पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रक्कम भरण्याची क्षमता नसलेले वयोश्रेष्ठ बहुसंख्य आहेत. शासनाच्या आर्थिक रोख योजनांचे हक्कदार तरुण पिढी तर वस्तुरूप सवलतीचे धनी वयोश्रेष्ठ अशी सरळ-सरळ आणि सरसकट विभागणी ग्रामीण भागात सर्रास आढळते. अन्नपूर्णा योजनेतील धान्य, रोजगार हमी योजनेची हजेरी, सबसिडीचे बियाणे, खते, गावातील ग्रामीण आरोग्य योजनेचे लाभार्थी असे त्यांच्या सोई-सवलतींचे स्वरूप रोज त्यांना इच्छेविरुद्ध जगण्याच्या आयुष्याकडे गतीने ढकलत आहे. प्रवास सवलत, आरोग्य विमा, निवृत्ती वेतनयांच्या लाभात ग्रामीण व नागरी अंतर डोंगर-दरीचे आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनासदृश्य आर्थिक लाभ अत्यंत तुटपुंजा असून त्यात ग्रामीण वयोश्रेष्ठांचं भागत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
 औद्योगीकरण, नागरीकरण, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत आधुनिकतेचा प्रचार, प्रसार झाल्याने व तंत्रज्ञान खेडोपाडी, वाडीवस्तीपर्यंत पोहोचल्याने ग्रामीण जीवनशैली दिवसेंदिवस शहराप्रमाणे होते आहे. मोबाईल, केबल, टी.व्ही.सारख्या माहिती व तंत्रज्ञान साधनांच्या बरोबरीने दुचाकींचा वाढता वापर, दळणवळण साधनांची रेलचेल यांमुळे ग्रामीण जीवनाच्या शहरीकरणास कमालीची गती प्राप्त झाली आहे. परिणामी प्रत्येक बाबतीत शहरी जीवनाचे अनुकरण व स्पर्धा यांमधून एक नवा प्रश्न ग्रामीण भारतात निर्माण झाला आहे. तो म्हणजे मानवी संबंधांना आलेले यांत्रिक व औपचारिक स्वरूप. पूर्वी खेडे व शहरी जीवनातील व्यवच्छेदकतेचा आधारच मुळी आपलेपणा, अकृत्रिमता, समर्पण, निरपेक्षता इ. मूल्ये होती. जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे त्या सर्वांना तिलांजली मिळाली. मी व माझे' ही व्यक्तिगतता, आत्मकेंद्रितता. तिचे लोण आता खेड्यांतही साथीच्या रोगाप्रमाणे पसरले आहे. त्यामधून ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठ आपल्याच घरात अडगळ बनून राहत आहेत. त्यांना खाणे, पिणे, कपडा/लत्ता, औषधे, घरखर्च सर्वांवर ते संपत्तीचे हक्कदार असून अनाथ, निराधाराचे जिणे जगत आहेत. त्याचे एकमेव कारण वयोवर्धन व निष्क्रियता हेच होय. ज्या काळात आधाराची गरज त्याच काळात बरोबर ते निराधाराचे जीवन कंठण्यास बाध्य होत आहेत. 'जिवंत मरण' असं त्यांच्या जगण्याचं वर्णन सार्थ होय. त्यांना सकस, चौरस आहार लाभत नाही. काही वयोश्रेष्ठ तर पथ्य, पाणी न झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्धपोटीच राहतात, असे दिसून येते. त्यांना वेळच्या वेळी योग्य औषधोपचारही अभावाने व अपवादाने मिळतो. मनोरंजनाची साधने त्यांना उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या इच्छा-आकांक्षांनुसार प्रवास, भेटी इत्यादी भावनिक भूक भागविली जातेच असे नाही. तीर्थाटन,

सामाजिक विकासवेध/१६७