पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाळपोळ होईल, रक्तपात होईल. त्या इमारतीसमोर मिरवणूक चार वाजता येईल. तोपर्यंत ध्वज निघाला नाही तर सराफा लुटण्यापासून दंगलींना आरंभ होईल. आणि ताबडतोब सारे नांदेड भयग्रस्त झाले. आज मरण आहे याची जाणीव एकदम सर्वांना झाली. नित्याप्रमाणे सडकेवरून निःशस्त्र गांजवे नम्रपणे चर्चा करीत हिंडत होते. त्यांच्या बोलण्यातला संथपणा व चेहऱ्यावरचे हसू कायम होते. दंगलींना आरंभ झाला तर समोर पहिला बळी गांजवेच होते. त्यानंतर उभयपक्षी युद्ध सुरू झाले असते. या दिवशी हिंदूंना दुकाने उघडण्याची हिंमत नव्हती. सडकेवरून हिंडण्याची भीती वाटे.

 सकाळपासून गांजवे यांच्याकडे शिष्टमंडळे येण्यास आरंभ झाला. प्रथम रावसाहेब मुळावेकरांच्या नेतृत्वाखाली वकिलांचे शिष्टमंडळ आले. होळीवरील शंभरसव्वाशे घरे प्रतिकाराचा प्रयत्न करतील पण उरलेल्या नांदेड शहराचा बचाव कोण करील? आपल्या हट्टापायी गावाची राखरांगोळी करू नका, अशी त्यांनी मागणी केली. गांजवे यांनी नम्रपणे सांगितले की, आम्ही तर तळहातावर शिरच घेतलेले आहे. आता जगाचे काय होईल या चिंतेचे ओझे आमच्यावर नको. आम्हाला शूरासारखे मरू द्या, पाय मागे ओढू नका. नंतर काही तासांनी श्री.संधी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आले. आमचे सर्वस्व लुटले जाईल, आमचे रक्षण करा, अशी विनंती त्यांनी केली. व्यापाऱ्यांना गांजवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा ध्वज स्वातंत्र्य मिळेपर्यंत हजारोंच्या रक्ताने रंगला आहे. अजून थोडेसे रक्त खर्ची पडले तर मी पर्वा करणार नाही. नंतर नांदेडचे कलेक्टर शहाबुद्दीन आले. ते म्हणाले. गुंडांच्या हाती गाव देऊ नका, तुमच्यासमोर पदर पसरतो. मला शांततेची भीक वाढा. कलेक्टर खरोखरच पदर पसरून उभे राहिले. क्षणभर गांजवे यांचे मनही विचलित झाले.

 दुसऱ्या क्षणी गांजवे भानावर आले. हा प्रश्न एकट्याचा नव्हता. सर्वांचे नेते म्हणून गांजवे चर्चेला समोर होते, पण मागे शेकडो कार्यकर्ते तळहातात प्राण घेऊन उभे होते. बायका, मुले, जायदाद, अब्रु पणाला लावलेल्या ह्या शूर कार्यकर्त्यांनी जागूनच दोन दिवस काढले होते. राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या आप्तांचा घात करणे गांजवे ह्यांना शक्य नव्हते. कारण आता माघार म्हणजे पुढच्या सर्व कार्याचा नाश होता. गांजवे शांतपणे म्हणाले, कलेक्टरसाहेब मी काय करू? माझ्या हाती काही नाही. आपण पोलिसांकरवी ध्वज उतरवा, मी किल्ल्या तुमच्याजवळ देतो. शांततेचा भंग होऊ नये. गाव गुंडांच्या हाती जाऊ नये या व्यवस्थेची जबाबदारी माझी नाही. आपण योग्य ती व्यवस्था करा. शेवटी कलेक्टर परत गेले.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८५