पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
संतति-नियमन

मानवी जात अन्नपाण्यावांचून तडफडून मरेल अशा प्रकारच्या ज्या एका भविष्यकाळाची कल्पना मालथसनें केली, ती केवळ कल्पना- गम्यच असून इतकी निकराची अवस्था कधींच प्रत्यक्ष प्राप्त व्हावयाची नाहीं हें जरी खरे असले तरी, आतां यापुढें बहुप्रसवितेचे ध्येय सोडून संततिनियमनाच्या धोरणानेंच जगांतील स्त्री-पुरुषांनीं वागले पाहिजे हा मालथसचा उपदेश ग्राह्य मानण्याविषयीं कोणाचेंच दुमत नाहीं. एडवर्ड ईस्ट या गृहस्थांनी आपल्या 'आतां पुढे काय ?' (Man- kind at the cross roads ) या ग्रंथाच्या प्रस्तावनेत असे उद्गार काढले आहेत, की 'जगाच्या लोकसंख्येची वाढ कशी होत आहे, आणि त्या मानानें जगाची शेतीभाती व उपजीविकेच्या इतर द्रव्यांची उत्पत्ति यांची स्थिति काय आहे या गोष्टींचा सूक्ष्मपणें विचार करूं लागलें म्हणजे एखादे वेळीं असें वाटतें, कीं मनुष्यजातीच्या नाशाविषयींची मालथसची भविष्यवाणी आपल्या हयातींत आपल्या डोळ्यांदेखत खरी होणार की काय कोण जाणे ! मनुष्यजातीपुढे आज दोन मार्ग आहेत- संततिनियमन करून आपल्यावरची अंतिम आपत्ति टाळणे, किंवा बहुप्रसवितेच्या भोवऱ्यांत राहून प्रवाहाचे वक्के खात खाली खाली जाणें ! या दोन मार्गांपैकी कोणत्या मार्गानें जावयास आपण तयार आहोंत तें आपल्याला ठरवावयाचें आहे.