भारतीय लोकसत्ता/सामाजिक पुनर्घटना-हिंदु व मुसलमान

विकिस्रोत कडून

प्रकरण चौदावें
सामाजिक पुनर्घटना
हिंदु व मुसलमान

 आपली लोकसत्ता यशस्वी व्हावयाची तर अखिल भारतीय समाज हा एकरूप, संघटित व अभंग होणे कसे अवश्य आहे, हे मागील प्रकरणांतून विशद करून सांगितले. ज्या अनेक भेदांनीं आपला समाज विच्छिन्न झालेला आहे, त्यांतील ब्राह्मणब्राह्मणेतर, स्पृश्यअस्पृश्य व हिंदुमुसलमान हे प्रमुख भेद होत. यांपैकीं तिसरा भेद म्हणजे हिंदुमुसलमान. हा भेद म्हणजे भारताच्या संघटित जीवनाच्या दृष्टीने अत्यंत कठीण असा प्रश्न आहे. याच्या तुलनेने पहिले दोन भेद कांहींच नव्हेत. कारण कांहीं झालें तरी त्यांतील सर्व पक्षांची हिंदुस्थान ही आपली मायभूमि आहे, तिचा उत्कर्ष हाच आपला उत्कर्ष, त्या उत्कर्षासाठी वाहून घेणे यांतच आपल्या जीविताची सार्थकता आहे, अशी दृढ व अचल निष्ठा आहे. येथील प्राचीन संस्कृतीविषयीं व ती निर्माण करणाऱ्या महापुरुषांविषय त्यांच्या मनांत गाढ अशी भक्ति आहे. श्रीकृष्ण, रामचंद्र, व्यासवाल्मीकि येथपासून श्रीशिवछत्रपति, टिळक, महात्माजी, अरविंद, सुभाषचंद्र या थोर परंपरेचा ते अभिमान बाळगतात. ही निष्ठा, ही भक्ति, व हा अभिमान मुसलमानांच्या ठायीं नसल्यामुळे हिंदु व मुसलमान या समाजांच्या ऐक्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. तो किती बिकट आहे, हिंदुमुसलमान हा प्रश्न स्वातंत्र्य- पूर्वकाळाप्रमाणेच आज स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर व पाकिस्तानच्या निर्मिती- नंतरहि पूर्वीइतकाच कठीण कसा आहे, याची पुढील माहितीवरून कल्पना येईल.
 १९३७ सालीं प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. त्यांत मुस्लीम लीगला कोणच्याहि प्रांतांत बहुमत मिळाले नव्हते; इतकेच नव्हे, तर मुस्लीम लीग हा पक्ष राजकाणांत विचारांत घेण्याजोगा मुळींच नाहीं, असा त्या निवडणुकांतून निर्णय निघत होता. एकंदर मुस्लीमांची मतें ७३ लक्ष १९ हजार होती. त्यापैकी ३ लक्ष २१ हजार मतेंच फक्त म्हणने शे. ४·४ मतें लीगला मिळालीं, बिहार, वायव्यसरहद्द, ओरिसा व सिंघ या प्रांतांत लीगला एकहि जागा मिळाली नाहीं. पंजाबमध्ये १७५ जागांपैकीं लीगला फक्त एक मिळाली. बंगालमध्ये लीगला ३९ जागा मिळाल्या तर लीगेतर मुस्लीमांना १२२ जागा मिळाल्या. सिंध, पंजाब, सरहद्द व बंगाल या मुस्लीम बहुसंख्य प्रांतांत लीगची अशी वाताहत झाली, मग इतरत्र काय झाले असेल याची कल्पना सहज येईल. मुस्लीमांच्या जागा लीगला मिळाल्या नाहींत म्हणजे त्या काँग्रेसला मिळाल्या असे नाहीं. त्या बहुतेक लीगेतर मुस्लीम पक्षांना- युनियनिस्ट, राष्ट्रीय मुस्लीम, मोमीन, अहरार इ. पक्षांना मिळाल्या. तरी लीगचे वर्चस्व मुस्लीमांवर नाही, असे त्यामुळे निश्चित झाले.
 हिंदुमुसलमानांच्या ऐक्याच्या प्रतिपादकांना व विशेषतः काँग्रेसचें मुस्लिमांविषयींचें जे उदार धोरण त्याच्या पुरस्कर्त्यांना हा देखावा फारच आशादायक वाटला. मुस्लिमांची वृत्ति जातीय नसून राष्ट्रीय आहे, द्विराष्ट्रवाद त्यांना मुळींच मान्य नाहीं, महात्माजींचें व काँग्रेसचें त्यांच्याविषयींचें धोरणच समर्थनीय ठरले, असे निष्कर्ष त्यांनी काढले व संघटित भारतीय समाजाचीं सुखस्वप्ने ते पाहूं लागले. वास्तविक अशीं स्वप्नें पहाण्याचा त्यांना कसलाहि अधिकार नव्हता. १९२१ ते १९३७ या काळांत पाकिस्तानचा प्रचार पुढील काळासारखा तीव्र वेगाने होत नसला तरी त्या काळांत हिंदुस्थानांतील बहुतेक प्रांतांत हिंदुमुसलमानांचे अत्यंत भयानक असे दंगे जवळ जवळ दरसाल होत होते. आणि हिंदूंवर मुलसमानांचें अनेक प्रकारांनी आक्रमण चालू होतें. कत्तली, जाळपोळ लूट यांना सीमा राहिली नव्हती. १९२७ सालापासून मुसलमान काँग्रेसपासून दूर चालले होते व स्वातंत्र्याच्या लढ्यांत बहुसंख्य मुसलमान सहकार्य करीत नव्हते. असा पूर्व इतिहास होता तरी १९३७ च्या निवडणुकांत लीगला मुळींच थारा न मिळाल्यामुळे मुसलमान समाजांत भारताबद्दल राष्ट्रनिष्ठा जागृत झाली, असा निर्वाळा बहुतेक लेखक देऊ लागले.
 पण त्या सर्वांचा हा आशावाद १९४६ च्या निवडणुकांनी अगदी धुळीस मिळविला. या साली केंद्रीय विधिमंडळांत मुस्लिमांच्या मतांपैकी शे. ८७ मते लीगला मिळाली. प्रांतीय विवडणुकांत ६० लक्षांपैकी ४५ लक्ष म्हणजे शे. ७५ मते लीगला मिळालीं. १९३७ साली मुस्लिमांच्या ४९२ राखीव जागांपैकी सर्व प्रांत मिळून लीगला १०९ मिळाल्या होत्या. १९४६ साली ४९२ पैकीं लीगला ४२८ जागा मिळाल्या. पंजाबमध्ये लीगला ३७ साली एकच जागा होती. तेथें आतां ७५ मिळाल्या. सिंध मध्ये एकहि जागा ३७ साली नव्हती. ४६ सालीं २७ जागा लीगनें जिंकल्या. बंगालमध्ये ३९ ऐवजी आतां ११४ जागा लीगकडे गेल्या. दक्षिण हिंदुस्थानांतहि असाच प्रकार घडला. मद्रासमध्ये ३७ साली लीगला १० प्रतिनिधि पाठवितां आले. ४६ सालीं तिनें २८ पाठविले. मुंबईत १८ ऐवजी ३०, मध्यप्रांतांत ५ ऐवजी १३ अशी वाढ झाली. उत्तर हिंदुस्थानांतील अजून भारतांत असलेल्या प्रांतांतहि हेच दृश्य दिसले. ३७ सालीं बिहारमध्ये लीग एकहि जागा जिंकू शकली नव्हती. आतां तिने ३४ जिंकल्या उत्तरप्रदेशांत २६ च्या ऐवजी ५४ जागा तिने मिळविल्या. म्हणजे १९३७ ते १९४६ ह्या काळांत आज पाकिस्तानांत गेलेल्या प्रांतांतच लीगचें वर्चस्व वाढले असें नसून सध्यां हिंदुस्थानांत राहिलेल्या प्रत्येक प्रांतांतहि मुस्लीमांच्या समाजांतील बहुसंख्य लोक लीगवादी बनले असें स्पष्ट दिसतें. १९४६ च्या जुलैमध्ये घटनापरिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यांतहि मुस्लीम समाजानें, आम्ही सर्व लीगवादी म्हणजे पाकिस्तानवादी व द्विराष्ट्रवादी आहों, या भूमीबद्दल आम्हांला भक्ति नाहीं, ही आमची मायभूमी आहे असे आम्हांला वाटत नाहीं, हाच अभिप्राय प्रगट केला. घटना परिषदेतील ८० जागांपैकी ७३ जागा लीगने मिळविल्या. दोन तपें मुस्लीमांच्या हृदयपालटासाठी अहोरात्र खटपट करणाऱ्या काँग्रेसला मुस्लीमांच्या फक्त चार जागा मिळाल्या, अँग्लो इंडियन, खिश्चन, शेड्ल्ड् कास्टस् यांच्या जागांपैकी बहुतेक सर्वच्या सर्व काँग्रेसला जिंकतां आल्या. पण मुस्लीमबांधवांच्या बाबतीत तिचा प्रभाव चालू शकला नाहीं. आपल्या सर्व प्रतिज्ञा, घोषणा व वचनें मागें घेऊन काँग्रेसला या देशाच्या फाळणीला मान्यता द्यावी लागली त्याचें हें कारण आहे.
