Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सर्व प्रकारचे तर्क, प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय साधनांद्वारे निर्माण होणारे विविध ज्ञान विस्तार (विज्ञान, विद्या) इत्यादी शक्यतांच्या बोधांवरच आधारित असतात. आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो म्हणजे त्याच्या सिद्धांतांच्या अपेक्षित व शक्य निष्कर्षांनाच एक अर्थाने मान्यता देत असतो. सत्यशोधक (Positive) तसेच आदर्शान्वेषी (Normative) शास्त्रातील सर्वज्ञान हे शक्यतांच्या अनुभवजन्य गृहितांवर आधारित असते.

 पदार्थविज्ञान किंवा गणितासंदर्भात विचार करायचा झाला तर त्यांच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. मूल्य विज्ञानांच्या संदर्भात त्यांचे जे सिद्धांत असतात, ते मुख्यतः दोन प्रकारचे असतात. पैकी एकाच्या शक्यता अशा असतात की ज्यावर मनुष्य आपल्या चिरपरिचित अनुभवांच्या आधारे सहज विश्वास ठेवू शकेल. सामाजिक सुधारणा, परिवर्तनाचे प्रयत्न या श्रेणीत मोडतील. पण दुसरी शक्यता ही अनेक तत्त्वज्ञान सिद्धांत अथवा धर्मतत्त्वांवर आधारित असेल. यांना सरधोपट पद्धतीने स्वीकारणे कठीण. त्यासाठी अंतर्दृष्टी असणे पूर्वअट राहणार, उदाहरण द्यायचे झाले तर हिंदू तत्त्वज्ञानातील मोक्षाची संकल्पना किंवा साम्यवादी दृष्टिकोनातील राज्यहीन समाज (Stateless State) संकल्पनेची देता येतील. यावर विश्वास ठेवायचा तर प्रत्याशित (Projected) शक्यता कमी अधिक प्रमाणात गृहीत धराव्या लागतील. ज्या विज्ञानात परीक्षा (Verification) शक्य असते अशाच विज्ञानात कल्पनाप्रसूत सिद्धांतांचे अनुसरण करणारी तर्कपद्धती योग्य ठरते. मात्र ती तर्काधारित मानव्य विद्याशाखांतील (Humaties) विज्ञानांना विशेषतः आदर्शवादी अथवा मूल्याधारित शास्त्रांना (नैतिकशास्त्र) लावणे योग्य ठरणार नाही.

 दसरीकडे मानव्य विद्यांमध्ये परिचित अनुभवविस्तार आणि पुन:संगठनाधारित संभावना-बोध गृहीत असतो. कल्पनाधारित (Speculative) नसलेली मानवीय विद्याशाखांतील ज्ञान-विज्ञाने, आचारशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र सिद्धांत अशाच प्रकारच्या परिचित अनुभव विस्तारातून आणि त्यांच्या पुनर्रचनेतून हाती येत असतात. अशा प्रकारचे नियम वा सिद्धांत हे भौतिक शास्त्रातील कल्पनानिर्मित आणि परीक्षित (Verified) नियमांपेक्षा अधिक दृढ आधारावर उभे असतात. खरी गोष्ट अशी की अंतिमतः भौतिक विज्ञानातील नियम कल्पनानिर्मित असले, तरी त्यांच्या सत्यतेचा आधार मात्र व्यावहारिक यशच असते. यातून एकच स्पष्ट होते की काही दृष्टीनी मानवीय विद्याशाखातील ज्ञानविज्ञाने ही भौतिक ज्ञान-विज्ञानांपेक्षा अधिक

साहित्य आणि संस्कृती/४३