सांगून आचरण करण्यास प्रवृत्त करणे हा संन्याशांचा विशेष धर्म आहे.।।१५।।
    अनेन विधिना सर्वांस्त्यक्त्वा संगाञ्छनैः शनैः।
    सर्वद्वन्द्वविनिर्मुक्तो ब्रह्मण्येवावतिष्ठते।।१६।। मनु.अ.६।श्लो.९२।

अशा प्रकारे हळूहळू सर्व संगदोष टाळून हर्षशोकादि द्वंद्वातून मुक्त होऊन संन्यासी ब्रह्मामध्ये अवस्थित होतो. संन्याशांचे मुख्य कर्तव्य हेच आहे की त्यांनी सर्व गृहस्थादी आश्रमांतील लोकांना सर्व प्रकारच्या सत्य व्यवहाराचा निश्चय करुन अधार्मिक व्यवहारांपासून परावृत करून त्यांच्या सर्व संशयांचे निराकरण करून आणि त्यांना सत्यधर्मयुक्त व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे.।।१६।।

    (प्रश्न) संन्यास ग्रहण करणे हा ब्राह्मणांचाच धर्म आहे की क्षत्रियादिकांचाही आहे?
    (उत्तर) संन्यासाचा अधिकार ब्राह्माणालाच आहे. कारण जो सर्व वर्णामध्ये पूर्ण विद्वान, धार्मिक, परोपकारप्रिय असतो त्यालाच ब्राह्मण असे म्हणतात. पूर्ण विद्ये व्यतिरिक्त धर्म व परमेश्वरावर  निष्ठा व वैराग्य या गोष्टी नसतील तर तशा माणसाने संन्यास घेतल्याने त्यापासून जगाचे काही विशेष भले होऊ शकत नाही. म्हणून लोकोक्ति आहे की ब्राह्मणालाच संन्यासाचा अधिकार आहे. इतरांना नाही, या बाबतात मनुचे है प्रमाण सिद्ध आहे.
    एष वोऽभिहितो धर्मो ब्राह्मणस्य चतुर्विधः।
    पुण्यऽक्षयफलः प्रेत्य राजधर्म निबोधत ।। मनु.अ.६।श्लो.९७।
    मनु महाराज म्हणतात की, " है ऋषिंनो ! ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम स्वीकारणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. त्यांपैकी संन्यासधर्म हा (साद्यंत) पुण्यस्वरुप असून मृत्यूनंतर मोक्षरुपी अक्षय आनंद देणारा आहे. यानंतर धर्म माझ्याकडून ऐका." यावरुन असे सिद्ध होते की संन्यास घेण्याचा अधिकार मुख्यतः ब्राह्मणांना आहे आणि ब्रह्मचर्याश्रमादी इतर तीन आश्रमांचा अधिकार क्षत्रियादिकांना आहे.
    (प्रश्न) संन्यासग्रहणाची काय आवश्यकता असते ?
    (उत्तर) ज्याप्रमाणे शरीरामध्ये मस्तकाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आश्रमांमध्ये संन्यासाश्रमाची आवश्यकता असते. कारण त्या आश्रमावाचून विद्या व धर्म यांची उन्नति होऊ शकत नाही. इतर आश्रमांमध्ये विद्याग्रहण, गृहकृत्ये, तपश्चर्या आदी त्या त्या आश्रमांतील कामे करावी लागत असल्यामुळे सवड फार कमी मिळते. निःपक्षपाती वर्तन ठेवणे इतर आश्रमांमध्ये अवघड असते. संन्यासी जसा सर्वतोमुक्त होऊन जगावर उपकार करतो तसा इतर आश्रमातील मनुष्य करू शकत नाही. कारण संन्याशाला सत्यविद्यांच्या योगे पदार्थांच्या विज्ञानाची उन्नती करण्यास जितका वेळ मिळतो तितका इतर आश्रमातील व्यक्तीला मिळू शकत नाही. परंतु जो ब्रह्मचर्याश्रमातून संन्यासी होऊन जगाला सत्याचे शिक्षण देऊन जगाची जेवढी उन्नती करु शकतो तेवढी गृहस्थ अथवा वानप्रस्थ या आश्रमांतून संन्यासश्रमात प्रविष्ट होणारा करू शकत नाही.