 १९३७ ते १९४६ या काळांत बहुसंख्य मुसलमान लीगच्या मागे गेले, त्याचे मुख्य कारण म्हणजे लीगने पुढे मांडलेली पाकिस्तानची, मुस्लीमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना हे होय. सर सय्यद अहंमदांच्या काळापासून म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून मुसलमान हे ब्रिटिश सरकारचे दोस्त झालेले होतेच. हा मोठा समाज भारतीय समाजापासून तोडून आपल्याकडे घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पहिल्यापासूनच घवघवीत यश आलें होतें. ब्रिटिश सरकारच्या प्रेरणेने १८९२ सालापासूनच हिंदुमुसलमानांचें दंगे सुरू झाले होते. पुढे मुस्लीमांना विभक्त मतदार संघ देऊन सरकारनें कायमच तोडून काढले. त्या मागल्या काळापासूनच मुसलमानांच्या मनांत, कांही अपवाद वगळले तर- त्यांचा विचार पुढे होईलच– हिंदुसमाज, हिंदुसंस्कृति, हिंदुभूमी यांच्याबद्दल प्रेम नाहीं. तर पूर्ण तिटकारा आहे. आपण जेते आहो, श्रेष्ठ आहों, आणि हिंदु हे गुलाम आहेत, दास आहेत, याच भावना आपल्या मनांत ते पोषीत राहिले होते. मध्यंतरी १९२०-२६ या असहकारितेच्या काळांत खिलाफतीचा प्रश्न कॉंग्रेसनें उचलून धरला म्हणून मुस्लीमांनी वरकरणी भारतीयांच्या राष्ट्रीय आकांक्षांशी कांहींशी, अत्यल्प प्रमाणांत, समरसता दाखविली होती. पण याच काळांत वर सांगितल्याप्रमाणे सर्व हिंदुस्थानांत हिंदुमुसलमानांच्या दंग्यांना भयानक रूप प्राप्त झाले होते. त्या दंग्यांत येथील मंदिरें, महापुरुष आणि भारतीय संस्कृतीचीं इतर प्रतीकें, त्याचप्रमाणे वंदे मातरम् हे राष्ट्रगीत व काँग्रेसचा तिरंगी ध्वज हीं नव्या राष्ट्रीय आकांक्षांची प्रतीकें यांची मुस्लीमांनी पराकाष्ठेची हेलना करून, या भूमीविषयी, येथल्या संस्कृतीविषयी, येथल्या परंपरेविषयीं आपल्या काय भावना आहेत, ते वेळोवेळी प्रगट केले होते. म्हणजे १९४६ च्या आधी मुस्लीमांच्या भावना नंतरच्या भावनांपेक्षां कांहीं निराळ्या होत्या असें नाहीं. लीगच्या मागें किंवा इतर कोणच्याहि संस्थेच्या मागें ते अशा संघटित बलाने या वेळेपर्यंत उभे राहिले नव्हते इतकाच त्याचा अर्थ आहे. १९३७ सालानंतर निराळें झालें तें हे की आतांपर्यंतच्या त्यांच्या ज्या भावना, कोठलाच मार्ग दिसत नसल्यामुळे, कोंडून आंतल्या आंत सळसळत बसल्या होत्या त्यांना आतां अवसर प्राप्त करून देणारी पाकिस्तानची कल्पना जन्माला आली. ती नव्हती तोपर्यंत कांही झाले तरी आपल्याला येथें, या परक्या शत्रुदेशांत, रहाणे प्राप्त आहे, तेव्हां कशी तरी निभावणी केली पाहिजे, अशा केवळ अगतिक भावनेनें मुसलमान समाज हिंदुस्थानांत रहात होता. आणि इंग्रज राज्यकर्त्यांच्या आश्रयाने शक्य तितका आपला फायदा करून घ्यावा, अशी त्याची बुद्धि होती. हिंदुसमाजाबद्दल ममत्व, बंधुभाव, आपलेपणा असा त्याला कधीं वाटला नाहीं व वाटण्याची आवश्यकता कधी त्याला भासली नाहीं. पाकिस्तानची कल्पना उदयास येतांच त्या समाजाच्या या अगतिकेच्या, परिस्थितिवशतेच्या सर्व भावना नाहींशा होऊन त्याला एक नवें आशाकेंद्र दिसू लागले आणि मुस्लीम लीगने त्या नव्या आशाआकांक्षा सफल करण्याचा मार्ग दाखवून त्याविषयींची संभवनीयता स्पष्ट केली, तेव्हां अखिल भारतांतला मुस्लीम समाज तिच्यामागें संघटित होऊन उभा राहिला.
 १९३७ सालीं निवडणुकांत ज्या मुस्लीम लीगला कोठच्याच प्रांतांत थारा मिळाला नव्हता ती १९४६ सालच्या निवडणुकांत मुसलमानांची एकमेव प्रतिनिधि ठरली याचे कारण हे असें आहे. या सातआठ वर्षांच्या काळांत पाकिस्तानचा फार मोठ्या प्रमाणावर तिने प्रचार केला, काँग्रेसचें राज्य म्हणजे हिंदूचे राज्य, असे समीकरण तिने मांडले आणि ब्रिटिश राज्य येथून जातांच लोकशाहीच्या नियमानें बहुसंख्य जे हिंदु त्यांचे राज्य येथें प्रस्थापित होऊन त्यांच्या सत्तेखालीं इस्लामी धर्म व इस्लामी संस्कृति यांचा सर्वनाश होणार आहे, असें भविष्यकाळाचें भेसूर चित्र लीगच्या पुढाऱ्यांनी मुस्लीम जनतेपुढे उभें केलें. याला उपाय त्यांच्या मतें एकच होता. हिंदुस्थानची फाळणी करून मुसलमानांचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणें हा तो उपाय होय. हे द्विराष्ट्रवादाचें तत्त्वज्ञान मुस्लीम नेत्यांनी आपल्या समाजापुढे मांडलें. वर सांगितल्याप्रमाणे त्याच्या जोपासनेसाठी अवश्य ती भूमि आधींच तयार होती, त्यामुळे तें तत्त्वज्ञान त्या समाजाच्या मनांत तत्काळ रुजून त्याला धुमारे फुटले व ही भरतभूमि एकसंघ व अखंड करण्याचे प्रयत्न- हजारों वर्षांचे भारतीयांचे प्रयत्न- विफल होऊन या प्राचीन राष्ट्राचीं शकले झाली.
