पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वसंतदादांची आजी मात्र धीराची बाई. तिने कंबर कसली. धीराने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याचे तिने ठरवले. वसंतदादांचे मामा दत्तात्रय शामराव पाटील कागलहून धावत आले. सर्वांनाच आपल्याबरोबर कागलला घेऊन गेले आणि काही वर्षे ममतेने त्यांचा सांभाळ केला. नातवंडं थोडी मोठी झाल्यावर वसंतदादांची आजी दोघांना घेऊन आपल्या पद्माळे गावी परत आली. गावकऱ्यांच्या मदतीने शेती करू लागली. गावातील मुलांना शिकायची हौस आहे हे बघून तिने आपल्याच घराचा काही भाग शाळा सुरू करण्यासाठी दिला. त्या निमित्ताने आपल्याही नातवंडांची चार बुके वाचून व्हावीत ही तिचीच आंतरिक इच्छा होती.
 वसंतदादांचे चौथीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. पाचवीचे शिक्षण शेजारच्या कर्नाळ गावच्या शाळेत झाले. सहावी आणि सातवीपर्यंतचे शिक्षण वसंतदादांनी सांगलीच्या मराठी शाळा नं. १ मधून घेतले. यासाठी त्यांना रोज सायकलने म्हणा वा पायपीट करत म्हणा, पण सांगलीत यावे लागे. त्याचा मोठा परिणाम झाला. स्वातंत्र्यढ्यासाठी देशात काय चाललंय याचे आपसूक ज्ञान त्यांना रोजच्या वृत्तपत्रातून तसेच सांगलीतून लोकांच्या बोलण्यातून होऊ लागले. सांगलीत समविचारी मित्रांची ओळख झाली. ब्रिटिश लोकांच्या राजवटीविषयी मनात चीड निर्माण झाली.
 इंग्रजी शाळेत नाव घालणे मात्र वसंतदादांना जमले नाही. आजी आणि शामरावदादा घरच्या शेतीकडे बघत होते. त्यांना मदतीची आवश्यकता होती. आजी थकत चालली होती आणि शामरावदादांचे नुकतेच लग्न झाले होते.

 शालेय शिक्षण संपले खरे, पण जगाच्या पाठशाळेतील त्यांचे खरेखुरे

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ७