Jump to content

पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोशी, श्रीधर दत्तात्रय प्रशासन खंड प्रांताधिकारी म्हणून नेमणूक झाली. याच वर्षी महाराष्ट्रात भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर (जि. सातारा) जवळ होता. त्यामुळे सातारा जिल्ह्यास लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रामुख्याने, चिपळूण व देवरूख तालुक्यांत मोठ्या प्रमाणांवर घरांची पडझड होऊन जीवितहानी व वित्तहानी झाली. या आपत्ती-व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी श्रीधर जोशी यांची विशेष कार्यकारी अधिकारी (भूकंप सहायता) या पदावर नियुक्ती करण्यात आली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच ही जबाबदारी म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठा अनुभव होता. आपद्ग्रस्त भागांसाठी मंजूर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच केले जावे असा त्यांचा कटाक्ष होता व त्यानुसार नियोजन करण्यात आले. या कामात प्रसंगी त्यांना वरिष्ठांचा रोषदेखील ओढवून घ्यावा लागला. परंतु जोशी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांची बदली करण्यात आली. काही कालावधीनंतर वरिष्ठांना आपली चूक लक्षात आली व त्यांनी ती मान्य केली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे शासनाच्या नियमांनुसार काम केले तर आपले कोणी वाईट करू शकत नाही हा अनुभव त्यांना या प्रसंगातून मिळाला. यामुळेच संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही दबावाला बळी न पडता ते निर्भीडपणे काम करू शकले असे ते मानतात. चिपळूण येथील त्यांच्या कार्यकाळात झालेला एस.टी.चा संप त्यांनी कौशल्याने हाताळला. कोकणासारख्या दुर्गम भागात एस.टी. हेच प्रवासाचे मुख्य साधन असल्याने संप लवकर मिटवणे आवश्यक होेते. त्यासाठी त्यांना भारतीय दंड संहितेच्या १४४ कलमांतर्गत कारवाई करावी लागली. १९७१ मध्ये श्रीधर जोशी यांची नियुक्ती उल्हासनगर वसाहतीचे प्रशासक म्हणून करण्यात आली. शासकीय जमीन लाटण्याच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे तयार केलेल्या प्रकरणांचा सामना त्यांना येथे करावा लागला. याच वर्षी ते मुंबई विद्यापीठाच्या सेकंड एलएल.बी.ची परीक्षा दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ऑल इंडिया कमिटीच्या शिफारशीनुसार अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्रशासनाने देशभरात प्रायोगिक प्रकल्प हाती घेतले. त्यातील एक प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील सहा व नाशिक जिल्ह्यातील चार अशा एकूण दहा आदिवासी तालुक्यासाठी घेण्यात आला. प्रकल्प राबविण्याकरिता अल्पभूधारक विकास संस्था, ठाणे, नाशिक, येथे स्थापन करण्यात आली. संस्थेचे प्रकल्पाधिकारी म्हणून जोशी यांची नेमणूक करण्यात आली. सदर संस्थेच्या माध्यमातून अल्पभूधारकांना जमीन सुधारणा, अवजारे खरेदी, पाण्याचे साधन, शेतीस, उद्योगांसाठी पूरक असे दुग्धविकास, कुक्कुटपालन, बँकांकडून कर्ज मिळवून देणे, शासकीय यंत्रणा व बँका यांत समन्वय साधणे, कर्जाचा विनियोग योग्य तर्‍हेने होतो किंवा नाही हे पाहणे व त्यासाठी दर्जेदार बी-बियाण्यांचा पुरवठा, शेती व संलग्न व्यवसायांतील तंत्रज्ञान, शेतीमालांकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देणे वगैरे ही संस्थेची जबाबदारी होती. बँकांकडून घेतलेल्या कर्जावर अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक यांना अनुक्रमे २५ व ३३ टक्के अनुदान दिले जात असे. जोशी यांच्या पुढाकाराने संस्थेच्या सर्व जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. प्रकल्पाधिकारी या पदावर असताना त्यांनी शेतकर्‍यांना शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना यांची माहिती देणारे ‘प्रगती’ हे मासिक सुरू केले. या मासिकाचे वितरण प्रकल्पक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदा यांना केले जात असे. ग्रामपातळीवर वितरित होणारे हे पहिलेच शासकीय मासिक असावे. अल्पभूधारक विकास संस्थेचा प्रकल्प राबविण्याचा जोशी यांचा अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २४८ शिल्पकार चरित्रकोश