Jump to content

पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२१

जरी जंगल तुटले, तरी तेथील लागवड बंद होतांच पुनः

जंगलाची उत्पत्ति होते.

 सुधारलेला मनुष्य व त्याची पाळीव जनावरे हे जंगलाचे मुख्य शत्रु होत. हे जेथे जेथे जातील तेथील तेथील रानांचा नाश झालाच पाहिजे. सुधारलेल्या मनुष्याचे मुख्य चिन्ह म्हटलें म्हणजे धान्य पिकविण्याची कला व कायमच्या लागवडीची व्यवस्था हें होय. ह्या लागवडीस रानांचा नाश करणे जरूर आहे, व पाळींव जनावरे बाळगणेही जरूर आहे. शिवाय, मनुष्यांस घरे बांधण्याकरितां वगैरे लागणाऱ्या साहित्याकरितां व जनावरांचे उपजीविकेकरितां रानांचा परोपरीने नाश होणे साहजिकच आहे.

 उत्तर आशियामधून आर्य लोक वसाहत करण्याकरितां जेव्हां हिंदुस्तानांत उतरले, तेव्हांपासून जंगलचे नाशास आरंभ झाला असावा. ह्या लोकांनीच आपल्याबरोबर धान्य पिकविण्याची कला आणिली असावी. ह्या लोकांनीं नद्यांचे कांठचे सुपीक प्रदेश मात्र प्रथमतः लागवडीस आणले असावे. परंतु जनसंख्या कमी असल्या कारणानें वनांचा नाश फारसा होण्यास कारण नव्हते. शिवाय, ह्या कालीं उत्तर हिंदुस्तानचे अलीकडे ह्या लोकांचा संचार झाला नसल्याकारणाने दक्षिणेतील अरण्यें कायम असली पाहिजेत.

 अलीकडील शोधक व विद्वान लोकांच्या मताप्रमाणे वेदकाल म्हणजे दहा हजार वर्षांचे अलीकडला काल होय. वेदामध्यें अरण्यांचीं वर्णने नाहींत. परंतु वनांतील आश्रम व राक्षसादि रानटी लोकांचा सुळसुळाट ह्यांवरून साधारण सर्व देश अरण्यमय असला पाहिजे.