पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३० : शतपत्रे

अज्ञान वाढवावे. कोणाचे मनात ईश्वराविषयी काही नसते. जितके ब्राह्मण हल्ली आहेत, तितक्यांस जर देव कसा आहे, वगैरे ईश्वराविषयी कोणी एक प्रश्न विचारला, तर त्याच्याने उत्तर देववणार नाही. व मनुष्याचा धर्म काय, हेही त्यांस कळत नाही. वास्तविक पाहिले तर गृहस्थ व भट हे उभयता जितका वेळ ज्ञान मिळावयास पाहिजे, त्याचे चौपट खर्च करतात. पण उपड्या घागरीवर पाणी होते. त्यांचे आयुष्य व्यर्थ होऊन त्यांस स्वता व इतरांस उपयोग होत नाही. अर्थाचे अनर्थ बोलत बसतात. ब्राह्मण लोक पूर्वी सर्व जातीमध्ये प्रमुख होते खरे, परंतु आता तर मला नीच वाटतात. कारण की, हलके जातीचे लोक, काही सांगितले तर ऐकतात व त्यांची अंतःकरणे चांगली गोष्ट ग्रहण करण्यास पात्र असतात; परंतु ब्राह्मणांस गर्व फार. त्यातील प्रत्येकास असे वाटते की थोर काय ते आपण. सर्वांनी आपली पूजा करावी. याजमुळे त्यांस काही सांगितले, तर ते ऐकत नाहीत, पिसाळलेले आहेत. एका अंगाने दरिद्र व दुसऱ्या अंगाने त्यांचा गर्व, अभिमान व अज्ञान येणेकरून ते पूर्ण झाले. त्यांस असे वाटते की, ब्राह्मणांच्या महत्त्वाच्या गोष्टी पुराणात लिहिल्या आहेत, त्या अक्षरशः खऱ्या आहेत. आणखी असे समजतात की, शेवटी ब्राह्मणांचा जन्म होतो. नंतर तेथे संन्यास घेऊन मोक्षास जातो.
 परंतु हे लिहिणे आम्ही किमपि ऐकत नाही. हे फक्त ब्राह्मणांचे महत्त्वाकरिता लिहिले आहे. ब्राह्मण हे मोक्षास पात्र व इतर लोक नाहीत, असे म्हणण्यास ब्राह्मणांमध्ये आता कोणता गुण आहे ? संन्यासी चोऱ्या करतात, ब्राह्मण भडवेपणा, दरवडे इत्यादिक अपराधास अनुसरले आहेत. त्यांस मोक्ष कसा होईल ? हे मत केवळ खोटे आहे. अन्य जातीचे अनेक साधू झाले, ते दुर्गतीस गेले, असे कोण म्हणेल ? जुने काळचे लोकांस दुसरे देशचे लोकांचे वर्तमान काही ठाऊक नव्हते, म्हणून इतके ब्राह्मणांचे महत्त्व लिहिले आहे. इंग्रज लोक हेही असेच मत बाळगतात. ते म्हणतात की, ख्रिस्तीयनाखेरीज कोणी मुक्तीस जात नाही. म्हणजे सर्व हिंदू नरकास पात्र आहेत, असेच मुसलमान म्हणतात.
 तस्मात् हा सर्व घोटाळा आहे. यात काही हशील नाही. ज्याचे तो आपले वर्णन करितो. याप्रमाणे ब्राह्मणांचे थोरपण आहे; परंतु ते खेरीज करून लोक असे मूर्ख आहेत की, त्यांस अर्थदेखील करता येत नाही ! पुराणे म्हणजे केवळ काव्ये आहेत. त्यात कोठे लिहिले आहे की, गंगा यमुनेप्रत बोलते; समुद्र यमुनेस म्हणाला; चंद्र रात्रीस म्हणाला; सूर्य अग्नीस म्हणाला; अशी पुष्कळ वाक्यं आहेत. त्याचा अर्थ हल्लीचे पुराणिक प्रत्यक्ष गंगा व यमुना देवता आहे, तीच बोलली असा करतात. आणि त्यांस आताचे लोक खरे