पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११०
हवेची शुद्धि.

 हवेची शुद्धि हा झाडांपासून आणखी एक उपयोग आहे. हवा ही मुख्यत्वें दोन वायूंची झालेली आहे. ऑक्सिजन व नैत्रोजन हे दोन वायु हवेमध्यें यांत्रिक रीतीने नियमित प्रमाणानें मिसळलेले असतात. नैत्रोजन हा निर्व्यापार वायु आहे. ऑक्सिजन हाच काय तो उपयोगी वायु आहे. हा वायु घाणीचा नाशक आहे. हा फार तीव्र असल्यामुळे घाणींतील सेंद्रिय द्रव्यांशी रसायनरीत्या संयोग पावून त्या द्रव्यांचे ऑक्साईड बनवितो. व हे ऑक्साईड निरुपद्रवी असतात.

 विहिरीच्या पाण्यापेक्षां नदीनाल्यांचे पाणी पिण्यास चांगले म्हणून जी आपणांत म्हण आहे, त्याचे कारण हेच की, विहीरीच्या पाण्याशीं सेंद्रिय द्रव्ये मिश्र असतात. त्यांचे शुद्धीकरण करण्यास पुरेसा ऑक्सिजन त्या पाण्यास मिळत नाही. कारण, विहिरीचे पाणी स्तब्ध असून त्याचा थोडाच भाग ऑक्सिजन वायूशी सँलग्न असतो. त्यामुळे पृष्ठभागाच्या पाण्याचे मात्र शुद्धीकरण होतें, परंतु बाकीचे पाणी तसेच अशुद्ध राहते. नदीनाल्यांच्या पाण्याचा पुष्कळ पृष्ठभाग हवेशी संलग्न असतो व शिवाय पाणी नेहमीं वाहात असल्यामुळे वरचेवर निरनिराळा पृष्ठभाग हवेशी संलग्न होतो. त्यामुळे सर्व पाण्याशीं वायूचा संपर्क होऊन पाणी शुद्ध होते. शिवाय विहिरीवरची हवा कोंडलेली असल्यामुळे तिजमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी असते. व नदीनाल्यांवरची हवा उघडी असल्यामुळे तिजमध्ये ह्या वायूचे प्रमाण जास्त असते.