पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
संतति-नियमन

जो सारखा नाश होत असतो त्याचा खड्डा भरून निघावा. आपल्या अंड्यांचे किंवा पिलांचें पूर्ण संरक्षण व संवर्धन करण्याची बुद्धि व शक्ति एखाद्या प्राणिजातीच्या ठिकाणी असली म्हणजे उत्पादन किया वेगानें न होतांही तिचें अस्तित्व भूतलावर कायम राहू शकते. पण एखाद्या प्राण्याची अंडी किंवा पिलें जर झपाट्यानें नष्ट होत अस- तील तर उलट खूप अंडी घालण्याचा गुण त्या प्राण्याच्या ठिकाणी असणें अगत्याचें आहे; कारण, नाहीं तर त्या प्राण्याची जाति निर्मू- लित व्हावयास विलंब लागणार नाहीं.
 सारांश, कोणत्याही प्राणिजातीच्या बाबतीत जननप्रमाण व मृत्यु- प्रमाण यांचा मेळ असला पाहिजे हा विकासयोजनेचा मुळीं पायाच आहेसें दिसतें. कारण असा मेळ नसेल तर कांहीं प्राणिजाती भराभर नष्ट होत जातील, तर कांहीं भराभर वाढून इतर जातींना नाहींशा करून टाकतील, सुव्यवस्थित सूत्र मुळींच रहावयाचें नाहीं, आणि निकृष्टापासून उत्कृष्टाकडे असा प्राणिजातींचा प्रवाह सुरळीतपणे वाहणें अशक्य होऊन बसेल. म्हणूनच निसर्गानें असा नियम घालून दिलेला दिसतो कीं, प्राण्यांचा जीवनाग्रह ( capacity for survival ) आणि उत्पादन वेग यांचें नेहमीं व्यस्त प्रमाण असावें. या नियमाचा अधिक खुलासा करण्याचे कारण दिसत नाहीं. किंबहुना हा नियम इतका अबाधित असल्याचें सिद्ध झाले आहे, कीं जी जी प्राणिजाति आज पृथ्वीतलावर टिकाव धरून राहिलेली आपणांस दिसते तिच्याविषयीं खुशाल असें विधान करतां येईल कीं, तिच्या परिस्थितीच्या योगानें तिच्या अंगीं जो कांहीं जीवनाग्रह असेल त्याच्याशी तिच्या उत्पादनवेगाचें व्यस्त प्रमाण असलेच पाहिजे. चार्लस एडवर्ड पेल या ग्रंथकारानें असें एक उदाहरण दिलें आहे, की 'मोठा पिंगट उंदीर आणि लहान उंदीर अशा उंदरांच्या दोन जाती आहेत. यांपैकी लहान जातीचे उंदीर आपल्या घरांत असले तरी आपण