भोवरा/द्वारका

विकिस्रोत कडून




 
 द्वारका


  एक झाड नाही, झुडूप नाही, कसलाही निवारा नाही. सूर्य रणरण तळपत होता. संध्याकाळ होण्याची वेळ असूनसुद्धा हवेत गारवा नाही. भोवतालची तापलेली वाळू थंड होण्यास निदान मध्यरात्र तरी लोटावी लागेल असे असूनही मी देवळाचा निवारा सोडून समुद्रकाठी आले. देवळातील दृश्यास विटून बाहेर यावे व बाहेरचे वैराण जग पाहून आत जावे असे येथे आल्यापासून चालले आहे. डाकोरनाथचे विलास व भोग पाहून मनात काही भक्ती रुजत नाही. देवाने उठावे- देवळाची दारे उघडली जावीत- मूर्तीचे दर्शन व्हावे, अशी हुरहूरही लागत नाही. देवाचा कार्यक्रम मोठ्या पगाराच्या सरकारी अधिकाऱ्यापेक्षाही काटेकोर. सकाळी आरती व नैवेद्य, मग स्नान व पूजा आणि मोठा नैवेद्य, मग दुपारची वामकुक्षी, मग संध्याकाळी सूर्य कलला म्हणजे उठून भक्तांना दर्शन, परत आरती-शेजारती व शयन ह्या चक्रात देवाचा इतरेजनांशी संबंध फारच थोडा येतो. जो जास्त पैसा देईल त्याला जवळून दर्शन मिळण्याची शक्यता- लोकांना पिळून काढणाऱ्यांचा, श्रीमंत, राजविलास भोगणारा हा देव त्या श्रीमंतांनाच लखलाभ होऊ दे!
 कोठे ती पूर्वीची द्वारका व कोठे हे वाळवंटातले एकाकी देऊळ कृष्णचरित्र सगळेच अद्भुताने भरलेले आहे- आणि आपली पुराणे त्या अद्भुतावर मात करून काळ्याचे पांढरे न् पांढऱ्याचे काळे करतात. द्वारका खरोखर कृष्णाच्या अपजयाची निशाणी. कंसाला मारून मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनाला कृष्णाने बसविले व सर्व यादवकुले मथुरेच्या आसपासच्या सुपीक यमुनाकाठी निर्भय वास्तव्य करण्याच्या विचारात
होती; पण कंसाची बायको सम्राट जरासंधाची मुलगी होती. तिने बापाला यादवांवर सूड घेण्याची चेतना दिली व जरासंधानेही यादवांचा निःपात करण्याचा चंग बांधला. एकदा, दोनदा, तीनदा, पुनःपुनः यादव वीरांनी जरासंधाचा प्रतिकार करून त्याला मागे रेटले. पण जरासंधाने प्रयत्न सोडला नाही. त्याने पश्चिमेकडील योनांचे साहाय्य मिळविले व कालयवन आणि तो अशी दुहेरी सैन्ये मथुरेवर चालून आली. आता आपल्या चिमुकल्या यादवसेनेचा निभाव लागणे शक्य नाही. हे ओळखून कृष्णबलरामांनी सर्व यादवांसह मथुरा सोडली. रजपुताना, उत्तर गुजराथ व काठेवाड हे तीन रूक्ष प्रदेश ओलांडून ते समुद्रकिनाऱ्याला आले. तेथे रैवतक पर्वताशेजारी सपाट, वाहने चालवण्यास योग्य अशी भूमी त्यांना दिसली. कृष्णाच्या मर्जीखातर समुद्राने थोडे मागे सरून हे क्षेत्र नवीन शहर वसवावयास दिले व कृष्णाने विश्वकर्म्याच्या साहाय्याने एक रम्य व अजिंक्य नगरी वसवली- तीच द्वारका ऊर्फ द्वारावती. त्या ठिकाणी आल्यावर यादवांना उसंत मिळाली व ते पुन्हा बलशाली झाले; म्हणज 'द्वारका' हे कृष्णाच्या पराजयाचे प्रतीक. हरिवंशात जेव्हा वैशंपायन द्वारकेचे वर्णन करू लागतात तेव्हा जनमेजय त्यांना मधेच थांबवून विचारतो की, 'मुनिवर्य, सुपीक, रम्य धनधान्ययुक्त असा यमुनाकाठचा मध्यप्रदेश सोडून यादव द्वारका वसवायला इकडे वाळवंटात कुठं आले ?' तेव्हा वैशंपायनाला सर्व कथा सांगावी लागली. तरीदेखील कृष्णाचा पराजय शक्य तो कमी लेखून, द्वारकेचा मोठेपणा वर्णन करून मुनिवर्यांनी वेळ मारून नेली. विशेषतः रुक्मिणीहरणामुळे कृष्णाचा व द्वारकेचा दरारा वाढला व द्वारकेच्या जन्माच्या मागची यादवपराजयाची स्मृती इतकी लोपली की नरेन्द्र आपल्या "रुक्मिणी स्वयंवरात" द्वारकेचे वर्णन "देवाचेया दादुलेपणाचा उबारा, न साहवे सातही सागरा, भेणे वौसरोना राजभरा, दीधली द्वारावती" असे करतो.