    (प्रश्न) संन्यास घेणे हे ईश्वरी इच्छेच्या विरूद्ध आहे. कारण ईश्वराचा अभिप्राय माणसांची संख्या वाढ करण्यात आहे. माणसांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला नाही तर मुलेंच जन्माला येणार नाहीत. जर आपण संन्यासाश्रम हाच मुख्य आहे असे मानले आणि सर्व लोक संन्यासी बनले तर मानवजातीचा निर्वंश होईल ?
    (उत्तर) ठीक आहे. लग्न करूनही अनेकांना मूल होत नाही किंवा मुले झाल्यावर लहानपणीच मरून जातात. म्हणून कार अशा लोकांनी ईश्वरी इच्छेच्या विरूद्ध वागणारे म्हणावयाचे ? यावर तुम्ही म्हणाल की, " एका कवीचे वचन आहे की, ‘यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः’ म्हणजे प्रयत्न केल्यावरही कार्यसिद्ध झाली नाही तर त्यात कर्त्याचा काय दोष ? अर्थात काहीही नाही." यावर आम्ही तुम्हाला विचारतो की गृहस्थाश्रमामध्ये पुष्कळ मुले झाली आणि ती विरूद्धाचरणाने आपापसात भांडून मरुन गेली तर ती केवढी मोठी हानी होते ! एकमेकांच्या समजुतींमध्ये विरोध निर्माण झाला की भांडणे पुष्कळ होतात. जेव्हा एखादा संन्यासी वेदोक्त धर्माचा उपदेश करून परस्परांमध्ये प्रेमभाव निर्माण करील तेव्हा लाखो माणसांना वाचवू शकेल. असा संन्यासी हजारो गृहस्थ सदृश माणसाची उन्नती घडवून आणतो. शिवाय सर्व माणसे संन्यास घेऊच शकणार नाहीत. कारण सर्वांची विषयासक्ती कधीच नष्ट होणार नाही. जे लोक संन्याशांच्या उपदेशाने धर्मपरायण बनतात ते सगळे जणू त्यांचे पुत्र तुल्य आहेत.
    (प्रश्न) संन्यासी असे म्हणतात की आम्हाला कशाशी काही कर्तव्य नाही. अन्न, वस्त्र घेऊन मजेत राहावे, एवढेच आम्हाला माहीत. अविद्यारुपी जगाच्या बाबतीत डोकेफोड कशाला करायची ? आम्ही स्वतःला ब्रह्म समजून संतुष्ट राहतो. कोणी येऊन विचारले तर त्यालाही आम्ही असाच उपदेश करावा की, " तूही ब्रह्म आहेस. तुला पापपुण्य लागत नाही. कारण शीत व उष्ण यांची जाणीव होणे हा शरीराचा, क्षुधा व तृष्णा हा प्राणाचा आणि सुख-दुःख हा मनाचा धर्म आहे. जग मिथ्या असून जगातील सारे व्यव्हारही काल्पनिक म्हणजे खोटे आहेत. म्हणून शहाण्यांनी त्यात गुंतणे योग्य नव्हे. जे काही पापपुण्य घडते तो देहाचा व इंद्रियांचा धर्म आहे, आत्म्याचा नव्हे." अशा प्रकारचा उपदेश हे संन्यासी करतात. परंतु तुम्ही ज्या संन्यासाश्रमाच्या धर्माविषयी सांगत आहात तो अगदीच विलक्षण दिसतो. अशा वेळी आम्ही कोणाचे म्हणणे खरे मानावे आणि कोणाचे खोटे मानावे ?
