पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विवेचनात सर्वस्पर्शिता आली आहे. उर्दू भाषेचा जन्म आणि हिंदीचा विकास संबंधी दिनकरांचे या अध्ययनातील लेखन हिंदू-मुस्लिमांच्या वर्तन व्यवहारावर नेमकेपणाने बोट ठेवणारे ठरले आहे, असे असले तरी वास्तवापलीकडे जाऊन दिनकर त्यांना अभिप्रेत असलेल्या सामासिक संस्कृतीचे स्वप्न सोडत नाहीत हे विशेष.

 इस्लाम धर्माची स्थापना अरबस्तानात झाली. धर्म स्थापून ऐंशी वर्षही झाली नसतील, या धर्माने भारतात पाऊल ठेवले. त्या वेळी हा धर्म कुराण प्रमाण होता. कलमा, नमाज, रोजा, जकात, हज ही त्यांची पंचतत्त्वे होती. मूळ इस्लाम धर्म हा मूर्तिपूजाविरोधी होता. तो एकेश्वरवादी होता. हिंदू धर्म मूर्तिपूजक शिवाय बहुदेववादी हिंदू-मुस्लीम धर्मातील तेढीचे खरे कारण ही स्वरूप भिन्नता आहे. पण कोणतेही दोन धर्म एकमेकांच्या सान्निध्यात येतात, तेव्हा अभिनिवेशाच्या भूमिकेतून संघर्ष होतात, हे खरे आहे. पण स्थायी होण्याने सहअस्तित्वाने कर्मठपणाचे कंगोरे झिजून देवाण-घेवाण व परस्पर सहिष्णुतेची भावना ज्या देशात निर्माण झाली, तिथेच मिश्र संस्कृती उदयाला आली, हा जगाचा अनुभव आहे.

 या संदर्भात ख्रिश्चन-मुस्लीम, ज्यू-मुस्लीम, ख्रिश्चन -ज्यू असे संबंध पाहता येणे शक्य आहे. भारतात हिंदूप्रमाणे शीख संघर्ष, संवाद, सहवासही दुसरे उदाहरण आहे. प्रश्न आहे की भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, अनुभवातून वर्तमानात आपण काय बोध घेणार व व्यवहार करणार. दिनकरांनी हा प्रश्न उपस्थित करताच ‘संस्कृति के चार अध्याय' चे लेखन केले आहे.

 या अध्यायात इस्लामी आक्रमणात हिंदू हरले. इस्लामी भाषा, वास्तुशिल्प, प्रशासन, खानपान यावर परिणाम झाला. हिंदू जात व्यवस्थेवर त्याचे परिणाम झाले, ही वस्तुस्थिती आहे. पण हिंदू धर्मक्षय हा अंतर्गत जाती संघर्षामुळेही झालेला आहे, हे दिनकर लक्षात आणून देतात. हिंदू-मुस्लीम संघर्ष, संबंध नुसते पाहून चालणार नाहीत. बुद्ध व ब्राह्मण संघर्षही लक्षात घेणं दिनकरांना आवश्यक वाटते. मुस्लीम आक्रमणानंतर हिंदूची दुर्गती नोंदवताना दिनकरांनी स्पष्ट केलं आहे की, “जात ठीक तर सर्व ठीक.' धर्म वाचला तर सर्व वाचेल. या हिंदूच्या आडाख्यामुळे त्यांनी देश तर गमावलाच, पण धर्म व जातीचं अस्तित्व असून नसल्यासारखं, स्थितीशील (ठहरसा गया) झालं, ही त्याची खरी शोकांतिका ठरली. याकडे दिनकरांनी ग्रंथात लक्ष वेधले आहे.

साहित्य आणि संस्कृती/६९