 मुस्लीम समाजानें द्विराष्ट्रवादाचे, विभक्ततेचें हें जें तत्त्वज्ञान अंगीकारिलें व अनेक युक्त्याप्रयुक्त्यांनीं सफल करून दाखविले, त्याला त्यांच्या समाजांत कोणाचाच विरोध नव्हता असें नाहीं. अनेक मुसलमान लेखक, पत्रकार, पंडित, अनेक मुस्लीम संस्था यांनी याच काळांत पाकिस्तानच्या कल्पनेला कसून विरोध केला होता. पाकिस्तान हे मुस्लीम समाजालाच घातक आहे, हा विचार सांगण्यासाठी या मुस्लीम नेत्यांनी लेख लिहिले, पत्रके काढली, ग्रंथ लिहिले, सभा घेतल्या, ठराव केले, चळवळीहि केल्या; पण मुस्लीम जनतेला वळवून तिचा कौल आपल्याला अनुकूल करून घेण्यांत त्यांना अणुमात्र यश आले नाहीं.
 १९४३ व्या एप्रिलमध्ये मजलिस इ अहरार या संस्थेची सभा उत्तरप्रदेशांतील सहाराणपूर गांवीं भरली होती. तिच्या अध्यक्षपदावरून मौलाना गुलाम घौस यांनी पाकिस्तानला विरोध करून, 'हिंदुस्थानचें पूर्ण स्वराज्य हेच आमचें, आमच्या संस्थेचें व सर्वं मुसलमानांचे ध्येय आहे' असे सांगितले. 'स्वराज्य आलें तर हिंदूचें राज्य होईल अशी आपणांस मुळींच भीति वाटत नाहीं, तसे झाल्यास ते राज्य चालू न देण्याचें सामर्थ्य आमच्यांत आहे,' असेंहि त्यांनी बजावले. 'मुस्लीम लीग ही वास्तविक मुस्लीम जनतेची खरी प्रतिनिधि नसून काँग्रेस फक्त तिलाच पाचारण करते, इतर मुस्लीम संस्थांना करीत नाहीं, म्हणून आम्ही काँग्रेसशीं सहकार्य करीत नाहीं.' अशी तक्रार त्यांनी नमूद करून ठेविली आहे. त्याच एप्रिल महिन्यांत दिल्लीला मोमीनांची परिषद् भरली होती. त्या वेळीं अध्यक्ष जहिरुद्दिन यांनीं 'पाकिस्तानयोजना ही मुसलमानांनाच जास्त घातक असून आम्हांला ती मुळींच मान्य नाहीं. मुस्लीम लीग ही सर्व मुसलमानांची प्रतिनिधि नाहीं. आम्ही चारपांच कोटी मोमीन तिचें नेतृत्व मुळींच मानीत नाहीं. आपण सर्व मुस्लीमांचे प्रतिनिधि असल्याचा लीगचा दावा भ्रामक, विपर्यस्त व कपटीपणाचा आहे.' इत्यादि विचार सांगितले. मुस्लीम मजलीस ही संस्था १९४३ सालींच स्थापन झाली होती. पाकिस्तानला विरोध, हिंदुस्थानचे अखंडत्व, हिंदुस्थानचें पूर्ण स्वातंत्र्य, मुस्लीमांच्या हक्कांचे संरक्षण- हे आपले ध्येय असल्याचें या संस्थेच्या जाहीरनाम्यांत नमूद केलेले आहे. पाकिस्तान म्हणजे मुसलमानांची आत्महत्या असून हिंदुस्थानचें स्वातंत्र्य व एकराष्ट्रीयत्व या मार्गात बॅ. जीना ही एक धोंड आहे, जीनांचे नेतृत्व प्रतिगामी आहे, त्यापासून आपल्या समाजाचे रक्षण केले पाहिजे, असेहि विचार या जाहीरनाम्यांत प्रकट केलेले आहेत. याशिवाय अझाद मुस्लीम कॉन्फरन्स, शियापरिषद्, अल्लाबक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली जमियत उलउलेमांची परिषद्, साऊथ इंडिया अँटीसेपरेशन कॉन्फरन्स इ. अनेक संस्थांनीं पाकिस्तान मुसलमानांनाच घातक आहे, जीनांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास नाहीं, मुस्लीम लीग आमची प्रतिनिधि नाहीं, या अर्थाचे ठराव संमत केले होते. (इंडियन चार्टर- जहांगीर कोतवाल)
 याशिवाय भारताच्या अखंडत्वाला व हिंदुमुसलमानांच्या ऐक्याला पोषक असे अनेक विचार अनेक मुस्लीम पंडितांनीं व नेत्यांनी या काळांत आपल्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. हिंदु व मुसलमान यांचा धर्म भिन्न असला तरी मुळांत हे दोन्ही समाज एकवंशीय असल्यामुळे केवळ धर्मभेदामुळे त्यांनी फुटून निघण्याचे कारण नाहीं, हा विचार अफझल हक, अल्लाबक्ष, मिया महंमद शफी इत्यादि नेत्यांनी अनेक वेळां सांगितलेला आहे. हिंदुमुसलमानांच्या ऐक्याला, हिंदुस्थान ही आपली मातृभूमि आहे असे मानण्याला, इस्लाम धर्माचा मुळींच विरोध नाहीं, हा विचार तर अनेकांनी अनेक वेळा मुस्लीम समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पेन जिंकणारा मुसलमान सेनापति तारिक याचे वचन उद्धृत करून डॉ. शोकत अल्ली अन्सारी यांनीं, मुसलमानांना हिंदुस्थान ही परकी भूमि वाटण्याचें मुळींच कारण नाहीं, असे सांगितले आहे. एका पंडितानें तर, महंमद पैगंबर यांनी मुसलमानांनी मुस्लिमेतरांबरोबर एक राष्ट्र घडवण्याचा उपदेश केल्याचे सांगितले आहे. पैगंबरांच्या मतें राष्ट्र घडविण्यास एक धर्म असणे अवश्य नाहीं; तर भिन्न समाजांचे हितसंबंध एक असले की पुरेसे आहे.
 १९३७ च्या पूर्वीच्या काळांतहि हिंदुस्थान हीच आपली मातृभूमि आहे, भारतांतील इतर धर्मीयांसह आपणांस राष्ट्र म्हणून संघटित झाले पाहिजे, अशी मुसलमान समाजाला शिकवण देण्याचा प्रयत्न मुस्लीम नेत्यांनी केला होता. १९०३ सालीं बुद्रुद्दीन तय्यबजी यांनीं अ. भा. मुस्लिम शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदावरून 'काँग्रेसच्या कार्याला विरोध करणाऱ्या कोणच्याहि संस्थेशीं दुरूनसुद्धां संबंध ठेवण्याची माझी इच्छा नाहीं.' असे उद्गार काढले. पुढील काळांत डॉ. अन्सारी, खान अबदुल गफारखान, हकीम अजमलखान इत्यादि मुस्लीम नेत्यांची काँग्रेसवरील निष्ठा याच प्रकारची होती. या सर्वात मौ. अबुल कलम आझाद यांचे प्रयत्न विशेष महत्त्वाचे आहेत. १९१२ साली त्यांनी 'अल हिलाल' हें राष्ट्रीय वृत्तीचा प्रसार करणारें साप्ताहिक सुरू केले. त्याचा खप २५००० पर्यंत गेला होता. मौ. आझाद यांनी तेव्हांपासून काँग्रेसची एकनिष्ठ सेवा केली आहे. मुसलमानांत राष्ट्रीय वृत्ति बाणविण्याचा प्रयत्न ते आज ४०/४५ वर्षे अखंड करीत आहेत. भारताच्या उत्कर्षाची जबाबदारी इतरांइतकीच, हिंदूंइतकीच मुसलमानांवरहि आहे, भारत हीच आमची मातृभूमि आहे, या भूमीवर बाहेरच्या मुस्लीमांनी आक्रमण केले तर त्या स्वधर्मीयांशींहि आम्ही लढूं, अशा तऱ्हेचे विचार इतरहि अनेक मुस्लीम पुढाऱ्यांनी या काळांत सांगितले होते. १९३१ सालीं लाहोर येथे नॅशनॅलिस्ट मुस्लीम कॉन्फरन्स भरली होती. मलिक बरकत अल्ली हे त्या वेळी स्वागताध्यक्ष होते. 'डॉ. इकबाल यांच्या पाकिस्तानच्या कल्पनेनें तुम्ही भ्रमून जाऊं नका. नव्या पिढीच्या मुस्लीमांना हिंदुस्थानच्या फाळणीची कल्पना कधीच मान्य होणार नाहीं.' असा उपदेश त्यांनी स्वबांधवांना त्या वेळी केला होता.
