पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण भूमिगत कार्यकर्ते त्यांच्या मळ्यात जमत, जेवत, विश्रांती घेत. त्यांच्या मळ्यातील घरात हत्यारे लपवीत. पुष्कळदा तिथे आक्षेपार्ह पत्रके सायक्लोस्टाइल होत. पाटलांना हे सर्व माहीत होते, पण त्यांनी कधी दगा दिला नाही. त्यांनी माफी मागितल्याबद्दल कुणी त्यांना दोष दिला नाही.

 ही भूमिका त्या चळवळीला भागच होती. सारेच जण हौतात्म्य पत्करू शकत नाहीत. मात्र सचोटीचे पथ्य पाळले जावे. कुरुंद्यात कुणी दगाबाज निघाला नाही. पण शेजारच्या एका खेड्यात निघाला. हा माणूस पोलिसांना बातम्या देतो ही माहिती कार्यकर्त्यांना वरील माफीमागू पाटलांनीच दिली. कार्यकर्त्यांनी त्यांचे घर जाळले. नाक कापून टाकले. गावाने त्याला वाळीत टाकले. हैदराबाद लढ्यातील हा समजूतदारपणा आता मला विलक्षण वाटतो. त्याकाळी मीही कार्यकर्ता होतो. तेव्हा मला हे सारे स्वाभाविक वाटे. आम्ही म्हणतच असू, की जमेल त्याने गोळी खावी, न जमणाऱ्याने पाणी पाजावे. तेही न जमले तर शांतपणे घरच्या घरी डोळे पुसावे. पण शत्रूचा खबऱ्या होऊ नये.

 निजामाच्या राज्यात दारूचे उत्पन्न फार मोठे होते. म्हणून शिंदीची झाडे सुरक्षित होती. ती तोडणे गुन्हा होता. ह्या झाडांच्यापासून शिंदी काढणारे काहीजण असत. काहींचे व्यापारी गुत्ते होते. शिंदीच्या झाडात हिंदूंच्यापैकी अनेकांचे हितसंबंध होते. ही झाडे तोडणारे कोण हे सर्वांनाच माहीत असते. बहुतेक वेळी ज्याच्या शेतात झाड असे तो कंदील घेऊन उभाही असे. तोच दुसरे दिवशी ठाण्यावर जाऊन गुन्हा नोंदवी. पंचनामा होई. त्यावर शेजारचे शेतकरी साक्षीदार म्हणून सहीचे अंगठे करीत. पण आम्ही तोडताना कुणाला पाहिले नाही ह्यावर एकमत असे. शिंदीचे मडके अडकवणे, शिंदी काढणे ही कामे बहुतेक गावातील अस्पृश्य करीत. असे मडके अडकवलेले झाड भल्या पहाटे मडके काढून घेतल्यावर तोडीत; पण तो अस्पृश्य कधी कुणाचे नाव सांगीत नसे. उलट, ठाण्यावर जाऊन आपण सरकारचे एकनिष्ठ असल्यामुळे आपले काँग्रेसवाल्यांनी मुद्दाम नुकसान केले असे तो रडत, ओरडत सांगी. कुरुंद्याच्या आसपास मोठे शिंदीवन होते. अशी हजारो झाडे सप्टेंबर, ऑक्टोबर १९४७ ला तोडली गेली.

 ऑक्टोबरपर्यंत सत्याग्रह संपलेला होता. भूमिगत कार्यकर्ते गाव सोडून गेले होते. सरहद्दीच्यावर कार्यकर्ते ठाण मांडून होते. मधून मधून ते येत. एखाद्या पोलिस

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७४