     (उत्तर) त्यांना चांगली कृत्ये देखील कर्तव्य नसतात काय ? मनु महाराजांनी तर लिहिले आहे की, ‘वैदकैश्चैव कर्मभिः’ म्हणजे वैदिक कर्मे ही धर्मयुक्त सत्य कर्मे असतात. ती संन्याशांनीही अवश्य केली पाहिजेत. भोजन, आच्छादन वगैरे कर्मे ते टाळू शकतात काय ? जर ही कर्मे सुटू शकत नसतील तर उत्तम कर्मे सोडल्याने ते पतित व पापभागी होणार नाहीत काय ? हे संन्यासी गृहस्थांकडून अन्नवस्त्रादी घेतात. त्यांच्या त्या उपकाराची परतफेड करीत नाही तर ते महापापी होणार नाहीत काय ? जसे डोळ्यांनी दिसत नाही व कानांनी ऐकू येत नाही तर डोळे व कान असून नसल्यासारखेच असतात. याच प्रमाणे जे संन्यासी सत्योपदेश आणि वेदादी सत्यशास्त्रांचा विचार, प्रचार करीत नाहीत तर तेही या जगात व्यर्थ, भाररूप आहेत.
    आणि अडाणी लोकांशी डोकेफोड कषाला करायची, असे लिहिणारे व सांगणारे तसा उपदेश करणारेच खोटारडे व पाप वाढविणारे पापी आहेत. जे काही शरीरादिकाकडून कर्म केले जाते ते सर्व आत्म्याचेच असते व त्याचे फळ भोगणाराही आत्माच आहे.
    जे जीवाला ब्रह्म प्रतिपादन करतात ते अविद्यारूपी निद्रेत गुंग झालेले असतात. कारण जीव हा अल्प व अल्पज्ञ असतो आणि ब्रह्म हे सर्व व्यापक व सर्वज्ञ आहे. ब्रह्म नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभावयुक्त आहे. जीव हा कधी बद्ध तर कधी मुक्त राहतो. ब्रह्म हे सर्वव्यापक, सर्वज्ञ असल्यामुळे त्याला कधी भ्रम अथवा अविद्या होऊ शकत नाही. जीवाला मात्र कधी विद्या तर कधी अविद्या प्राप्त होते. ब्रह्म हे जन्म मरण व दुःख यांच्या फेर्‍यात कधी अडकत नाही परंतु जीव मात्र त्या फेर्‍यात अडकतो. म्हणून त्यांचा तो उपदेश खोटा आहे.
    (प्रश्न)'संन्यासी सर्वकर्मविनाशी' असतात आणि ते अग्नी व धातु यांना स्पर्श करीत नाहीत. ही गोष्ट खरी आहे की नाही ?
    (उत्तर) नाही, 'सम्यङ् नित्यमास्ते यस्मिन् यद्वा सम्यङ् न्यस्यन्ति दुःखानि कर्माणि येन स संन्यासः, स प्रशस्तो विद्यते यस्य स संन्यासी '।

जो ब्रह्म व त्याची आज्ञा यांमध्ये उपविष्ट म्हणजे स्थित असतो, जो दुष्ट कर्मांचा त्याग करतो, ज्याचा स्वभाव उत्तम असतो त्याला संन्यासी म्हणतात. यात सत्कर्म कर्ता व दुष्कृत्यांचा विनाश करणारा संन्यासी म्हटला जातो.

      (प्रश्न) अध्यापन व उपदेश तर गृहस्थही करतात. मग संन्याशाची काय गरज ?
