पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामाची त्याची प्रवृत्तीच नाहीशी करून टाकायची. दुसऱ्याकडे नोकर म्हणून तर सोडाच, स्वत:च्या शेतावरही राबण्याचा तो हळूहळू कंटाळा करू लागतो. श्रीकैलास ते सिंधुसागर अन्नस्वतंत्रता संचलनात जवळजवळ प्रत्येक सभेत मी सांगत असे : पंधरा मिनिटे दिवसाकाठी काम करून पिशवीभर गहू आणि बाटलीभर तेल मिळते म्हणून तुम्ही खुशीत असाल. पण काम संपल्यावर तुमचे हातपायच गेल्याचे तुम्हाला आढळून येईल. ग्रामीण भागातील बेकारांना काम मिळते म्हणून या योजना आपले पुढारी आणतात. उत्पादनवाढ होते म्हणून विचारवंतही असल्या योजनांचे स्वागत करतात. उत्पादन कदाचित वाढतही असेल. पण उत्पादक संपतो. क्रयशक्ती वाढली तरी कार्यशक्तीचा ऱ्हास होतो. मग ऐषारामात किंवा दारिद्रयात लोळत राहण एवढाच मार्ग उरतो. आपण गरीब होतो म्हणून इंग्रजी राज्य आले नाही. स्वतंत्र कर्तबगारीची आपली धडपड संपलेली होती म्हणून साहेबाला हा देश चटकन गिळता आला. महत्त्व धडपडीला आहे, श्रीमंतीला वा गरिबीला नाही. जे धडपडतात तेच जिवंत असतात, राहू शकतात. बाकीचे मेलेले. फुकटचा गहू खाऊन असे मरू नका. हातपाय हलवलेत तर आहे त्यातूनही खूप काही निर्माण होऊ शकते. मदतीची, सध्याच्या प्राथमिक अवस्थेत तरी मुळीच गरज भासणार नाही. ‘चालत्याला शक्ती येई, मार्गही अन् सापडे' ...... आपल्यालाही एखादा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. प्रथम स्वतंत्र धडपड मात्र सुरू झाली पाहिजे...

गोदाराणीच्या लाल टापूतही, डहाणू-तलासरी महालातही श्रमशक्तीचे असे खच्चीकरण चालूच आहे. प्रकार आणि पद्धत फक्त वेगळी. सावकाराकडचे कामाचे माप व्यवस्थित न भरण्याची वृत्ती एकवेळ समजू शकते. पण कुळकायद्यामुळे प्राप्त झालेल्या म्हणा किंवा अतिक्रमणे करून ताब्यात घेतलेल्या जमिनींच्या मशागतीबाबत विपरीत लाल प्रचार ही खास चिंतनीय बाब आहे. गरीब आदिवासीला जमिनी मिळवून देण्यासाठी चळवळींचा आटापिटा. पुढील मशागतीची मात्र उपेक्षा नव्हे तर विरोध व टिंगलटवाळी. 'विहिरी कशासाठी खणायच्या ? पिकवलेली वांगी दलाल-व्यापारी, सावकाराच्या घशात दोन-चार आणे किलो भावाने धाडण्यासाठीच ना ? यापेक्षा त्यांनाच' खणू द्यात विहिरी, करू द्यात जमिनीच्या मशागती. वेळ येताच आपण अशा तयार जमिनी ताब्यात घेऊन टाकू. आताच कशाला ही गद्धेमेहनत ! सरकारी उंबरठे झिजवा, लाच द्या, कर्जाचा बोजा डोक्यावर घ्या कशासाठी उपद्व्याप ? प्रथम पिळवणूक संपली पाहिजे. यासाठी राज्य बदलले पाहिजे. लाल बावट्याशिवाय हे कोणीही करू शकणार नाही. एकदा जनतेचे राज्य स्थापन झाल्यावर'

उघडे मैदान, तुडुंब जमाव. भोवतालच्या झाडीतून कलत्या सूर्याची किरणे काळ्या पाठींवर कोसळताहेत - ढालींचा चमचमणारा एक समुद्रच. एखादी फिआट-अँबेसेडर रस्त्यावरून धुराळा उडवीत सुसाटात निघून जाते. जंगलची हवाच मुळात

। १०८ ।