पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

वस्तुपाठ म्हणून पाहायला हरकत नाही. युरोपातील इतर देशांच्या तुलनेने सामाजिक स्वास्थ्याचा विचार फ्रान्समध्ये अधिक गांभीर्याने व नियोजनपूर्वक झाला आहे. समाजातील सर्व वर्ग, वर्ण, अवस्था इत्यादींच्या विविध कल्याणकारी योजनांचे फ्रान्समधील जाळे त्यांचे सामाजिक स्वास्थ्याच्या उदार दृष्टिकोनाचेच द्योतक म्हणावे लागेल.
 फ्रान्समधील दौ-यात मला सेंटर डिपार्टमेंटल डी. एल. इन्फन्स, असोसिएशन डी इन्फरमेशन एट डी एन्ट्राइड, लेस ऑरफालाइन्स अॅपरेन्टिस डी ऑटेओल, मुव्हमेंट पुअर लेस व्हिलेजीस डी इन्फन्टस्, व्हिलेजीस डी इन्फन्टस एस. ओ. एस. डी. फ्रान्स, सॉलिडॅरिटी जेऊनिसी अशा अनेक संस्था पाहता आल्या. कुमारीमाता गृह, निराधार स्त्रियांची निवारा घरे, अर्भकालय, बालगृह, कुमारगृह, किशोर गृह, सुधारगृह, व्यवसाय प्रशिक्षण गृह अशा स्वरूपाच्या या संस्थांतून जन्माला येणा-या अर्भकापासून ते स्वावलंबी होऊन समाजात समाविष्ट होणा-या युवकांपर्यंतच्या अवस्थांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे आढळले. प्रत्येक संस्थेची रचना, पद्धती, कार्य वेगवेगळे. समस्या सोडविण्यासाठी येथील सर्व सामाजिक काम दोन पातळ्यांवर चालते. १) औपचारिक २) अनौपचारिक, अनौपचारिक कार्य पद्धतीत सल्ला, मार्गदर्शन येते. ते प्राथमिक मानले जाते, शिवाय महत्त्वाचेही. त्यामुळे त्या समस्याग्रस्तांपैकी ५0% प्रकरणे ही संस्थाबाह्य वातावरणात हाताळली जातात. व्यक्ती, घर नि समाज हे तीन घटकच समस्या निर्माण करतात. त्यामुळे त्या सोडवायच्या असतील तर प्राथमिक प्रयत्न या तीन पातळ्यांवरच व्हायला हवेत अशी येथील समाजशास्त्राची धारणा आहे. उर्वरित ५0 % प्रकरणे औपचारिक पद्धतीने, संस्थाद्वारे हाताळली जातात. संस्था हा समस्या निराकरणाचा अंतिम व सर्व पर्याय संपल्यानंतरचा मार्ग मानला जातो.
 फ्रान्मधील मेट्झ या गावी ‘असोसिएशन डी इन्फरमेशन एट डी एन्ट्राइड मोझेल' ही संस्था पाहिली. युरोपात सर्व सामाजिक काम हे बहुतांशी शासनाची जबाबदारी मानली गेली आहे. संस्था खासगी असली तरी शासन अशा संस्थांना उदारहस्ते अनुदान देते. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखी समाजसेवेची तिथे पद्धत नाही. अशा संस्थांचे संचालक मंडळ मानसेवी असते, पण कर्मचारी पूर्णतः सवेतन काम करतात. उपरोक्त संस्था प्रामुख्याने समस्याग्रस्त प्रौढ स्त्री-पुरुषांच्या समस्या हाताळते. विवाह संबंधातील तणाव, घटस्फोट, मद्य सेवन, वैचारिक मतभेद, निराधार होणे अशा अनेक प्रकारच्या समस्याही संस्था अनौपचारिक पातळीवर प्रथमतः हाताळते. चर्चा, समझोता, मार्गदर्शन, पुनर्मीलन घडवून आणणे इत्यादी कामे तज्ज्ञ समाजसेवकांकडून

वंचित विकास जग आणि आपण/१०१