 पण यांतल्या कशाचाहि उपयोग झाला नाहीं. बॅ. जिना व त्यांचे पाकिस्तानवादी सहकारी यांचा प्रचारच प्रभावी ठरला. १९४६-४७ च्या निवडणुका या तत्त्वावर लढविल्या गेल्या आणि हिंदुस्थानच्या सर्व प्रांतांतील बहुसंख्य मुस्लीमांनी आपण पाकिस्तानवादी आहों, द्विराष्ट्रवादी आहों, भारताबद्दल आम्हांला आत्मीयता वाटत नाहीं, ही भूमि, हे लोक, ही संस्कृति यांचा आम्हांला संबंध नको, हा आपला निःसंदेह अभिप्राय प्रगट केला. आणि त्यामुळे काँग्रेसला हिंदुस्थानच्या फाळणीला मान्यता द्यावी लागली.
 या सर्व कालावधीत आणि विशेषतः १९२० नंतरच्या २०/२५ वर्षात मुस्लीम बांधवांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी आणि त्यांच्या मनांत राष्ट्रीय भावना निर्माण करून स्वातंत्र्यांच्या लढ्यांत त्यांचें साह्य प्राप्त करून घेण्यासाठी, हिंदूंनी व विशेषतः काँग्रेसने पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. 'स्वराज्याचे हक्क आमच्या मुस्लीम बांधवांना दिले तरी चालतील' असे टिळकांनी जाहीररीत्या सांगितले होते. पुढे काँग्रेसची सूत्रे महात्माजींच्या हातीं गेल्यानंतर, त्यांनी कसलाहि प्रयत्न करण्याचें बाकी ठेवले नाहीं. त्यांनी लढा सुरू केला तोच मुळीं मुसलमानांच्या खिलाफत प्रकरणासाठी सातआठ कोटी लोकांना, त्यांच्या धार्मिक असंतोषाचा फायदा घेऊन, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध उठावणी करण्यासाठी सज्ज करण्याचा गांधीजींचा तो प्रयत्न राजकीय मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने फारच अभिनंदनीय असा होता. अशा संग्रामांतूनच दोन भिन्न समाजांत ऐक्य भावना निर्माण होत असतात. पण आपल्यासाठी आपले हिंदुबांधव लढले, तेव्हां त्यांच्याशीं आपण सहकार्य करावें, समरस व्हावें, ही भावना मुस्लीमांच्या मनांत मुळींच निर्माण झाली नाहीं. उलट, काँग्रेसला जे तेज आलें तें आम्ही मुसलमान तिच्यांत सामील झालो म्हणून आले, अशी उपकारकर्त्याचीच प्रौढी त्या वेळी अनेक मुसलमानांनी मिरवली; म्हणजे खिलाफतीच्या लढ्यांत हिंदु आपले सहकारी झाले, असे तर त्यांना वाटले नाहींच; तर उलट, काँग्रेसमध्ये जाऊन हिंदूंवरच आपण उपकार करून ठेवले आहेत, अशीच त्यांची भावना झाली. स्वातंत्र्याच्या लढ्यांत सहभागी होणें म्हणजे हिंदूंवर उपकार करणे होय, असे मानणाऱ्या समाजाला तो लढा आपला वाटत नव्हता, ते स्वातंत्र्य त्याचें स्वतःचें ध्येय नव्हते, हे अगदीं स्पष्ट आहे; पण हे पाहूनहि महात्माजींनी आपल्या मनाला निराशेच्या आहारी जाऊं दिले नाहीं; आणि अगदी शेवटपर्यंत मुस्लीमांचा अनुनय करण्याची पराकाष्ठा केली. १९३७ साली काँग्रेसला सत्ता प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक प्रांतांतले मंत्री मुस्लीमांना संतुष्ट करण्यांत अहमहमिका करूं लागले. आणि आपण त्यांच्यासाठी कोणचीं कोणचीं सत्कृत्ये केली त्यांच्या याद्या ते जाहीर करूं लागले. सत्तारूढ झाल्यानंतर काँग्रेस अहिंसामंत्राचा जप करीत असली तरी अनेक मार्गांनीं ती हिंसा करीत होती. पण उत्तरेंतील अनेक प्रांतांत अनेक शहरी मुसलमानांची आक्रमणे नित्याची होऊन बसल्यावरहि हिंदूंना आत्मरक्षणासाठी तरी संघटित करावें हा विचार तिने मनात येऊ दिला नाहीं. कारण त्यामुळे हिंसा घडण्याचा संभव होता. आणि 'काँग्रेस हिंदूंची जपणूक करते' असा आरोप येण्याची शक्यता होती. हिंदूंची कत्तल झाल्याने हिंदुपक्षपातित्वाचा आरोप काँग्रेसवर येण्याचा मुळींच संभव नव्हता. पण मुस्लीम आक्रमणापासून आत्मरक्षण करण्यासाठीं संघटना केल्याने तो आला असता. म्हणून काँग्रेसने आपली शुद्ध भूमिका राखण्यासाठी पहिली गोष्ट डोळ्यांआड केली. वास्तविक काँग्रेसनें हिंदु व मुसलमान या दोन्ही धर्माच्या तरुणांची एकत्र संघटना करण्यास हरकत नव्हती. पण मुसलमानी आक्रमणाविरुद्ध उभारलेल्या संघटनेत मुसलमान तरुण येणार नाहीत, ही काँग्रेसची खात्री होती. आणि नुसत्या हिंदूंची संघटना ही जातीय ठरते, नुसत्या हिंदूंची कत्तल ही तशी ठरत नाहीं, असा पोक्त विचार करून काँग्रेसने कोणच्याहि प्रकारच्या संघटनेचा केव्हांहि विचार केला नाहीं. शेवटी काँग्रेसला पाकिस्तान द्यावे लागले याचे कारण असे सांगण्यांत येतें कीं, १९४६ च्या निवडणुकीत लीगला प्रचंड बहुमताने निवडून देऊन अखिल मुस्लीम समाज तिच्यामागे उभा राहिला आणि काँग्रेस ही स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला बांधलेली होती. पण हे कारण अगदी हास्यास्पद आहे. कारण पाकिस्तानामुळे मुसलमानांचा प्रश्न मुळींच सुटत नव्हता व सुटलाहि नाहीं. -७/८ कोटी मुसलमानांपैकी निम्म्याच्यावर मुसलमान अजून हिंदुस्थानांतच आहेत. आणि जे १/२ कोटी हिंदु पाकिस्तानांत आहेत त्यांच्याहि स्वयंनिर्णयाचा विचार काँग्रेसने करावयास हवा होता. पाकिस्तानांत राहिलेल्या हिंदूचे पुढे काय होईल याची कल्पना काँग्रेसला नसेल असेहि म्हणणे शक्य नाहीं. असे असूनहि काँग्रेसनें पाकिस्तानाला मान्यता दिली, याचें खरें कारण म्हणजे मुस्लिमांनी केलेली 'डायरेक्ट ॲक्शनची' उठावणी हे होय. १५ ऑगस्ट १९४७ च्या आधी वर्षभर मुसलमानांनी जाळपोळ, विध्वंस, कत्तली करून सर्वत्र नोआखलीचे वातावरण निर्माण केले होते. यावेळी या अत्याचाराला तोंड देऊन आत्मरक्षण करण्याइतकी संघटना काँग्रेसनें तयार ठेवली असती तर ते अत्याचार अशक्य झाले असते आणि पाकिस्तानची कल्पना वाऱ्यावर विरून गेली असती. पण मुसलमानांना विरोध करणे म्हणजे जातीयता, आणि संघटना म्हणजे हिंसा, हे काँग्रेसचें विचारसूत्र ठरून गेले होते. त्यामुळे डायरेक्ट ॲक्शनला तोंड देणें हे काँग्रेसला कालत्रयी शक्य झाले नसतें. काँग्रेसचें हे तत्वज्ञान पाकिस्ताननिर्मितीला बऱ्याच अंशी कारण झालेलें आहे, हे आज तरी आपण विसरूं नये. इतिहासांतील घटितें आपणांस बदलतां येतील हे खरे नाहीं. पण भावी घटितें टाळतां येतील, हे निश्चित खरें आहे. आणि पाकिस्तान होण्याचें हे कारण आपण दृष्टिआड केले तर यापुढेहि अनेक पाकिस्तानें निर्माण होणे अशक्य नाहीं. कारण, हिंदुस्थानांतील ४/५ कोटी मुसलमानांना अजूनहि स्वयंनिर्णयाचा हक्क आहेच ! हैद्राबाद, अलीगड येथें त्या दृष्टीनें हालचालीहि चालू असाव्या असे दिसतें. आणि निधर्मीपणा व अहिंसा यांचे सध्यांचे अर्थ जोपर्यंत आपल्या मनांत रूढ आहेत तोपर्यंत आणखी दहापांच लाख हिंदूंची हिंसा होऊन आहे या हिंदुस्थानांतून दुसरे एक पाकिस्तान पुढील पंचवीस तीस वर्षांत निर्माण होणे अगदी असंभवनीय आहे असे मानण्याचे कारण नाहीं.
