पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मालाला खप नाही

खाजगी माग व सोसायटीचे माग यांची संख्या जवळजवळ सारखीच असल्याने खाजगी क्षेत्रातील विणकरांची व्यापाऱ्यांमार्फत चालू असणारी स्पर्धा सोसायटीतील विणकरांना फारच महागात पडते. व्यापाऱ्यांकडून खाजगी विणकराला नेहमीच कमी मजुरी मिळते ; तरीही तो व्यापाऱ्यांचेच दार गाठतो, कारण अनेक धाग्यांनी तो जुन्या काळापासून व्यापाऱ्यांशी गुंतलेला असतो. अडीअडचणींच्या वेळी व्यापाऱ्याने विणकराला शेपन्नास रुपये कर्ज दिलेले असते; ते कर्ज फिटण्यापूर्वी व्यापारी अधूनमधून पैशाची रोख मदत करीतच असतो. याची भरपाई व्यापारी भाव कमी धरून करून घेतो. विणकराला या सवलती को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून मिळू शकत नाहीत. सोसायटीतून एकदा कर्ज उचलले की, ते फिटेपर्यंत नवीन मदत नाही. नियमांचा हा कडकपणा कायद्याच्या दृष्टीने योग्य असला तरी विणकरांच्या चालू परिस्थितीत त्यांना जाचक वाटणारा व न परवडणारा असल्याने त्यांचे पाय आपोआप खाजगी व्यापाऱ्यांकडे वळतात. खाजगी व्यापाऱ्यांची सर्व खरेदी या मार्गाने चालू असल्याने सोसायटीतील खाजगी मागावर तयार होणाऱ्या मालाला गि-हाईक नाही. माल पडून राहिला की, सोसायटीजवळ खेळते भांडवल नाही. खेळते भांडवल नाही म्हणजे कच्चा माल विकत घेताना अडचणी. या अडचणी सरकार दूर करीत नाही. कारण कायद्याप्रमाणे खेळत्या भांडवलापोटी कर्ज वगैरे देता येत नाही. म्हणून मालविक्री करून पैसा उभा करण्यासाठी सोसायटीला झटावे लागते. आज खुद्द चेअरमन व इतर पदाधिकारी मालविक्रीसाठी गावोगाव दौरे काढून या अडचणीतून कसाबसा मार्ग काढीत आहेत ! १९२२ पासून स्थापन झालेल्या जुन्या व अनुभवी सोसायटीची ही अवस्था तर स्वातंत्र्योत्तर काळात नव्यानेच स्थापन झालेल्या दोन सोसायटया बंदच पडाव्यात यात नवल काय !

विकासाला वाव नाही

सरकार रिबेट देते ते फार अपुरे आहे. माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला रिबेट घेऊनही सोसायटीचा नग खाजगी विणकाराच्या नगापेक्षा प्रत्येकी आठ-बारा आण्यांनी महागच पडतो. त्यामुळे जोपर्यंत खाजगी माग चालू आहेत आणि खाजगी विणकर थोडा कमी भाव घेऊनही व्यापाऱ्यालाच जोपर्यंत आपला माल विकीत आहेत तोपर्यंत रिबेटमुळे सोसायटीची परिस्थिती सुधारण्याची शक्यता फार कमी आहे. फैजपुरातील मागावर मुख्यतः खणाळी होतात. एका खणाळ्याची किंमत सरासरी चौदा रुपये होते. या चौदा रुपयात सूत व कच्चा माल याचीच किंमत अकरा रुपये जाते.

। २७ ।