पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २३३

म्हणावे ?
 देवाचे हिताचे विचारांत ब्राह्मण आजपर्यंत कधी तरी पडले आहेत काय? पडावयाचे त्यांस सामर्थ्य तरी आहे ? व योग्यता आहे ? जर या देशात पार्लमेंट झाले आणि त्यांत सर्व जातीचे लोक पाठविले, तर त्यामध्ये महारांपेक्षा भट अधिक शहाणपणाने आपले देशाचे हिताविषयी बोलतील काय ? व कोणत्याही गावात पहा की, गावचा कुळकरणी, जोशी हे ब्राह्मण असतात याचमुळे त्यांजवर कपटाच्या व खोटे कागद-पत्रांच्या वगैरे फिर्यादी होतात व वास्तविक हे लोक रयतेस बुडवितात. व साक्षीही खरी देत नाहीत. ब्राह्मण कुळकरणी यांस शिक्षा होऊन ते तुरुंगांत पडतात. व गावचे महाराची साक्ष खरी समजतात व ते अडाणी असून गावची चाकरीही नीट करतात; कुळकरण्यापेक्षा गावकऱ्यास कमी ठकवितात व दगाबाजीही कमी करतात. व हक्काची चाकरी करून हलाल खातात, तसे कुळकरणी करीत नाहीत.
 याजवरून ब्राह्मणांची योग्यता समजती. मोठे शहरात पहाल तर तुम्हास असे वाटेल की, इतके भट येथे आहेत, यांस खावयास मिळते, त्याबद्दल कोणती चाकरी करतात ? असे जर मनात आणिले, तर तुम्ही काय म्हणाल ? मला तर एक मनुष्य दाखवा की, भटांनी शाळा घालून कोणी तयार केले किंवा कोणास विद्वान केले किंवा ग्रंथ केले किंवा ज्ञान सांगितले किंवा लोक सुधारले किंवा मजुरी केली असे काही तरी मला या भटांचे व भिक्षुकांचे खाण्याचे मोबदला त्यांचा उपयोग दाखवा! चांभाराचा उपयोग मी तुम्हास सांगतो व दर एक मनुष्याचे पायात जोडे दाखवितो. तुम्ही आम्हास भटांची निशाणी दाखवा. बाजीरावाकडून भटांनी व शास्त्री यांनी भलभलतेच सांगून अनुचित कर्मे करविली. व मुसलमान लुटून आपण केसरी भात जेवले. राजास नीती काहीच सांगितली नाही. फक्त ब्राह्मणभोजन घाल म्हणून सांगितले. आणि कलियुगाचा कर्ण म्हणून त्याचे वर्णन केले. आणि बिघडवून राज्याचा व त्याचे कुळाचा सत्यानास केला. याचे कारण हे भटच आहेत.
 असे जे हे ब्राह्मण लोक, यांचे शहाणपणाचे प्रतिपादन 'यथार्थवादी' करितो. त्याने काही तरी नावासारखी करणी करावी. त्याचे बोलण्यात जर काही वास्तविक भाग असला, तर मी कबूल करीन. माझे द्वेषी कोणी आहेत, असे नाही; परंतु मी ज्याचे अज्ञान त्यांस कळविण्याकरिता झटत आहे, परंतु ते ग्रहण करण्यास ब्राह्मणांस इतके अवघड पडले आहे की, त्यांस बोध न होता निंदा वाटते. भट व शास्त्री अमुक कामास लावावयाचे उपयोगी आहेत, हे कोणी तरी सांगावे. यांस मरणाचे समयी बोलावले तर ईश्वराविषयी काही