पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमान, तीन हिंदू असे मंत्रिमंडळ. याच इत्तेहादुल मुसलमीनचे तीन मंत्री आणि हिंदूत काँग्रेसचा एक मंत्री जी.रामाचारी. हा सल्ला देणारा मुनशी. यावरून मुनशींचे सख्य कुणाशी होते यावर प्रकाश पडतो.

 निजामांनी या व्याख्यानात पुन्हा सांगितले की, शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भारत सरकारशी समझोता कठीण जाणार नाही. मी भारताशी मैत्रीचा नवा अध्याय आरंभ करीत आहे. मी असफजाही घराण्याच्या उत्कृष्ट परंपरा जतन करीन. स्वतः तयार केलेले हे खोडसाळ व्याख्यान मुनशींनी निजामाकडून वाचवून घेतले. हे सारे काम भारताच्या एजंट जनरलच्या सल्ल्याने होत आहे असा खुलासा केला. नंतर स्वतः व्याख्यान दिले. त्यांच्या स्वत:च्या व्याख्यानातही CEASE FIRE हाच शब्द आहे. मुनशींनी भारतीय फौजांचे वर्णन 'मित्रांच्या फौजा' असे केले. हे वर्णन नेहमी विदेशी फौजांचे करण्याची प्रथा आहे. मुनशी म्हणालेही, निजामाच्या म्हणण्याप्रमाणे हैदराबादच्या जनतेने भारताशी 'संलग्न सुसंगती' ने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येथील मूळ शब्द Integrated Harmony पुन्हा हैदराबादचे पृथक अस्तित्व सुचवितो.

 पंडितजींनी मुनशींना तातडीने निरोप पाठविला, आपण लुडबूड करू नका. हैदराबाद आमच्या सेनेला शरण येईल. आमचा लष्करी प्रशासक कारभार पाहील. आपण सेनेच्या राजधानी प्रवेशाच्या वेळी उपस्थित राहू नये. आमच्या सल्याशिवाय आपण कोणतेही आश्वासन देऊ नये. सरदार व नेहरूंच्या कणखरपणामुळे मुनशींनी केलेला सारा घोळ एका क्षणात संपला. हैदराबादचा पराभव झाल्यानंतर भारतीय सेनेला संस्थान प्रवेशाची परवानगी देणारा निजाम कोण? आणि पराभवानंतर निजामाला कारभार तरी कोण पाहू देणार?

 लोक आनंदाने वेडे झाले होते. मुसलमान एकाएकी खचून गेले होते. या वातावरणात सीझ फायरचे सरेंडर कसे झाले इकडे लक्ष देण्यास कुणाला फुरसद नव्हती. मुनशींचे कार्य संपले होते. त्यांनी केलेला विचका कुणाला कळण्यापूर्वी सावरला गेलेला होता. भारताच्या युनोतील वकिलाने निजामाच्या व्याख्यानाचा आधार दिला आणि भारतीय फौजा निजामाच्या परवानगीने राजधानीत गेल्या ह्यावर भर दिला. भारताच्या लष्करी सेनानीने सरळ शरणागती स्वीकारली व कारभार हाती घेतला. विजयी बंदुका हातात असल्या म्हणजे शब्दांचे गुंते चटकन सोडविता येतात.

 पण मुनशींचा मोह अजुन सुटला नव्हता. पोलिस अॅक्शननंतरच्या काळातही

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /११९