पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

आहो, त्यांचे दैन्यच मुळात फिटून जावे ही दृष्टि येथे निर्माणच झाली नाही. आणि युरोपात ज्या ज्या धर्मसंघटना निर्माण झाल्या त्यांची हीच एकमेव दृष्टी होती. धर्मवचनांचा सामाजिक अर्थ तो हाच.
 विल्यम विल्वर फोर्स याचा जन्म १७५९ साली झाला. १७८४ साली 'धर्माचा उदय आणि प्रगति' हा ग्रंथ वाचून त्याची धर्मभावना जागृत झाली. लगेच तो इव्हँजेलिकल पंथाचा सभासद झाला. आणि थोड्याच दिवसात गुलामांचा व्यापार नष्ट करण्याचा त्याने दृढनिश्चय केला. क्वेकर पंथातील लोकांनी त्यासाठी याच्या आधीच एक समिती स्थापन केली होती. तिच्या साह्याने त्याने कार्य सुरू केले. तो स्वतः अत्यंत श्रीमंत होता व पार्लमेंटचा सभासद होता. त्याने या दुष्ट रूढीविरुद्ध तेथे प्रचार करण्यास प्रारंभ केला. समितीचे लोकही व्याख्याने, हस्तपत्रे, ग्रंथ या मार्गाने समाजजागृति करीत होते. हा झगडा वीस वर्षे चालला होता. शेवटी १८०७ साली पार्लमेंटमध्ये कायदा होऊन इंग्लंडमधून गुलामांचा व्यापार नष्ट झाला. इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष गुलामगिरी चालू नव्हती. पण इंग्लंडचे हात या कायद्याने निष्कलंक झाले. आणि अशीच अनेकांची पुण्याई साठत जाऊन १८६५ साली अमेरिकेतून प्रत्यक्ष गुलामगिरीच नष्ट झाली. 'दया करणे जे पुत्रासी, तेच दासा आणि दासी' हे श्रीतुकाराममहाराजांचे वचन विल्वर फोर्स, अब्राहम लिंकन यांनी तेथे खरे करून दाखविले. आणि कोट्यवधि प्राणिमात्र त्यामुळे सुखी झाले. ही धर्मप्रेरणा फार निराळी आहे. येथे ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी जो धर्म सांगितला तसाच धर्म युरोपमध्ये जीजस् ने, पॉल, पीटर यांनी व पुढे झालेल्या अनेक संतांनी सांगितला होता. दोघांची वचने ताडून पाहिली तर त्यात फारसा फरक दिसत नाही. पण पश्चिम युरोपच्या धर्मनिष्ठांनी त्या संतांच्या वचनांतून सामाजिक अर्थ निर्माण केला. तो महाराष्ट्रात किंबहुना हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या पूर्वी येथे कोणीच केला नाही. त्यामुळे येथे धर्माला सामाजिक शक्तीचे स्वरूप प्राप्त झाले नाही. पाश्चात्त्य लोकांच्या धर्मभावना जागृत होताच ते लगेच मंडळ स्थापन करतात व या संघशक्तीच्या जोरावर समाजजागृति करून दुःखाच्या मुळावरच घाव घालतात. रस्त्यात भेटणाऱ्या गरिबाला वा आंधळ्याला ते पैसा देत नाहीत असे नाही. तेही चालूच असते. पण या निराधार लोकांना शिक्षण द्यावे, उद्योगधंदा द्यावा व