पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संकटाची सावली

११

येईल; परंतु हा सारा गणिताचा खेळ होईल. अशा गणितानें मिळणारा आंकडा विश्वसनीय समजावा असें प्रतिपादन करण्याचें आमच्या मनांत येणेंच शक्य नाहीं. या गमतीदार गणिताच्या संभवाचा उल्लेख करण्यांत आमचा हेतु इतकाच होता, कीं ज्या काळी शास्त्रकारांनी बहुप्रसविता प्रशस्त मानली आणि स्त्री-पुरुषांनी बहुप्रसवितेचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवावें असा पर्यायानें उपदेश केला त्या काळांत लोकसंख्या अगदी कमी होती व ती जितकी वाढेल तितकें समाजाचें कल्याण होण्यासारखें होतें ही गोष्ट वाचकांस पटावी. आर्य लोकांची वसाहत बहुतांशीं स्थिर झाली होती. ज्या देशांत त्यांनीं वसाहत स्थापन केली होती तो इतका विस्तृत असल्याचें त्यांना आढळून येत होतें, कीं हा देश म्हणजे एक स्वतंत्र 'पृथ्वीच आहे' असें त्यांचें वर्णन त्यांना करावेसें वाटत होतें. आपण जितके हात पाय पसरूं तितके पसरावयास अवकाश आहे अशी त्यांची खात्री होती. नैसर्गिक धनधान्याची इतकी समृद्धि होती, की 'देवा तुझें वैभव अमर्याद आहे ! तें लुटतां लुटतां आम्ही थकून जातों ! ' अशा अर्थाचे उद्गार त्यांच्या तोंडून पुनः पुन्हा बाहेर पडत. सारांश, एखाद्या घराण्यांत सर्व प्रकारची रेलचल असून तिचा उपभोग घ्यावयास कोणी मूलच नसले म्हणजे त्या घराण्यांतील पतिपत्नींना आपल्याला मुलेबाळे व्हावीं अशी तीव्र इच्छा ज्याप्रमाणें होते त्याच प्रकारची इच्छा त्या काळच्या माणसांना व्हावी यांत नवल नाहीं.
 पण आजची परिस्थिति तशी आहे काय ? धनधान्याची समृद्धि असून तिचा उपभोग घेणाऱ्या लोकांची संख्या मात्र थोडी अशी स्थिति आज आहे काय ? आपला समाज कितीही वाढला तरी त्याला सुखानें हातपाय पसरतां येण्यासारखे आहेत काय ? आज आपल्या देशांत धनाची समृद्धि आहे काय ? धान्याची समृद्धि आहे काय ? लोकसंख्या कितीही वाढत गेली तरी तिचा भार सहन