पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नवे मंत्रिमंडळ नेमले. महाराज किशनप्रसाद बहादुर यांच्या नेतृत्वाखालील या नव्या मंत्रिमंडळाच्या साहाय्याने आता कारभार सुरू झाला. ** या मंत्रिमंडळाचा कारभारी मनाजोगता न वाटल्याने व दिल्लीहून व्हाइसरॉयही सतत आक्षेप घेत राहिल्याने निजामाने व्हाइसरॉयला कळविले की, कारभार व्यवस्थित चालवायला हवा असेल तर मंत्रिमंडळात युरोपियन मंत्री हवे आहेत. व्हाइसरॉयची संमती आल्यावर त्याने चार युरोपियन मंत्री आपल्या मंत्रिमंडळात मागून घेतले. हे चौघेही आपापल्या विषयाचे मोठे तज्ज्ञ होते. जवळजवळ शेवटपर्यंत म्हणजे चौरेचाळीस/ पंचेचाळीस सालापर्यंत टास्कर आणि हर्नर हे युरोपीय मंत्री निजामाच्या मंत्रिमंडळात होते. युरोपियनांच्या आधुनिक ज्ञानाचा राज्याच्या प्रशासनात उपयोग झाला पाहिजे ही काळजी निजामाने सतत घेतली. निजामाच्या राज्यातील पगारांच्या सर्व श्रेणी बाहेरच्या हिंदुस्थानमधील श्रेणीपेक्षा चांगल्या होत्या. त्यामुळे बाहेरची बुद्धिवान माणसे हैदराबादमध्ये आली. आकडेवारीनुसार पाहावयाचे तर निजामाने सत्ता हातात घेतली त्या दिवशी अकरा साली राज्यात प्राथमिक शाळा शंभर होत्या. चाळीस साली या प्राथमिक शाळांची संख्या चार हजार झाली. हा शिक्षणविरोधी धोरणाचा पुरावा नाही. भारतातील जे शिक्षणमंत्री फारच ज्ञानजिज्ञासू व ज्ञान वाढविणारे म्हणून ओळखले जातात त्यांच्या त्यांच्या कारकीर्दीमधे शिक्षणाचा विकास किती झाला त्याच्याशी एकदा निजामाने केलेल्या विकासाचे प्रमाण तुलना करून पाहायला पाहिजे. निजामाने आपल्या कारकीर्दीमधेच कॉलेज शिक्षण चालू केले. कला-विषयांच्या शिक्षणाबरोबरच तांत्रिक प्रगती व्हावी यासाठी मेडिकल कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज या सर्वांची व्यवस्था तर केलीच पण स्वतःच्या विद्यापीठाचीही स्थापना केली. हे विद्यापीठ अखिल भारतातील असे पहिलेच विद्यापीठ की जिथे देशी भाषेतूनच वैद्यकीयपर्यंतचे सर्व शिक्षण देण्याची सोय होती. आजपर्यंतच्या इतिहासातही असे दुसरे विद्यापीठ नाही. भारतात अठराशे छप्पनला विद्यापीठांची सुरुवात झाली. कलकत्ता, मुंबई, मद्रास ही पहिली विद्यापीठे. आज एकोणीसशे अठ्याहत्तर आहे. या एवढ्या प्रदीर्घ कालखंडात, काही काळपर्यंत का असेना एका देशी भाषेतून मेडिकल, इंजिनिअरिंगपर्यंतच्या सर्व कारभाराचे शिक्षण देणारे विद्यापीठ एकच आहे. ते म्हणजे


    • यातही तपशिलाची गफलत आहे. १९२० ला सर इमाम पंतप्रधान झाले. अर्थात कुरुंदकरांचा मुद्दा बरोबर आहे. - संपादक
      हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१७०