Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिंधुपुत्रांनो !


गेल्या ऑगस्टमधील गोष्ट आहे. शिर्डीला सर्वोदय संमेलन होते. जयप्रकाश नारायण यांचा तीन दिवस मुक्काम होता. या संमेलनाच्या निमित्ताने जमणाऱ्या सर्वोदय कार्यकर्त्यांशी व विशेषतः जयप्रकाशजींशी ‘ अन्नस्वतंत्रता' या विषयावर चर्चा करावी या उद्देशाने मीही शिर्डीला गेलो होतो. अण्णासाहेब सहस्रबुद्धे, आर. के. पाटील, ठाकुरदास बंग वगैरे सर्वोदय प्रमुखांशी वेगवेगळी चर्चा करून झालेली होती. एक कार्यक्रम मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो. विशेषतः आर. के. पाटील यांचा होकार येण्यास खूपच प्रयत्न करावे लागले. शेवटची भेट अर्थातच जयप्रकाशजींशी ठरलेली होती. नुकतेच एरंडोलला महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले गोविंदराव शिंदे आणि मी सकाळी आठच्या सुमारास जयप्रकाशजींच्या मुक्कामावर पोचलो. पाच-दहा मिनिटांत जयप्रकाशजी बाहेर आलेच. मी त्यांना श्रीकैलास ते सिंधुसागर संचलन कार्यक्रमाची माहिती दिली, पुढला विचार सांगितला. गोविंदराव हे संभाषणात अधूनमधून भाग घेत होतेच. मध्येच एकदा जयप्रकाशजी आत जाऊन काही कागदपत्र घेऊन बाहेर आले. ऐन दुष्काळाच्या खाईत बिहार सापडला असतानाही परदेशी अन्नधान्य आणू नये' मिशनऱ्यांना वाव देऊ नये, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतलेली होती. त्यासंबंधीची ती पत्रके होती. कुणीही या पत्रकांची दखल घेतली नाही, अशी त्यांची तक्रार होती. पी. एल्. ४८० चा विषयही निघाला. दिल्ली सरकार याबाबत स्वतःहून काहीही करणार नाही, असा त्यांचा ठाम समज होता. अन्नस्वतंत्रता, स्वावलंबन ही तर सर्वोदयाची आद्य प्रेरणा आहे; याबाबत सर्वोदयी संघटनांनी काही हालचाल का करू नये या माझ्या प्रश्नावर त्यांनी, 'बिहारदान कार्यक्रमावर सध्या आमचे सर्व लक्ष केंद्रीत झालेले आहे. पण कुणी आंदोलन चालू केले तर आमचा पाठिंबा राहील,' असे उत्तर दिले माझ्या डोळ्यांसमोर असलेली आंदोलनाची कल्पना मी त्यांना सांगितली. गोदी-कामगारांनी ठराविक मुदतीनंतर मदत म्हणून येणारे धान्य बंदरात उतरवून घेण्यास नकार द्यावा. गोदीकामगारांचे असहकार आंदोलन. मला कल्पनाही नव्हती की, जयप्रकाशजी ही कल्पना इतक्या चटकन् उचलून धरतील. पण त्यांनी ती उचलली खरी. मी त्यांना विनंती केली

। ९६ ।