पान:साथ (Sath).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिच्या अंगावर शहारा उठला. तिला त्याची किळस आली. त्याचे शब्द तसे साधे सरळ होते, पण त्यांचा अर्थ साधा सरळ नव्हता. त्याने एकदम तिला स्पर्श केला त्यातूनच ते कळत होतं. तिच्याशी बोलताना, पृष्ठभागाखाली काहीतरी उलघाल चाललीय एवढं त्याला जाणवलं होतं, आणि केवळ त्यामुळे ती आपल्या निमंत्रणाला दाद देईल असा निष्कर्ष त्याने काढला होता.
 आवाज शक्य तितक्या खालच्या पातळीवर ठेवून ती म्हणाली, " थॅंक यू. पण मी दमलेय. आता जाऊन झोपणार. गुड नाइट."
 आदल्या रात्री कांदा खाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जशी घाणेरडी चव येते तशी तिच्या तोंडाला आली होती. त्याला ती इतकी एकाकी वाटली होती का की त्याच्यासारख्या कुणाही सहज भेटलेल्या माणसाने तिच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न करावा?
 खोलीत आल्यावर खोली तिला रिकामी रिकामी वाटली. बिछान्यावरची चादर अंगाला गार लागली. काही असलं तरी राम तिचा सोबती होता. तिने केलेली बडबड ऐकणारा कान, मोकळी हवा घुमविणारा आवाज, बिछान्यात बिलगून झोपायला उबदार शरीर. अंगावरची चादर ओढता ओढता तिला शिरशिरी आली. आत्ता थोड्या काळापुरतं ही सुट्टी आहे असं मी मानू शकते, एकटेपणातलं स्वातंत्र्य उपभोग शकते. पण मग कायम एकटेपणा स्वीकारल्यावर कंटाळा आल्यामुळे किंवा कुणाच्या तरी सोबतीचा गरज वाटल्यामुळे या आजच्यासारख्या अवचित भेटलेल्या माणसाबरोबर मी संधान बांधीन का? कदाचित त्यालाही एकट वाटत असेल म्हणून त्याने खडा टाकून पाहिला. केवळ माझ्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा म्हणून नसेलही.
 ही भीतीच माणसांना लग्नाच्या बंधनात ठेवते का ? एका विशिष्ट नात्याच्या चौकटीत तुमच्या सगळ्या मूलभूत गरजा पुरवायच्या एवढाच लग्नाचा अर्थ असतो का? याचा अर्थ असा होतो का की कोणत्याही तडजोडी स्वीकारून ज्या नात्यातून मला आता काही सुख मिळत नाही ते जिवंत ठेवावं? नाही, असा

१०० : साथ