      (उत्तर) सर्वचआश्रमांतील लोकांनी सत्याचा उपदेश करावा व ऐकावा. परंतु जितकी सवड व निष्पक्षता संन्याशाजवळ असते तितकी गृहस्थांजवळ नसते. होय ! जे ब्राह्मण आहेत त्यांचे काम आहे की त्यांच्यातील पुरूषांनी पुरूषांना व स्त्रियांनी स्त्रियांना सत्याचा उपदेश करावा व शिकवावे. सर्वत्र भ्रमण करण्यासाठी आवश्यक असणारी सवड संन्याशाना जेवढी मिळते तेवढी गृहस्थ ब्राह्मणादिकांना कधीही मिळू शकत नाही. ब्राह्मणांनी वेदविरूद्ध आचरण केले तर त्यांचे नियंत्रक संन्यासी असतो. म्हणून संन्यासी असणे उचित आहे.
    (प्रश्न) ‘एकरात्रिं वसेद् ग्रामे.’ इत्यादी वचनानुसार संन्याशाने एके ठिकाणी फक्त एकच रात्र राहावे, जास्त राहू नये. हे योग्य आहे काय ?
    (उत्तर) ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे की संन्यासी एकाच ठिकाणी राहू लागला तर त्यामुळे जगाचे अधिक कल्याण होणार नाही. उलट एकाच जागी राहिल्यामुळे त्या स्थानाविषयी मनात अभिमान निर्माण होतो व आसक्ती, द्वेष होतात. एके ठिकाणी राहिल्याने लोकांवर विशेष उपकार होत असेल तर राहावे. जसे पूर्वी जनक राजाकडे पंचशिखादी अन्य संन्यासी चार-चार महिने राहत असत व इतर काही संन्यासी अनेक वर्षे राहिले होते. एका जागी जास्त काळ राहू नये, ही गोष्ट आजकालच्या पाखंडी सांप्रदायिकांनी बनविली आहे.  कारण संन्यासी एका जागी अधिक राहिला तर आजचा पाखंड खंडित होईल आणि पाखंडाची अधिक वाढ होणे शक्य नाही.
     (प्रश्न) यतीनां काञ्चनं दद्यात्ताम्बूलं ब्रह्मचारिणाम् ।
             चौराणामभयं दद्यात्स नरो नरकं व्रजेत् ।।

इत्यादी वचनांचा आशय असा आहे की संन्याशांना सुवर्णाचे दान देणारा दाता नरकात जातो असे सांगितले आहे. त्याचा अर्थ काय ?

     (उत्तर) ही गोष्ट देखील वर्णाश्रमविरोधी सांप्रदायिक व स्वार्थसाधू पौराणिकांनी कल्पिलेली आहे. कारण त्यांना अशी भीती वाटते की संन्याशांना धन मिळाल्यास ते आमच्या देखील पुष्कळशा सिद्धांतांचे खंडन करतील, त्यामुळे आमची हानी होईल; आणि ते आमच्या कह्यात देखील राहणार नाहीत आणि जेव्हा मूर्ख व स्वार्थी लोकांना दान देणे चांगले समजले जाते, तेव्हा विद्वान व परोपकारी संन्याशांना दान देण्यात कसलाही दोष होऊ शकत नाही ! पाहा !
    विविधानि च रत्नानि विविक्तेषूपपादयेत् ।। मनु.अ.११।श्लो.६
      नाना प्रकारची रत्ने व सुवर्णादी धन (विविक्तांना) म्हणजे संन्याशांना द्यावे, असे या श्लोकात सांगितले आहे. हा श्लोकही निरर्थक आहे. कारण संन्याशाला सुवर्ण दाऑ केल्यास यजमान नरकात जात असेल तर चांदी, मोती, हिरे वगैरे दिल्याने तो स्वर्गात कसा जाणार ?
      (प्रश्न) पंडितजी हा पाठ बोलताना विसरून गेले. तो मुळात असा आहे की, 'यतिहस्ते धनं दद्यात्', म्हणजे जो संन्याशांच्या हातात धन देतो तो नरकाला जातो.
