सत्यार्थ प्रकाश/१२. अनुभूमिका-१

विकिस्रोत कडून

अकरावा समुल्लास भाग १ उत्तरार्द्ध

अनुभूमिका (१)

    पाच हजार वर्षांपूर्वी वैदिक धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म नव्हता, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. कारण वेदात्त सर्व गोष्टी विद्येने सिद्ध आहेत. वेदांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाभारत युद्ध झाले. वेदांकडे पाठ फिरविल्यामुळे जगात अविद्यारूपी अंधकार पसरला; आणि माणसांची बुद्धी भ्रमिष्ट बनली. ज्याच्या मनात जे आले त्याचाच त्याने पंथ बनविला. या सर्व पंथांमध्ये चार पंथ प्रमुख असून त्यांतून इतर पंथांचा उगम झाला आहे ते पंथ म्हणजे वेद विरुद्ध असलेले पौराणिक मत, जैन, खिस्ती व इस्लामी मत हे होत. हे चार पंथ याच क्रमाने जगात प्रचलित झाले आहेत. या पंथांच्या शाखांची संख्या एक हजाराहून कमी नाही. यास सर्व पंथांचे अनुयायी, त्यांचे चेले व इतर सर्व लोक यांना परस्पर सत्यासत्याचा विचार करण्याच्या बाबतीत अधिक कष्ट पडू नयेत म्हणून, हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. यामध्ये सत्य वैदिक धर्माचे मंडन व असत्याचे खंडन आम्ही स्पष्ट केले आहे. ते सर्वांना कळावे, त्यांनी सत्यासत्याचा विचार करता यावा याकरिता हा ग्रंथ आहे बुद्धिप्रमाणे व विचेच्या आधारे या चार मतांचे मूलग्रंथपाहून मला जे काही समजले ते सर्वासमोर मांडणे हे उत्तम कार्य मी समजतो कारण या मतांच्या प्रचारामुळे विज्ञान वेदांचे ज्ञान पूर्णतः नाहीसे झाले तर ते पुनः सहजासहजी मिळणार नाही. पक्षपात सोडून या ग्रंथाचे वाचन लोकांनी केले तर त्यांना सत्य काय व असत्य काय ते सहज समजेल. त्यानंतर सर्वांना आपापल्या समजुतीप्रमाणे सत्य मताचे ग्रहण करणे व असत्य मताचा त्याग करणे सोपे होईल. यापैकी पुराणादी ग्रंथांतून विविध शाखांच्या रूपाने अनेक पंथ आर्यावर्त्तात प्रचलित झाले आहेत. त्यांचे गुणदोष संक्षेपाने अकराव्या समुल्लासात वर्णन केले आहेत.
    माझे हे काम उपकारक नाही, असे जरी कोणाला वाटले तरी त्यांनी त्याला विरोधही करू नये. कारण माझा हेतू कोणाचे नुकसान करावे अथवा कोणाला विरोध करावा हा नसून सत्यासत्याचा निर्णय करणे व करविणे हा आहे. याचप्रमाणे सर्व लोकांनी न्यायाने वागणे हे अत्यंत उचित आहे. मनुष्याचा जन्म वादविवाद हा विरोध करण्यासाठी नसून सत्यासत्याचा निर्णय करण्यासाठी व करविण्यासाठी आहे. या मतमतांतराच्या वितंडवादाने जगामध्ये ज्या अनिष्ट गोष्टी घडल्या, घडत आहेत व घडतील, त्यांची कल्पना निपक्षपाती विद्वज्जन करू शकतात.
    जोपर्यंत मानवजातीमध्ये प्रचलित एकमेकांविरुद्धचा मिथ्या मतमतांतराचा विरोध संपणार नाही तोपर्यंत सर्वांना आनंद प्राप्त होणार नाही. जर आपण सर्व माणसे व विशेषतः विद्वान लोक ईष्य व द्वेष सोडून देऊन सत्यासत्याचा निर्णय करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करतील व करवतील तर ही गोष्ट असाध्य नाही,



    हे निश्चित आहे की या विद्वानांमधील विरोधामुळेच सर्व लोक विरोधाच्या जाळ्यात अडकले आहेत. जर हे लोक आपल्याच स्वार्थाचा विचार न करता सर्वांच्या हिताचा विचार करतील तर तात्काळ एकमत होईल. हे एकमत साधण्याचा उपाय या ग्रंथाच्या शेवटी सांगितला आहे. सर्वशक्तिमान परमात्मा एकाच सत्यमताच्या स्वीकृतीसाठी सर्वांना उत्साहित करून प्रवृत्त करो हा उत्साह सर्व मानवांच्या आत्म्यात प्रकाशित करो.

अलमतिविस्तरेण विपश्चिद्वरशिरोमणिषु ।