 हिंदु-मुसलमानांच्या संघर्षाचा व या दोन समाजांचे ऐक्य घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा गेल्या पन्नास पाऊणशे वर्षांचा इतिहास आपण पाहिला तर ऐक्य घडविण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी अनेकपरीने केले असले तरी खऱ्या दिशेने ऐक्यप्रयत्न कोणींच केलेले नाहींत हे थोडा विचार केला असतां सहज कळून येईल. अनेक देशांतील लोकसत्तांचा आणि त्यांतहि ब्रिटिश लोकसत्तेचा अभ्यास फार बारकाईने केला तर त्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येईल कीं, ब्रिटनमध्ये गेल्या तीनचार शतकांत मानवाच्या मनाची घडण समूळ बदलली असल्यामुळेच तेथे समाजसंघटना व लोकसत्ता ही शक्य झाली आहे. विद्येचे पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा व सामाजिक क्रांति हीं तीन मन्वंतरें ब्रिटनमध्ये व थोड्याफार अंशानें पश्चिम युरोपांतील सर्व देशांमध्ये घडून गेल्यावरच तेथें राष्ट्रनिष्ठा दृढमूल झाली व वाढीस लागली. राष्ट्रनिष्ठा ही लोकसत्तेची पूर्व अवस्था आहे. कारण धार्मिक सहिष्णुता, सामाजिक समता व राजकीय प्रबुद्धता यावांचून राष्ट्रनिष्ठा संभवत नाहीं. माझ्या भूमींत रहाणारे सर्व लोक- मग ते भिन्न धर्माचे, पंथाचे, वर्गाचे कसेहि असले तरी माझे बांधव आहेत आणि इतर भूमींतल्या कोणच्याहि मानवापेक्षां- स्वधर्मीयापेक्षांहि- ते मला जवळचे आहेत, ही भावना वरील तीन गुणांवांचून निर्माण होणे शक्य नाहीं. आणि सहिष्णुता, समता व प्रबुद्धता निर्माण होण्यासाठी रेनेसान्स, रेफर्मेशन व रेव्होल्यूशन- विद्येचे पुनरुज्जीवन, धर्मक्रान्ति व सामाजिक क्रान्ति- या मन्वंतरांतून समाज जाणे अवश्य आहे. पुनरुज्जीवनांतून मानवता व बुद्धिप्रामाण्य यांचे संस्कार होतात. धर्मसुधारणेंतून आचारविचारांचे कर्मकांड, अंधनिष्ठा, असहिष्णुता, धर्माधिकाऱ्यांचे वर्चस्व या घातक गोष्टी नष्ट होऊन मनाला औदार्य प्राप्त होते आणि सामाजिक क्रान्तींतून समता, बंधुता व स्वातंत्र्य यांचे प्रगल्भ संस्कार मनावर होतात. हे सर्व संस्कार मनावर होऊन मानवाच्या मनाची घडण समूळ बदलल्यावांचून देशांत राष्ट्रनिष्ठा निर्माण होत नाहीं. व तिच्यावर अवलंबून असलेली लोकशाही ही तर बाह्यरूपांतहि अवतरत नाहीं.
 भारताचें दुर्दैव असें कीं येथील मुसलमान समाज या मन्वंतरांतून गेला नाहीं. हिंदुमुसलमानांची समस्या अत्यंत बिकट होऊन बसली याचें मुख्य कारण हे आहे. भारताच्या लोकसत्तेचा विचार करतांना गेल्या अनेक प्रकरणांतून राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर, विवेकानंद यांनी आपल्या देशांत हीं मन्वन्तरें कशी निर्माण केलीं तें सविस्तर सांगितले आहे. आपल्या मुस्लीम बांधवांतहि आरंभी या चळवळी कांहीं अंशी सुरू झाल्या. पण पुढे त्यांचा प्रसार झाला नाहीं. त्यामुळे त्यांच्यावर जुन्या अंधनिष्ठांचे वर्चस्व बव्हंशीं जसेच्या तसे कायम आहे. उदारमतवाद त्या समाजांत प्रसृत झालाच नाहीं. आणि त्याचा प्रसार झाला नाही तोपर्यंत बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ होत. तुर्कस्थान, अरबस्तात, इजिप्त, इराक, इराण, अफगाणिस्तान, इ. मुस्लीम राष्ट्रांतील सध्यांच्या घडामोडी आपण पाहिल्या, तर या मन्वंतरांची लोकसत्तेला किती आवश्यकता आहे हे सहज कळून येईल. तुर्कस्थानाला केमालपाशासारखा अलौकिक प्रभावी व समर्थ नेता मिळाल्यामुळे तेथील राष्ट्रघटना यशस्वी झाली व तेथील लोकसत्ताहि यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. तुर्कीच्या लोकसत्तेचा आपण अभ्यास केला तर त्यावरून आपणांस हेंच दिसून येईल. 'मी माझा देश आशियांतून उचलून युरोपांत नेऊन ठेवीन अशी केमालपाशाची प्रतिज्ञा होती. त्या प्रतिज्ञेचा दुसरा काय अर्थ आहे? 'वरील तीनहि मन्वंतरें मी तुर्कस्थानांत घडवून आणीन' हाच तिचा भावार्थ आहे. तुर्कस्थानचा गेल्या तीस वर्षांचा इतिहास पाहिला तर असे दिसून येतें कीं भारतांत हिंदुमुसलमानांचें ऐक्य घडून येण्यासाठी मुसलमान समाजांत जी निष्ठांची क्रांति घडून येणें अवश्य आहे असे भारतीयांना वाटतें ती क्रान्ति तेथें घडून आलेली आहे.