     (उत्तर) हे वचनही कुणातरी अडाण्याने कपोलकल्पनेने रचलेले आहे. कारण हातात धन दिल्याने दाता नरकात जात असेल तर त्याने ते त्याच्या पायावर ठेवले अथवा गाठोड्यात बांधून दिले म्हणजे तो स्वर्गाला जातो काय ? म्हणून असल्या कल्पनांवर विश्वास ठेवू नये. होय ही गोष्ट खरी आहे की संन्यासी योखक्षेमासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीपेक्षा जास्त काही स्वतःजवळ ठेवील तर त्याला चोरांपासून त्रास होईल आणि त्या द्रव्याचा मोहही त्याला पडेल. परंतु जो विद्वान असेल तो अयोग्य व्यवहार कधी करणार नाही अथवा मोहामध्ये फरणार नाही. कारण त्याने प्रथम गृहस्थाश्रमात अथवा ब्रह्मचर्याश्रमात सर्व काही भोगलेले किंवा पाहिलेले आहे आणि जो माणूस ब्रह्मचर्याश्रमात सरळ संन्यासाश्रमात आलेला असता तो पूर्णपणे वैराग्ययुक्त असल्यामुळे तो कधी केव्हाही असल्या मोहात फसत नाही.
    (प्रश्न) लोक असे म्हणतात की जर श्राद्धामध्ये संन्यासी आले किंवा जेवले तर जेवू घालणाऱ्या पितर पळून जातात व नरकात पडतात.
      (उत्तर) मुळात मेलेल्या पितरांनी येणे आणि श्राद्धात दिलेले अन्न त्यांना पोहचणे ही गोष्ट असंभव, वेदविरूद्ध व तर्कदुष्ट असल्याने खोट्याच आहेत आणि जे येतच नाहीत ते पळून तरी कसे जाणार ? ईश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे आपापल्या पापपुण्यानुसार जीव मरणानंतर जन्म घेतात तर तेथून ते कसे येऊ शकतील ? म्हणून ही गोष्ट देखील पोटभरू पौराणिक व गोसावी यांनी आपल्या कल्पनेने रचलेली व खोटीच आहे. हो ! संन्यासी जेथे जातील तेथे हे मृतकश्राद्ध करणे वेदादी शास्त्रांच्या विरूद्ध असल्याने, ही गोष्ट लोकांना पटवून देतील. त्यायोगे हे पाखंड नाहीसे होईल.
    (प्रश्न) जो ब्रह्मचर्याश्रमातून संन्यास घेईल त्याला चरितार्थ चालविणे फार अवघड जाईल आणि कामवासना ताब्यात ठेवणेही अत्यंत कठिण आहे. म्हणून गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम यांचा अनुभव घेतल्यानंतर वृद्धापकाळी संन्यास घ्यावा, हे चांगले आहे काय ?
    (उत्तर) ज्याला निर्वाह करता येत नाही व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही त्याने ब्रह्मचर्यातून संन्यास घेऊ नये. परंतु ज्याला आपल्या इंद्रिय विकारांवर ताबा मिळविता येत असेल त्याने तसा संन्यास का घेऊ नये ? ज्या पुरुषाला विषयवासनेचे दोष व वीर्यसंरक्षणाचे गुण समजले आहेत तो कधी विषयासक्त होत नाही. त्याचे वीर्य विचाररूपी अग्नीच्या इंधनासारखे असते. त्यातच ते खर्च होते. वैद्य व औषधे यांची आवश्यकता जशी रोग्याला असते तशी निरोगी व्यक्तीला नसते. याचप्रमाणे ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला विद्येचा व धर्माचा प्रसार करणे व जगाचे कल्याण करणे हेच प्रयोजन आहे असे वाटत असेल त्यांनी विवाह करू नये. उदाहरणार्थ पंचशिखादी पुरूष आणि गार्गी वगैरे स्त्रिया होऊन गेल्या.
