पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपेक्षा बाळगणेच चुकीचे आहे. जनतेची ही निवृत्ती अगदी स्वाभाविक आहे आणि तिला प्रवृत्तीपर वळण कसे द्यावे हाच एकमेव विचार यापुढे आपण सर्वांनी केला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात प्रतिगामी व अल्पसंख्य गटाच्या हातात राजकीय व आर्थिक सत्तेचे केन्द्रीकरण कसे होत गेले याची 'ओरडकथा' म्हणूनच यापुढे न वाढविता आपल्याला जनतेच्या प्रवृत्तिधर्माचे काही मार्गही येथे शोधले पाहिजेत. विश्लेषण अखेरीस कृतीसाठीच करावयाचे असते कृतीसंबंधाने काहीच बोध होत नसेल, तर विश्लेषणाचे श्रम करून तरी काय उपयोग?

विरोधी पक्षांची जबाबदारी

जनतेला जाग आणण्याची खरी गुरुकिल्ली आज विरोधी राजकीय पक्षांच्या हातात आहे; परंतु आपल्याकडील राजकीय पक्षांना याची असावी तितकी जाणीव नाही. सत्ताधारी काँग्रेस पक्षाभोवती प्रतिगामी धनिकांचे कडे आवळले गेल्यामुळे तिचा आवाज दीन-दुःखितांच्या अखेरच्या थरापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमीच ; परंतु विरोधी पक्षांनी या उपेक्षितांच्या व पददलितांच्या संघटना उभ्या केल्या नाहीत तर या पक्षांचे समाजजीवनात प्रयोजनच काय असा प्रश्न उद्भवतो. वेगळा झेंडा उभा केला की, विरोधी पक्ष तयार होतो ही कल्पना बालिश आहे; तसेच प्रचलित सरकारच्या ध्येयधोरणांवर सतत टीकास्त्र सोडल्यामुळे विरोधी पक्ष बलवान होतो ही समजूतही भ्रामक आहे. प्रचलित समाजव्यवस्थेथील अन्याय कोणते हे ओळखून, ज्यांना न्याय मिळत नाही अशा दलित समाजाच्या संघटना उभ्या करून, कधी संघर्ष तर कधी सहकार्य करून न्यायासाठी सतत झगडत रहाणे, हे विरोधी पक्षाचे खरे ब्रीद आहे. आपल्याकडे हे ब्रीद जागविण्यासाठी एवढा प्रचंड वाव असताना आपले विरोधी पक्ष दिवसेंदिवस अधिक दुबळेच होत चालले आहेत, याचेही कारण हेच की, विरोधाचा पाया त्यांनी शास्त्रशुद्धरीत्या जनमानसात खोलवर घातलेला नाही. काही, तत्त्वज्ञानाच्या पुस्तकी पातळीवरून विरोध करीत असतात तर काही सत्ताधाऱ्यांच्या आसनाभोवती घुटमळत राहून विरोधाचे तुणतुणे वाजत ठेवण्यात गर्क असतात. जनतेच्या चालू परिस्थितीशी संपर्क असा कोणाचाच नसतो. लोकजीवनाशी व ठिकठिकाणच्या भौगौलिक-अर्थिक परिस्थितीशी अधिक समरस होऊन विरोधी पक्षांनी ठायीठायी आपल्या लोकसंघटना उभ्या केल्या आणि सशर्त सहकार्याच्या किंवा प्रतियोगी सहकारितेच्या तत्त्वानुरुप सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवले तर आजचे औदासिन्याचे ढग दूर होण्यास फारसा अवधी लागणार नाही.

ग्रा....३

। ३३ ।