 ३ मार्च १९२४ रोजीं तुर्की लोकसभेपुढे केलेल्या भाषणांत केमाल पाशानें आपलें धोरण अगदीं स्पष्ट शब्दांत मांडलें आहे. 'यापुढे राजसत्तेचा व धर्माचा संबंध रहाणार नाहीं. विज्ञानाच्या पायावर शासनाची उभारणी होईल, जुनाट धर्मकल्पनांनी चालणारी न्यायमंदिरें व जुनीं धर्मशासनें नष्ट करून त्याजागी नवे शास्त्रशुद्ध निर्बंध आपण निर्माण केले पाहिजेत.' असे धोरण जाहीर करून केमालपाशानें कठोर निश्चयाने ते अमलांत आणलें. अंध धर्मनिष्ठेमुळे आरबी संस्कृति व आरबी भाषा यांचे जगांतल्या सर्व मुसलमानांवर वर्चस्व असतें. आतां राष्ट्रनिष्ठेला महत्त्व आल्यामुळे केमाल पाशानें तें वर्चस्व नष्ट करून टाकले. आणि तुर्कभूमीत निर्माण झालेले जे जे वैभव, त्याचा अभिमान धरण्यास त्यानें तुर्की लोकांना शिकविले. कुराण हा धर्मग्रंथ त्याला मान्य होता, पण तो तुर्की भाषेतून पढला पाहिजे, प्रार्थना तुर्कीतून झाल्या पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. स्वधर्मीयांखेरीज इतरांना काफर समजण्याची मुसलमानांची रीत आहे. ती त्यानें निषिद्ध मानली. महंमद पैगंबरांच्या पूर्वी होऊन गेलेले तुर्की थोर पुरुष मुसलमान असणे शक्य नव्हतें. इतके दिवस त्यांना कोणी वंद्य मानीत नसे. कारण ते विधर्मी होते. आतां दृष्टिकोन बदलला. अरबस्तानांतील मुसलमान थोर पुरुषांपेक्षां हे विधर्मी तुर्की थोर पुरुष आपणाला जास्त वंद्य होत, अशी भावना तुर्कस्थानांत सर्वत्र बळावली. पॅन इस्लामिझमच्या चळवळीचा तुर्की लोक आतां निषेध करूं लागले. कारण ती संघटना जुन्या अंध धर्मवेडाच्या पायावर उभारली होती. तुर्कांखेरीज इतर मुसलमानांशी आमचा इतर धर्मीयांप्रमाणेच संबंध राहील, इतरांपेक्षां आम्ही त्यांना जास्त जवळचे मानणार नाहीं, असे तुर्क राष्ट्राने जाहीर केलें. तुर्कस्थानामागोमाग इजिप्त, सिरिया, इत्यादि मुसलमान राष्ट्रांनी हेंच धोरण अंगीकारलें, इजिप्तच्या राष्ट्रसभेचे चिटणीस हमीद् अल अलेली १९१० सालच्या आपल्या भाषणांत म्हणतात- 'ज्यांनीं पिरामिड उभारले, युरोपचें अस्तित्व नव्हते तेव्हां ज्यांनीं संस्कृति निर्माण करून तिचा प्रसार केला, त्यांचे कर्तृत्व, त्यांची प्रज्ञा आमच्या रक्तांत आहे.' पिरामिडचे निर्माते व इजिप्तचा प्राचीन ग्रंथ 'बुक ऑफ दि डेड' याचे कर्ते अर्थातच मुसलमान नव्हते. त्यामुळे ७ व्या शतकांत इजिप्त हा इस्लामधर्मी झाल्यापासून गेलीं १२०० वर्षे इजिप्तमध्ये या पूर्वजांचा कोणी अभिमान धरीत नव्हते. पण आतां इजिप्तमध्ये राष्ट्रभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अभिमानविषयांत धर्मदृष्टीपेक्षां राष्ट्रदृष्टि बळावली आणि हे पूर्वज वंद्य ठरले. त्यांचें रक्त आपल्या अंगांत आहे याचा इजिप्तमधल्या मुसलमानांना अभिमान वाटू लागला.
 हिंदुस्थानांतील मुसलमानांमध्यें ही राष्ट्रीय दृष्टि निर्माण झाली तरच हिंदु मुसलमानांचे ऐक्य शक्य आहे. तरच भारतीय समाज अभंग व संघटित होईल. पण हे घडविणे सर्वस्वी मुस्लीम नेत्यांच्या हाती आहे. जुन्या मुल्लामौलवींचीं वचनें, जुने धर्मग्रंथ, जुन्या रूढी हे विषय अत्यंत नाजुक असतात. त्यांत सुधारणा किंवा क्रान्ति घडवावयाची ती स्वधर्मीयांनीच घडविली पाहिजे. अन्यधर्मी मनुष्याच्या उपदेशाचा परिणाम समाजावर या बाबतींत अगदी विपरीत होतो. तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया या देशांतील धार्मिक व सामाजिक क्रान्ति ही त्या त्या देशांतील मुस्लीम नेत्यांनीच घडविली आहे. त्याप्रमाणे हिंदुस्थानांत झाले तरच मुसलमान समाज पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा, सामाजिक क्रान्ति या मन्वन्तरांतून जाईल व त्याच्या ठायी भारतीय राष्ट्राविषयी आपलेपणा निर्माण होईल. आज राम, कृष्ण, शिवाजी, टिळकं, गांधी या भारताच्या महापुरुषांविषयीं मुसलमानांना आदर नाहीं. एक सबंध राष्ट्र निर्माण करणाऱ्या शिवाजीपेक्षां त्यांना अफजुलखान श्रेष्ठ वाटतो. कारण शिवाजी विधर्मी व अफजुलखान मुस्लीम होता. डॉ. शोकत उल्ला अन्सारी यांनी मुसलमानांना काँग्रेस राज्याचा संताप व द्वेष वाटू लागण्याचीं जीं कारणे दिली आहेत त्यांत गांधीजयंति व टिळकपुण्यतिथि काँग्रेसने सरकारीरीत्या साजरी केली हे एक कारण म्हणून दिले आहे. व्यासवाल्मीकीसारखे महापुरुष, रामायण महाभारतासारखे ग्रंथ, संस्कृत भाषा, वन्देमातरम् हे राष्ट्रगीत या सर्वांचा मुसलमानांना द्वेष वाटतो. याचें कारण एकच आहे. आणि ते म्हणजे हे सर्व विधर्मीयांचे आहे. वास्तविक हे पुरुष, हे ग्रंथ, ही भाषा आज आपल्या अंगभूत गुणांनींच जगद् वंद्य ठरली आहेत. सर्व जग त्यांचा अभिमान बाळगते आणि हे आपल्या भारताचें वैभव म्हणून, तुर्कस्थान, इजिप्त येथील मुस्लीम राष्ट्रनेत्यांच्या धोरणानें पाहिले तर, येथील मुसलमानांना त्याचा जास्तच अभिमान वाटावा. पण जुन्या अंध धर्मनिष्ठा नाहींशा करून इस्लामला जे उदात्त रूप तुर्की नेत्यांनी दिले आहे तसे भारतांत देणारा नेता येथे झाला नाहीं. त्यानें मुस्लिमांना नव्या मन्वन्तरांतून नेलें नाहीं. ते होत नाही तोपर्यंत मुसलमानांना भरतभूमीच्या या वैभवाविषयीं प्रेम वाटणे शक्य नाहीं व हिंदुमुसलमानांचे ऐक्य यालाहि अर्थ नाहीं.
 आतांपर्यंत भारतांतील नेत्यांनी हिंदुमुसलमानांच्या ऐक्याचें पुष्कळच प्रयत्न केले. पण त्यांत या मूळ महातत्त्वाचा विचारहि कोणी केला नाहीं. काँग्रेसचे प्रयत्न झाले ते सर्व, हिंदूंना इतक्या जागा मिळाल्या तर मुसलमानांना किती, कोणच्या सवलती मुसलमानांना दिल्या म्हणजे ते किती प्रमाणांत या राष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामांत सहभागी होतील, असे देवघेवीच्या, व्यापारी व्यवहाराच्या स्वरूपाचे होते. मुसलमानांचा पाकिस्तानचा अट्टाहास सुरू झाल्यानंतरहि सर्वपक्षीय परिषदेत पं. कुंझरू यांनी अशी योजना सुचविली की, हरिजन सोडून राहिलेल्या हिंदुमुसलमान समाजांत दोन्ही जमातींना समान प्रतिनिधित्व द्यावें. आणि ही सूचना स्वीकार्य आहे, योग्य आहे असा आचार्य जावडेकरांनी आपला अभिप्राय दिला आहे. मुसलमान पुढाऱ्यांशी जेव्हा जेव्हां काँग्रेसच्या नेत्यांच्या वाटाघाटी होत तेव्हां तेव्हां त्यांचे स्वरूप याच प्रकारचे असे. हिंदूंनी मुसलमानांना काय द्यावे व त्याच्या बदल्यांत मुसलमानांनीं काय मान्य करावें. आरंभीच्या काळांत या प्रयत्नांना अर्थ होता. पण खिलाफत प्रकरणानंतर मुसलमान काँग्रेसपासून दूर झाल्यानंतर पुन्हां तसल्याच प्रकारच्या प्रयत्नांना कांहींहि अर्थ नव्हता. त्यांचे अंध धर्मवेड नाहीसे झाल्यावांचून ऐक्याची भाषा करण्यांत कांहीं अर्थ नाहीं, हें त्याच वेळीं स्पष्ट झाले होते. पण त्यानंतरहि अगदी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत व्यापारी करारमदारांच्या स्वरूपाचेच प्रयत्न चालू होते. प्रारंभीचा अनुभव जमेला धरून ही भूमि, येथली परंपरा येथले महापुरुष यांच्याबद्दल आपुलकी वाटल्यावांचून मुसलमानांशीं ऐक्य शक्य नाहीं हें काँग्रेसनेत्यांनी एकतर जाणलें नसावें किंवा जाणूनहि त्यांना बोलण्याचें धैर्य झाले नसावें. जाणले नसावे असे वाटत नाहीं. कारण रामाबरोबर रहीमाचा व कृष्णाबरोबर करीमाचा जयघोष करणे अवश्य आहे, यानेंच ऐक्य होणार आहे, हे काँग्रेसनेत्यांच्या ध्यानीं आले होते आणि तसा जप व जयघोष हिंदूंनीं सुरूहि केला होता. पण मुसलमानांनी रहिमाबरोबर रामाचा व करीमाबरोबर कृष्णाचा जप करणे अवश्य, असा त्यांना उपदेश यांनी कधी केला नाहीं. इतकेच नव्हे तर, ज्या सभेंत मुसलमान आहेत तेथें आपल्या परंपरेबद्दल आपणच मुग्ध रहावें, तिच्या अभिमानाचा उच्चार करूं नये, असे धोरणच काँग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारले. तें कांहीं असो. एवढे खरें कीं पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा व सामाजिक क्रान्ति या मन्वंतरांतून मुसलमान समाज जाणें अवश्य आहे, त्यावांचून या भूमीबद्दल मुसलमानांना आपलेपणा वाटणे अशक्य आहे, महान् सत्य डोळ्यांपुढे ठेवून काँग्रेसने आपले घोरण आंखले नव्हते यांत शंका नाहीं.
 मार्क्सवादी लोकांना तर या मन्वंतरांचें मुळींच महत्त्व वाटत नाहीं. त्यांच्या अर्थवादी एकांतिक अंध दृष्टीमुळे, धर्मवेडाला स्वतंत्र अस्तित्व आहे हेच त्यांना मान्य नाहीं. धर्मनिष्ठा, शब्दप्रामाण्य, सामाजिक, उच्चनीचता हे सर्व धनवंतांनी धनहीनांना भरडून काढण्यासाठी निर्माण केलेले भ्रम आहेत, असाच त्यांचा सिद्धांत आहे. त्यामुळे वर्गविग्रहाची आग पेटवून दिली की हे भ्रम आपोआपच नष्ट होतील, अशी त्यांची कल्पना होती. पण जगांतल्या इतर देशांप्रमाणेच हिंदुस्थानांतहि धर्मवेड हा भ्रम ठरण्याऐवजी कम्युनिस्टांचे त्याविषयींचे सिद्धांत हाच भ्रम ठरला. मुंबई, कलकत्ता, नागपूर, कानपूर, इ. शहरी कामगारांच्या प्रचंड संघटना मार्क्सवादी लोकांनी उभारल्या होत्या. त्यांत मुस्लीम कामगारहि सामील झालेले होतेच. पण मार्क्सवादाच्या वीसपंचवीस वर्षांच्या शिकवणुकीनंतरहि, वर्गलढ्याचें तत्त्वज्ञान अहोरात्र कानावर पडत असतांहि, धर्माच्या तत्त्वावर हिंदुस्थानची फाळणी केली पाहिजे, असाच या पुरोगामी, क्रान्तीच्या आघाडीवर असलेल्या मुस्लीम कामगार वर्गाने निर्णय दिला. आणि हिंदु भांडवलदार आणि जमीनदार व मुसलमान भांडवलदार व जमीनदार यांना आम्ही समान लेखीत नसून हिंदू धनिकांना दूरचे लेखतो व मुसलमान धनिकांना आपले मानतो, हे स्पष्ट केलें. हिंदुकामगारांविषयी स्ववर्गीय म्हणून त्यांना जिव्हाळा वाटला नाहीं; मुसलमान धनिकांविषयीं स्वधर्मीय म्हणून आपलेपणा वाटला ही गोष्ट सर्व कामगार एकजात लीगच्या मागें उभे राहिले यावरून सिद्ध झाली. आचार्य जावडेकर हे एकांतिक मार्क्सवादी नाहींत. पण त्यांनी सुद्धां म्हटले आहे की, 'हिंदुस्थानचे अखंडत्व हें धर्मातीत राष्ट्रीय वृत्तीवर अवलंबून आहे. व ही धर्मातीत राष्ट्रीय वृत्ति मध्यमवर्गापेक्षां किंवा वरिष्ठवर्गापेक्षां कनिष्ठ शेतकरीकामकरी वर्गात जागृत होणें व टिकणें अधिक सुलभ आहे.' (हिंदु-मुसलमान ऐक्य. पृ. १६२) असें आचार्यांनी कां म्हणावे हे ध्यानांत येत नाहीं. गांधीपंथांत एकंदरच अज्ञानाविषयी जास्त प्रेम आहे ते येथे प्रभावी झाले असावे असे वाटते. एरवीं आचार्यांनी असे लिहिले नसते. कारण धर्मातीत मनोवृत्तीचा संबंध प्राधान्यानें बुद्धिप्रामाण्य, विवेकनिष्ठा यांच्याशी असतो. आणि इतिहास, तत्त्वज्ञान, भिन्न भिन्न विज्ञानशाखा यांच्या अभ्यासानें बुद्धिप्रामाण्य निर्माण होतें. युरोपांत विज्ञानाची जेव्हां प्रगति झाली तेव्हांच धर्मातीत राष्ट्रीय वृति निर्माण झाली. आणि ती प्रथम विद्यासंपन्न मध्यमवर्गात व वरिष्ठ वर्गातच झाली. शेतकरी कामकरी वर्गात प्रथम विज्ञान पसरलें तेव्हांच हे लोण तेथपर्यंत पोचलें. आचार्यांनी अन्यत्र रेनेसान्स, रेफर्मेशन, रेव्होल्यूशन यांची महती मान्य केली आहे. पण येथें त्यांचा दृष्टिकोन मार्क्सप्रणीत आर्थिक तत्त्वज्ञानानें झाकोळल्यासारखा दिसतो.
 असो, तात्पर्यार्थ असा कीं, हिंदुमुसलमानाचें ऐक्य घडविण्याचा महत्त्वाचा व मुख्य मार्ग म्हणजे मुस्लीम समाजांत आमूलाग्र मानसिक परिवर्तन घडून येणे, हा होय. आणि त्या परिवर्तनाचे मुख्य साधन म्हणजे राममोहन, आगरकर, विवेकानंद यांनी हिंदुसमाजांत प्रसृत केलेली बुद्धिवादी विचारसरणी हें होय. मुस्लीमांनी हिंदुस्थानला आपली मातृभूमि मानावी व तिच्या उन्नतीचा भार आपल्या शिरावर घ्यावा, या मताचे अनेक मुसलमान पंडित व लेखक भारतांत आहेत, हे आरंभी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट आहे. या विचारवंत मुस्लीमांना ही राष्ट्रनिष्ठा आपल्या समाजांत निर्माण व्हावी असे वाटत असेल, तर त्यांनीं वर निर्दिष्ट केलेल्या मन्वंतरांतून आपल्या बांधवांना नेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. या कार्यात यश आले तर त्यांनाच येईल, इतर समाजांतल्या नेत्यांचा येथे कांहीं उपयोग नाहीं. म्हणून, भरतभूमि हीच आपली मातृभूमि अशी त्यांची खरोखरच कृतबुद्धि असेल तर त्यांनीं 'मातृभूमीची निष्ठा' या शब्दांत समाविष्ट असलेल्या सर्व भावना मुसलमान समाजांत निर्माण करण्याची कसोशी केली पाहिजे.
 मुसलमान समाजांत धर्मातीत राष्ट्रीय दृष्टि निर्माण करण्याच्या या प्रयत्नांत यश कितपत येईल हे सांगता येत नाहीं. आज तर मनाला निराशाच वाटत आहे. संधि सांपडेल तेव्हां जबाबदारीच्या अधिकारावरचे मुस्लीम लोकहि येथले कागदपत्र घेऊन पाकिस्तानांत पळून जात आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवालाहि कोठें विरोध होत आहे. मुस्लीम लीगच्या पुनरुद्धाराचे प्रयत्न कोठे चालू झाले आहेत. मशिदीची सबब पुढे काढून हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमान पूर्वीप्रमाणेच हल्ले करीत आहेत. पाकिस्तानचें निशाणहि हिंदुस्थानांत उभारण्याचे कोठें कोठें प्रयत्न होत आहेत. आणि सर्वात भयंकर म्हणजे श्रीशिवछत्रपतींची अत्यंत निरर्गल अशी निंदा महाराष्ट्रांतहि कांहीं मुसलमान करीत आहेत. हे चालू आहे तोपर्यंत या दोन समाजांची संघटना होणे अशक्य आहे.
 तथापि अशाहि स्थितींत क्वचित् कोठें आशेचे किरण दिसत असल्याचा भास एकादे वेळीं होतो. काश्मीरप्रकरण हें अशापैकींच एक आहे, असे केव्हां केव्हां वाटतें. काश्मिरी मुसलमानांना पाकिस्तानांत जावयाचेंच असते तर त्यांना कोणी अडवूं शकला असता, असें वाटत नाहीं. असे असूनहि दृढनिश्चयाने भारतांतच रहावयाचें, असें तेथील नेत्यांनी व जनतेनें ठरविले आहे. तेथील नेते मधूनमधून कांहीं भाषणे अशीं करतात की, त्यांच्या भारतनिष्ठेविषयी व राष्ट्रीयतेविषयी शंका यावी. पण पुन्हां पुन्हां ते ती भाषणे रद्द करून भारतांत रहाण्याचा निश्चय प्रगट करतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तरी निश्चित होते कीं, केवळ स्वधर्मीय ते आपले, अशी अंधनिष्ठा काश्मिरी मुसलमानांत नाहीं. अन्यधर्मीयांशीं राष्ट्रीय ऐक्यभावनेनें ते संघटित होण्याची शक्यता आहे, अशी आशा या घटनेवरून वाटते. खान अबदुल गफरखान यांची 'खुदा ई खिदमतगार' ही संघटना म्हणजे अशाच प्रकारचा एक आशेचा किरण होता. आज वायव्य प्रांत हा पाकिस्तानांत समाविष्ट झाल्यामुळे त्याचें फारसे व्यावहारिक महत्त्व नाहीं. पण तात्त्विक दृष्ट्या त्याला अजूनहि महत्त्व आहे. धर्मातीत राष्ट्रीय दृष्टि कडव्या पठाण जमातीतहि निर्माण होऊ शकते, याचा तो पुरावा आहे. काश्मीर, वायव्य प्रांत या प्रदेशांत जे झाले ते भारताच्या इतर भागांतहि होण्याची शक्यता आहे, असें तात्त्विक दृष्टीने तरी म्हणावयास हरकत नाहीं. कलकत्याचे रेझा ऊल करीम, मुंबईचे अकबरअल्ली मिर्झा यांसारख्या कांहीं पंडितांना परंपरेच्या अभिमानाचे महत्त्वाह पटले आहे असे दिसते. 'पाकिस्तान एक्झॅमिन्ड' या आपल्या पुस्तकांत रेझा ऊल करीम म्हणतात -

 'मुसलमानांना अनेक शतके या भूमीनें पोसले आहे. त्यांचा आतां अरबस्तान, इराण या देशांशी कांहींएक संबंध नाहीं. आतां हिंदुस्थान हीच आमची मातृभूमि आहे. वेद, उपनिषदें, रामायण, महाभारत ही माझीच धनदौलत आहे. रामसीता, अशोक, अकबर, कालिदास, अमीर खुश्रू ही माझी थोर परंपरा आहे. हिच्यापासून मला कोणीहि तोडून काढू शकणार नाही. तिच्यांत कांहीं दोष असतीलहि; पण ती माझी म्हणूनच मला प्रिय आहे. मुसलमानांनी ही वृत्ति दाखविली तर हिंदू तर काय आपल्या परंपरेंत सर्व थोर विभूति समाविष्ट करून घेण्यास एका पायावर तयार आहेत. आर्य, अनार्य, द्रवीड, दास, दस्यु, आदिवासी या सर्वांच्या परंपरा एकजीव करून टाकूनच आतांपर्यंतचे वैभव भारतीयांनीं विकसित केले आहे. दशावतार, विष्णुसहस्रनाम, गीतेंतील विभूतियोगाचा अध्याय, लग्नांतील गोंधळ-प्रसंगीचें देवताआवाहन, पंचायतनपूजा, हीं सर्व हिंदूंच्या या वृत्तीची लक्षणे आहेत. अर्वाचीन काळांतहि कृष्णकरीम, रामरहीम हा जयघोष त्याच वृत्तींतून उद्भवलेला आहे; पण याच्या बुडाशी असलेली व्यापक, उदार, धर्मांतीत दृष्टि आमच्या मुस्लीम बांधवांत निर्माण होत नाहीं, हीच काय ती उणीव आहे आणि त्यामुळेच ही समस्या बिकट होऊन बसली आहे.
 लूथरच्या धर्मसुधारणेनंतर पश्चिम युरोपांतील देशांत कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे दोन तट पडले. आणि जवळ जवळ प्रत्येक देशांत भयंकर यादवी युद्धे झाली. यांतून मुक्त राहिले असे फक्त ब्रिटन. प्रोटेस्टंट इंग्लंडचा संपूर्ण नाश करण्यासाठीं पोपच्या प्रेरणेनें स्पेनच्या कॅथॉलिक राजानें इंग्लंडवर आरमाडा धाडला होता. म्हणजे ते युद्ध कॅथॉलिक व प्रोटेस्टंट या तत्त्वावर होणार होतें. अशा वेळी कॅथॉलिक शत्रूला तोंड देण्यासाठी उभारलेल्या सेनेचें आधिपत्य इंग्लंडनें एका कॅथॉलिक सेनापतीकडेच दिले होतें. आपल्या लोकांच्या धर्मातीत राष्ट्रीय निष्ठेवर इंग्लिश जनतेचा इतका विश्वास होता. अशा तऱ्हेचा विश्वास आज हिंदुमुसलमानांचा परस्परांवर नाहीं. तो निर्माण झाल्यावांचून या दोन समाजांची संघटना होणे अशक्य आहे. वर सांगितलेलीं मन्वंतरें मुस्लीम समाजांत घडून येणे या गोष्टीमुळे याची केवळ पूर्व तयारी होईल. भविष्यकालांत होणाऱ्या अनेक संग्रामांत या भूमीच्या संरक्षणार्थ, तिच्या उत्कर्षासाठी, तिच्या जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी, तिच्या अनंतविध समस्या सोडविण्यासाठी हे दोन्ही समाज सारख्याच आत्मीयतेने सहभागी होतील, शरीर झिजवितील, यातना भोगतील, रक्त सांडतील, आत्मबलिदान करतील, त्याच वेळी त्यांची एकमेकांविषयींची साशंकता नष्ट होईल व भारतीय समाज एकजीव होईल. हे सर्व घडवून आणणे येथील भारतनिष्ठ मुस्लीम नेत्यांच्या हाती आहे. केमालपाशाच्या धैर्यानें त्यांनीं स्वबांधवांना धर्मयुगांतून विज्ञानयुगांत आणून सोडले तरच हिंदु व मुसलमान या दोन समाजांचें एक राष्ट्र घडून येईल.