पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
संतति-नियमन

सांगावयाचें झाल्यास असें म्हणतां येईल, की जेवढ्या अवधीत एखाद्या देशाची लोकसंख्या मूळ संख्येच्या आठपट वाढेल तेवढ्या अवधींत त्या देशांतील उपजीविकेची द्रव्यं सारी चौपटीनेंच वाढतील. या दोन गोष्टींची वाढ अशा भिन्न प्रमाणांत व्हावी असा निसर्गाचा नियमच आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी मालथसने पुष्कळ देशांच्या लोक- संख्येचा अभ्यास केला व आपल्या ग्रंथांत अनेक प्रकारचा पुरावा पुढे मांडला; आणि या वाढीचें भिन्न प्रमाण सिद्ध करूनच तो थांबला असें नाहीं, तर त्याकडे बोट दाखवून तो लोकांना उद्देशून म्हणाला, " बाबांनो ! या गोष्टीपासून बोध घेण्यासारखा आहे तो घ्या. तुम्ही खुशाल प्रजोत्पादन करीत आहांत खरे; पण त्याचे दूरवर परिणाम कोणत्या प्रकारचे होतील तिकडे तुम्ही लक्ष द्याल कीं नाहीं ! तुम्ही प्रजोत्पादनाचा क्रम असाच निर्वेधपणे चालविलात तर भूमितिश्रेढीनें जगावरची लोकसंख्या वाढत जाईल, पृथ्वीवरची उत्पादक द्रव्ये मात्र गणितश्रेढीच्या मंदगतीनें वाढतील, एकंदर प्रजेच्या मानानें या द्रव्यांचा पुरवठा हलके हलके अपुरा पडूं लागेल, आणि शेवटीं अशी एक भयंकर वेळ येईल कीं, अन्नपाण्यावांचून तडफडत मरण्याखेरीज मानवी प्रजेला गत्यंतर उरणार नाहीं."
 मालथसचें हें झणझणीत अंजन डोळ्यांत जातांच समाज खड- बडून जागा झाला. समाजांतील स्त्री-पुरुषांच्या अनिर्बुद्ध प्रजोत्पादन कार्याचा व लोकसंख्येच्या वाढीचा आणि एकंदर जगताच्या कल्याणा- चा कांहीं निकट संबंध आहे कीं काय इकडे लक्ष देण्याचे पूर्वी कोणाला कधीं सुचलें नव्हतें. पण मालयसचा ग्रंथ बाहेर पडल्यावर लोकसंख्येच्या विषयाकडे आणि प्रजाजननाच्या परिणामांकडे लोकांचें लक्ष चांगलेच वेधलें गेलें. जो तो या विषयाचा विचार करूं लागला.
 मालथसनें आपल्या सिद्धान्ताची मांडणी लोकांपुढे केल्याला आतां सवाशे वर्षे होऊन गेलीं आहेत. या अवधीत त्या सिद्धान्ताची सर्व