पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली. शेतकऱ्यांच्या माल विक्रीवर, हवासूट, मातीसूट, वटाव, धर्मादाय, पांजरपोळ वगैरेसारख्या पूर्वी दिल्या जाणाऱ्या सूटसांडी पूर्णपणे बंद करण्यात आल्या. तोलाई, हमाली व दलाली यांचेही दर मार्केट कमिटीनेच ठरवून दिले. ठरवून दिलेल्या दराप्रमाणे हिशोबाच्या पट्ट्या केल्या जात. त्या व्यवहाराची एक प्रत मार्केट कमिटीकडे येत असल्याने, कमिटीला सर्वच व्यवहारांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवता येई. व्यापारी, दलाल आणि शेतकरी यांच्यात काही वाद निर्माण झाला तर कमिटीकडून त्याचा निकाल केला जाई. या नव्या व्यवस्थेमुळे पूर्वी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकताना प्रत्येक गाडीपाठीमागे जो खर्च येई त्यामध्ये खूप बचत होऊ लागली आणि त्याचा पैशात होणारा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात जाणवू लागला. पूर्वी गांजून जात असलेले शेतकरी या नव्या व्यवस्थेमुळे वसंतदादांना दुवा देऊ लागले.
 या उलट स्थिती होती व्यापाऱ्यांची.
 एक तर सांगलीत शेतव्यापारासाठी स्वतंत्र वखारभागच सांगलीत पूर्वीपासून अस्तित्वात असल्याने व्यापाऱ्यांना वेगळे अधिकृत मार्केट यार्ड नको होते. त्यांची पूर्वीची मनमानी, अनिर्बंध मक्तेदारी संपणार होती हे त्यांचे खरे दुखणे होते. त्यांच्या नफ्यामध्ये मोठी बाधा या व्यवस्थेमुळे निर्माण होणार होती. या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे त्यांनी जोरदार विरोध केला. कोर्टकचेऱ्या केल्या. हायकोर्टापर्यंत भांडण गेले, पण शेवटी निकाल त्यांच्या विरोधात गेला.

 नवीन मार्केट यार्ड सांगलीच्या पूर्वेस मिरज रस्त्याच्या दिशेला शंभर एकराहून अधिक जागेवर वसवले होते. व्यवस्थित प्लॉटस् त्यामध्ये

२४ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील