श्री करवीरपुरवासिनीची आरती
| ←= | श्री करवीरपुरवासिनीची आरती |
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तुं स्थुलसुक्ष्मी ॥ धृ. ॥
मातुलिंग गदायुत खेट्क रविकिरणी ।
झळके हाटकवादी पीयुषरसपाणी ॥
माणिकदशना सुरंगवसना म्रुगनयनी ।
शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ २ ॥
तारा शक्ती अगम्या शिवभजकां गौरी ॥
सांख्य म्हण्ती प्रकृती निर्गुण निर्धारी ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥
अमृतभरिते सरितें अघदुरितें वारी ॥
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ॥
वारी मायापटल प्रणमत परीवारीं ।
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी ॥ ४ ॥
चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥
पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥
| हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५२ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |