Jump to content

पान:Paripurti.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ३१
 

महिन्यांनी परत कोर्टात हजर राहण्याचा हुकूम दिला. ते प्रकरण गेल्यावर सगळ्यांनी मला विचारले, "आता त्यानं तिचा जीव घेतला तर?" मी म्हटले, “पाहू या काय होतं. तुम्ही लांबून नजर ठेवा, आणि सतरांदा जाऊन त्यांना सतावू नका." मी हे सर्व जवळजवळ विसरून गेले होते, तो सहा महिन्यांनी ऑफिसरने आणून दोघांनाही हजर केले. “काय रे, ठीक चाललं आहे ना?" नवरा ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला, "हां जी." बायकोला विचारले, "काय ग, तुझं म्हणणं काय आहे?" ती आज माझ्या डोळ्याला डोळा भिडवायला तयार नव्हती. तिचा बेगुमानपणा पार नाहीसा झाला होता. मी तिला परत विचारले, "नवरा मारतो का ग?" “फार नाही जी." तिने उत्तर दिले. दोघांनाही काहीतरी बोलायचे होते, पण ती घोटाळत उभी होती. इतक्यात तिची आई पुढे झाली व "मुलीला माहेराला न्यायचे आता दिवस आहेत, नेऊ का?" म्हणून विचारू लागली. मी मुकाट्याने दोघा व्याहीविहिणीवरची बंदी उठवली आणि 'शेवट समाधानकारक लागला.' असा शेरा मारून केस निकालात काढली.
 आज ह्या पूर्वीच्या गोष्टी पुन्हा आठवल्या. गाडीत मनस्वी गर्दी होती दुसऱ्या वर्गातसुद्धा लोक उभे होते. मी माझ्या पेटीवर एका कोपऱ्यात बसले होते. तो माझे लक्ष पुढेच उभ्या राहिलेल्या एका तरुण बाईकडे गेले, व मी तिला माझ्याजवळ पेटीवर जागा करून बसायला बोलावले. गेला अर्धा तास स्टेशनवर इकडेतिकडे जाताना मी तिला पाहिले होते. आम्ही अगदी जवळजवळ खेटूनच माझ्या लहानशा पेटीवर बसलो. तिने थोड्या वेळाने विचारले, "तुम्ही आमक्या-अमक्या ना?" मी "होय" म्हणून अर्थातच तिला "तुम्ही कोण?" म्हणून प्रश्न केला. तिने आपले नाव सांगितले, मी म्हटले, "हां, तुमच्या कविता मी वाचल्या आहेत; त्याच ना तुम्ही?" तिचा काळासावळा पण मोहक चेहरा आनंदाने खुलला. मला तिचा चेहरा गोड व निर्व्याज वाटला. तिचे बोलणे सरळ व खुलास होते. बांधा ठेंगणाच होता. अंगापिंडानेही ती चांगली सशक्त दिसली. थोडक्यात सांगायचे म्हणजे चार महाराष्ट्रीय बाया असतात तशी ती होती. तिने मोठ्या उत्साहाने आपल्या कामाची माहिती दिली. आपले मुख्य कसे दिलदार आहेत- त्यांचे बोलणे- चालणे कसे मनमोकळे असते, काही चुकले तर ते कसे नीट समजावून सांगतात, वगैरे गोष्टी मला ऐकवल्या. तिच्या कचेरीतील मुख्य मला ठाऊक होते. कोणावरही चटकन छाप बसावी असे ते होते. त्यांचा देह धिप्पाड,