Jump to content

पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाजेच्या लाखेने झाकलेल्या! तेरी भी चूप और मेरी भी!! हे असते ‘मेरा भारत महान'मधील झाशीच्या राणीचे नि माता जिजाऊचेही! जय भवानी जय दुर्गे! जगजननी! जगत रहा, कुढत रहा, पुरुष जिवंत असेपर्यंत!
 मी पूर्वी महिला, बालकल्याण कार्यात संलग्न होतो तेव्हा नि आत्ताही छप्पर कोसळलेल्या माता, भगिनींचे उच्छ्वास, उसासे अनुभवत आलो आहे. कोवळ्या कळ्यांचे नि:श्वास, हिरव्या कैच्यांचे कुस्करणे नि पिकलेल्या आंब्यांच्या तुडवलेल्या उद्ध्वस्त आमराया मी इथे, तिथे, सर्वत्र पाहत शरमेने मान खाली टाकून जगतो आहे-
 कुमारी मातांच्या मुली सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही 'वात्सल्य बालसदन' नावांचे एक अर्भकालय, शिशुगृह चालवायचो. तिथे नको असलेल्या मुली जन्मलेल्या असायच्या. आईने मरावी म्हणूनच वाढविलेल्या पूर्वी अनेक दगावायच्या. मग आम्ही जिवाचे रान करून त्यांना जगवायचो. ज्या जगायच्या त्यांचे नवेच प्रश्न. त्या वेळी मुली दत्तक जाणे दुरापास्त. मग ‘सार्क बालिका वर्ष - १९८५'चे निमित्त करून ‘पहिली बेटी, तूप रोटी अभियान चालविले होते. मेगाफोन घेऊन गारगोटी, कोडोली, भोगाव, पेठवडगाव अशा कितीतरी बाजारांत उभारून ‘बच्चे लोक ताली बजाव'चा मदारी खेळ खेळला होता. महिला मंडळांना लक्ष्य करून अनेक सभा केल्या. मुंबई, पुण्यात गाड्यांना स्टिकर्स लावली. आज तीन दशके उलटल्यावर मी पाहतो, लोक मुलीच दत्तक मागू लागलेत. हे होऊ शकते'चा आत्मविश्वास या कामांनी दिला; पण त्याच वेळी मी महिला आधारगृह चालवित असे. एका कुमारी मातेने आपलीच मुलगी आपल्या अंगाखाली चिरडलेली पण मी अनुभवली आहे. समाजमन पारंपरिक, दूषित असले मी तो राक्षस जन्माला घालतो हे केव्हा तरी एकदा आपण समजून घेतले पाहिजे. लीना हसत का नव्हती? कारण गर्भात आईने तिच्यावर इतके अत्याचार केले होते... ते एकदा तिच्या आईच्या तोंडून ‘गुजरे वक्त की दास्तान' म्हणून ऐकलेले शब्द, शब्दप्रयोग अन् उपाय संशोधकाला केवळ लाजवणारे. या स्त्रिया अशा का वागतात तर पुरूषी समाज परंपरेच्या त्या बळी असतात. म्हणून समाज हा प्रागतिक असला पाहिजे. युरोपसारखे फसलेल्या स्त्रीलाही भारतात उजळ माथ्याने जगता, फिरता आले पाहिजे. विश्वामित्र, दुष्यन्त उजळ माथ्याने अपराधी असताना संभावित म्हणून जगतो तर मेनका, शकुंतला कुंतीने का नाही प्रतिष्ठेचे जिणे जगायचे? कुमारसंभवाची शिक्षा अपत्यांना कां ? महाभारतातील गंगा, उर्वशी, सुशोभना, हिडिंबा, सावित्री, गुणकेशी, उलुपी, इंद्राणी (शची), सत्यवती, देवयानी, माधवी, द्रौपदी.

सामाजिक विकासवेध/१६१