 हस्तिनापूर, गिरिव्रज, मथुरा वगैरे महाभारतकालीन शहरे भारतीय युद्धाच्या आधी व मागूनही होती. कैक राजकुले त्यात नांदली, वैभवाला चढली व नष्ट झाली; पण द्वारकेचे तसे नाही. द्वारकेचे नाव फक्त श्रीकृष्णाशी निगडित आहे. श्रीकृष्णांनी तिला निर्मिले व श्रीकृष्णाबरोबर ती नाहीशी झाली. श्रीकृष्ण साकारलेले चैतन्य होते; तर द्वारका श्रीकृष्णाचे साकारलेले
स्वप्न होते. श्रीकृष्णाबरोबर द्वारकेचे जड रूप जाऊन ती एखादी रम्य स्वप्नाची स्मृती म्हणून राहिली आहे. खरी द्वारका कशी होती कोण जाणे, पण प्रत्येक कवी आपापल्या मनाप्रमाणे उद्यानांनी वेढलेली, राजवाड्यांनी नटलेली, एक खांबावर पेललेली सोन्याची द्वारका निर्माण करतो.
 भर्तृहरी जेव्हा गतकाळातील 'कोणा एक्या रम्य' नगरीचे वर्णन करतो, त्या वेळी तेथील मोठा सम्राट, इतर मांडलिक राजे, स्तुतिपाठक, सुंदर स्त्रिया, हास्य विनोद ह्याबरोबर उच्छृंखल वागणाऱ्या राजपुत्रांचाही उल्लेख करतो- 'उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः।' आणि खरोखरच द्वारकेचा नाश अशाच उनाड, दारूबाज, जुगारी, रंगेल आणि रगेल यादव राजपुत्रांच्या वर्तनाने झाला ती कथा सर्वांना माहीतच आहे. जैनांची कथा महाभारत कथेहून निराळी आहे ती अशीः द्वारकेचा नाश मद्यपी यादवांमुळे द्वैपायन करील, असे नेमिनाथांचे भविष्य ऐकून कृष्ण-बलरामांनी यादवांच्या हाती लागू नये म्हणून सर्व मद्य द्वारकेबाहेरच्या एका रानातील गुहेत ठेवले होते. शिकारीवर गेलेल्या राजपुत्रांच्या हाती ते लागले. अनेक वर्षांची ती मुरलेली उत्कृष्ट दारू पिऊन झिंगलेल्या कुमारांनी द्वैपायन ऋषीला लाथाबुक्क्यांनी मारले व त्याने हा अपमान मनात धरून, एक दिवस संधी साधून द्वारकेला आग लावून दिली व सर्व दरवाजे रोखून धरले. कृष्ण-बलरामांना कोणालाही वाचवता येईना. निदान वसुदेव-देवकीला तरी वाचवावे म्हणून त्यांनी त्यांना रथात घातले पण जनावरे पुढे पाऊल टाकीनात, तेव्हा स्वतः दोघांनी रथ ओढीत नेला तो आस निखळला. दाराशी यमाप्रमाणे द्वैपायन होता. त्याने परत निक्षून सांगितले की, तुम्ही दोघे जा, मी इतरांना जाऊ देणार नाही. वसुदेवानेही काकुळतीने सांगितले, तुम्ही जा; निदान तुम्ही तरी जिवंत आहात असे समजून आम्ही सुखाने मरू. शहर धाडधाड जळत होते. धूर आकाशापर्यंत भिडला होता, रस्त्यारस्त्यांतून बायका, मुले व पुरुष 'कृष्णा, आम्हांला सोडीव, रामा, आम्हांला सोडीव', असा आक्रोश करीत होते. कृष्ण तेथेच मरावे असा निश्चय करीत होता, पण वसुदेवाच्या आज्ञेमुळे भ्रातृवत्सल बलरामाने त्याला ओढीत बाहेर नेले. श्रमाने क्लांत होऊन झाडाखाली निजलेल्या कृष्णाला त्याच्याच एका बांधवाने हरिण समजून मारले; व स्वतःची नगरी जळत असलेली पाहात पाहात, दैवाला शिव्याशाप देत कृष्ण परलोकवासी होऊन नरकात गेला अशी ही कथा आहे. ह्या कथेतील कायंबिनी दारूचे वर्णन व
द्वारकेतील यादवांचा हृदयद्रावक अंत इतका अपूर्व सांगितला आहे की एकदा वाचल्यावर विसरणे शक्य नाही. पण या कथेपेक्षा हरिवंशातील कथा जास्त वास्तव वाटते. यादव पुरुष दारू पिऊन आपापसांत झगडून मेले व स्त्रिया, म्हातारे व बालके फक्त नगरात राहिली. स्वतः मरण्याच्या आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला झाल्या प्रकाराचा निरोप पाठवण्याची सोय केली. तो निरोप पोचल्यावर अर्जुन आला. त्याने वसुदेवाचे सांत्वन केले. सर्व मृत यादवांना अग्नी दिला. कृष्ण-बलरामांची कलेवरे शोधून काढून त्यांनाही अग्नी दिला व उरलेल्या सर्वांना घेऊन हस्तिनापुराकडे निघाला. वाटेत पंचनद्यांच्या प्रदेशात काही यादवस्त्रिया आपणहून अभीरांकडे गेल्या; व काही त्यांनी पळवल्या. उरलेल्या घेऊन अर्जुन हस्तिनापुराला आला. त्याने श्रीकृष्णाचा नातू जो वज्र त्याला इंद्रप्रस्थाचे राज्य दिले व उरलेल्या यादवांना तेथे राहण्यास जागा दिली. ज्या क्षणी अर्जुन शेष यादवांना घेऊन बाहेर निघाला, त्याच क्षणी समुद्राची मोठी लाट येऊन द्वारका नाहीशी झाली.