     म्हणून अधिकारी ( सुयोग्य ) व्यक्तिंनीच संन्यासी होणे हे उचित होय. जो अनधिकारी पुरूष संन्यास घेईल तो स्वतःही बुडेल आणि इतरांना बुडवतील. ज्याप्रमाणे चक्रवर्ती राजा 'सम्राट' असतो, त्याप्रमाणे संन्याशी 'परिव्राट' असतो. एवढेच नव्हे तर राजाचा सन्मान व सत्कार फक्त त्याच्या देशात स्व संबंधियांकडून केला जातो; पण संन्यासी सर्वत्र पूज्य असतो.
    विद्वत्त्वं च नृपत्त्वं च नैव तुल्य कदाचन ।
    स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।।१।। चा.श.३
     हा चाणक्य नीतिशास्त्रतील श्लोक आहे. विद्वान आणि राजा यांची कधी तुलना होऊ शकत नाही. कारण राजाचा सन्मान व सत्कार फक्त त्याच्या राज्यातच होतो; तर विद्वानाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणून विद्याध्ययन करणे, सुशिक्षण घेणे व बलवान बनणे यांसाठी ब्रह्मचर्याश्रम आणि सर्व प्रकारचे उत्तम व्यवहार सिद्ध करण्यासाठी गृहस्थाश्रम आहे; विचार, ध्यान व विज्ञान यांच्या वृद्धीसाठी व तपश्चर्या करण्यासाठी वानप्रस्थश्रम आहे आणि वेदादी सत्य शास्त्रांचा प्रचार, धार्मिक व्यवहारांचा स्वीकार व दुष्ट व्यवहाराचा त्याग, सर्वांना सत्योपदेश करून निःसंदेह बनविण्यासाठी संन्यासाश्रम आहे. परंतु जे लोक संन्यासाच्या सदैव सत्योपदेश, शंकासमाधन, वेदादी सत्यशास्त्रांचे अध्यापन आणि वेदोक्त धर्माची अभिवृद्धी या गोष्टी प्रयत्नपूर्वक करून जगाची उन्नती केली पाहिजे.
    (प्रश्न) जे संन्यासी नाहीत असे साधू, बैरागी, गोसावी, खाकी, जोगी वगैरे लोकांचा समावेश संन्यासाश्रमात होतो की नाही ?
    (उत्तर) नाही. कारण त्यांच्यात संन्याशाचे एकही लक्षण नाही. ते वेदविरूद्ध मार्गात प्रवृत्त होऊन वेदाहून अधिक आपल्या संप्रदायाच्या आचार्यांची वचने प्रमाण मानतात; आणि आपल्याच पंथाची प्रशंसा करतात. मिथ्या प्रपंचात गुंतून आपल्या स्वार्थासाठी इतरांना आपल्या पंथात ओढून फसवितात. जगाची सुधारणा करणे तर दूरच राहिले; उलट ते लोकांना फसवून अधोगतीला नेतात; आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. म्हणून त्यांची गणना संन्यासाश्रमात करता येत नाही परंतु ते तर पक्के स्वार्थाश्रमी असतात, याऔ मुळीच शंका नाही.
    जे स्वतः धर्माने चालून सार्‍या जगाला धर्माप्रमाणे चालवितात, जे स्वतःबरोबर सार्‍या जगाला इहलोकी म्हणजे या जन्मात आणि परलोकी म्हणजे दुसर्‍या जन्मात स्वर्गाचा म्हणजे सुखाचा उपभोग करतात व करवितात तेच धर्मात्मा, संन्यासी व महात्मा आहेत.
    हे संक्षेपाने संन्यासाश्रमाचे विवेचन केले. यानंतर राजप्रजाधर्माविषयी विवेचन करणार आहोत.

इति श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषते वानप्रस्थसंन्यासाश्रमविषये

पञ्चमः समुल्लासः सम्पूर्ण:।।५।।