Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्या ज्या देशात गेल तिथे आपल्याबरोबर भाषा, लिपी, साहित्य, चालीरीती, पोषाख, आहार प्रकार घेऊन गेला. शिल्प, चित्र, वास्तुकलेमुळे बौद्ध धर्म चिरस्थायी झाला. हे प्राचीन विहार, स्तूप, गुंफा, त्यातील मूर्ती, चित्रे, कोरीव कामे

चीन

 ‘चीन' शीर्षक ग्रंथाचा पाचवा भाग डॉ. सांकृत्यायन यांनी विशेष विस्ताराने वर्णिला आहे. प्रारंभी त्यांनी बौद्ध धर्माच्या आगमनापूर्वीचा प्रागैतिहासिक चीन चित्रित केला आहे. मग प्रथम बौद्ध धर्मप्रसारक काश्यप मातंग आणि धर्मरत्न यांच्या चिनी आगमनाची कथा विशद केली आहे. मग उत्तर नि दक्षिण चीनमधील बौद्ध धर्म विस्तार सांगितला आहे. अकरा अध्यायांतील या धर्म विस्तार इतिहासात आपणास लक्षात येते की एका अर्थाने ते चीनच्या मानववंश निर्मितीपासून ते विसाव्या शतकापर्यंतचा इतिहास डॉ. सांकृत्यायन सजीव करतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचे आगमन झाले, तेव्हापासून ते वर्तमानापर्यंत म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांचा हा इतिहास होतो. या व्यापक कालखंडात बौद्ध धर्माने चीनमध्ये अनेक चढउतार अनुभवले त्यातून तावून-सुलाखून तो आजही तेथील प्रमुख धर्म बनून राहिला आहे. ताओ आणि कन्फ्यूशियन पंथाशी टक्कर देत तो तरून राहिला. फाहियान, युआनच्वांग व इत्सिंग हे प्रवासी बौद्ध धर्म अध्ययनार्थ भारतात आले. येथून अनेक बौद्ध धर्मग्रंथ ते चीनमध्ये घेऊन गेले. चीनमध्ये त्यांची भाषांतरे झाली. कुमारजी बुद्धभद्र, बुद्धयश, धर्मरक्ष, गुणवर्मा, गुणभद्र, बोधिधर्मादी आचार्य चीनमध्ये गेले. त्यांनी बौद्ध धर्म रुजवला. पुनर्जन्म, कर्मफल, कार्यकारणभाव आदी कल्पना बौद्ध धर्माने चिनी संस्कृतीस दिलेली देणगी होय. चीनच्या सौंदर्य संकल्पना विकासास चिनी भाषांतरित ग्रंथांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय ज्योतिष, वैद्यकशास्त्र, चीनमध्ये गेले ते बौद्ध धर्मीय प्रचारकांमार्फतच. मंगोल, तिबेटमध्ये बौद्ध धर्माची मुळे रुजली ती चीनमुळेच. चीनमध्ये बौद्ध भिक्षुकांबरोबर भिक्षुणीही निर्माण झाल्या होत्या. चिनी संगीतावरही बौद्ध धर्माचा प्रभाव पडलेला आहे. डॉ. राहुल सांकृत्यायन यांनी हा व्यापक पट अत्यंत सूक्ष्मतेने व तपशिलाने मांडल्याने बौद्ध धर्माची परिवर्तन शक्ती अधोरेखित झाली आहे.

कोरिया, जपान

 चीननंतर सन ३७२ च्या दरम्यान बौद्ध धर्माने कोरियात पाय ठेवला.

साहित्य आणि संस्कृती/१४१