श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/४ फेब्रुवारी

विकिस्रोत कडून

४ फेब्रुवारी

भगवंताच्या नामानेच वासनाक्षय !




आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे 'आहे ते असू द्याच, आणि आणखीही मिळू द्या' असे वाटणे. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरूवात म्हणून आपण असे म्हणावे की, 'आहे ते असू द्या, आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागू या.' म्हणजे, मिळाले तर 'भगवंताने दिले', आणि न मिळाले तर 'त्याची इच्छा नाही', अशी जाणीव होऊन 'दाता परमात्मा आहे' ही भावना वाढू लागेल; आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल; आणि आसक्ती कमी होऊ लागली की 'हवे नको' कमी होऊन वासना ओसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे; त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या बैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपडयाचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल.


शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे; याचाच अर्थ, आपण उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम. काळ, वेळ, परिस्थिती, उच्च-नीच भाव, स्त्री,पुरूष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती, गरिबी, प्रकृतीची सुस्थिती-दुःस्थिती, वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच, त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत, आणि कुठेही, केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची तदाकारवृत्ती सोडली पाहिजे. 'भगवंत माझ्या मागे आहे' अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. मारूतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली, त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.


भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार ? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही; आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे, आणि हे मरण डोळयांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.