 जैनमताप्रमाणे द्वारकेला प्रचंड आग लागली; महाभारताप्रमाणे द्वारका समुद्रात गेली. खरे काय झाले माहीत नाही. सध्या ज्याला 'द्वारका' क्षेत्र म्हणतात ती खरी द्वारका नसून प्रभासपट्टणशेजारी समुद्रात एक लहानशा टेकडीवजा उंचवटा आहे, ती द्वारका होय, असेही मत आहे. द्वारकेशेजारी रैवतक पर्वत होता असे हरिवंश व जैन ग्रंथकार एकमताने सांगतात. हा रैवतक पर्वत म्हणजेच जुनागढ शेजारचा गिरनार; व तेथेच नेमिनाथ निर्वाणपदाला गेले असे म्हणतात. त्या भागात उत्खनन केले असता ख्रिस्त शकासुमाराचे व त्या आधीचेही जुने अवशेष सापडले आहेत व आणखीही सापडण्याचा चांगलाच संभव आहे. तेथील समुद्रकिनाऱ्यावर कदाचित जुन्या द्वारकेचा पत्ताही लागेल.
 पर्शियन आखातापासून तो काठेवाडपर्यंतच्या भागात अजूनही धरणीकंपाचे धक्के बसतात. येथे समुद्रात ज्वालामुखी पर्वत असून अधूनमधून त्याच्या स्फोटाने किनाऱ्याजवळील जमीन हादरते व समुद्रात प्रचंड लाटा उसळून त्या किनाऱ्यावर आदळल्या की कोळ्यांची गावेच्या गावे गिळून टाकतात. नुकताच दोन वर्षांपूर्वी तसा धरणीकंप होऊन कराचीशेजारच्या शंभर मैल किनाऱ्यावरील कोळीवाडे समुद्राच्या पर्वतप्राय लाटांनी नष्ट झाल्याचे वर्तमान सर्वांनी वाचले असेलच.
 द्वारका लाकडाची बांधलेली होती. तिच्याभोवती मोठा कोट असून त्यांत दारे ठेवलेली होती म्हणूनच तिचे नाव द्वारावती असावे किंवा पश्चिमसमुद्राचे दार म्हणून द्वारका. घराघरांतून पेटलेल्या चुलीतील आगीत काही भाग धरणीकंपाने कोसळून पडतो व मोठमोठ्या आगी लागतात. अशी प्रचंड आग टोकिओला १९११ साली लागली होती. आगीपाठोपाठच मोठमोठ्या लाटा येऊन धरणीकंपाने खचलेली द्वारका नाहीशी झाली असण्याचा संभव आहे. अशा परिस्थितीत अती प्राणहानी होते व फारच थोडे लोक वाचतात. असा धरणीकंप होण्याच्या आधी पुष्कळदा लहान लहान धक्के बसतात व त्या सूचनेने लोक पळून जातात. रोमन लोकांचे पाँपी शहर ज्वालामुखीने नष्ट झाले. द्वारका खचून खरोखरच समुद्रात गेली असली तर तिचे अवशेष सापडणे कठीण आहे; पण खणणाऱ्याच्या हाती काय लागेल ते सांगवत नाही. कदाचित् धरणीकंपाने, आगीने अर्धवट जळलेली द्वारका सापडायची देखील. पाँपी शहरात आज जी अद्भुत दृश्ये दिसतात, तशीसुद्धा दिसतील. काही यादवस्त्रिया व पुरुष रस्त्यावरून पळताना एक पाय जमिनीवर, एक पाय उचललेला अशा स्थितीत मेलेले व उभेच्या उभे गाडलेले आढळायचे. काही आंघोळ करताना, काही चुलीजवळ, काही रथात- छे: कल्पनाच नको. त्यापेक्षा जुनी द्वारका समुद्राच्या लाटांनी झाकलेली आहे तशीच असू दे.
 खरी द्वारका आपल्या निर्मात्याबरोबर गेली तर मग ही सध्याची द्वारका काय आहे? ही द्वारकेची वास्तू नाही, प्रतिकृती नाही; केवळ त्या रम्य नावाने मिरवणारी एक विकृती आहे.

*