पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१६ : शतपत्रे


ब्राह्मणांचे महत्त्व

पत्र नंबर २० : ९ जुलाई १८४८

 मला एक संशय आहे की, हल्लीचे काळी कोणी वास्तविक ब्राह्मण आहेत किंवा नाहीत. माझ्या मताने म्हणाल तर कोणीही नाहीत, असे मला वाटते. आता ब्राह्मण जसे इतर रोजगारी व मजदूर लोक, तसेच आहेत. पढावयाचा त्यांचा व्यापार आहे; परंतु त्यांस अर्थज्ञान पाहिजे ते नाही. आपल्याला असे म्हणवितात की -

देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतम् ।
ते मंत्रा ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवतम् ॥ १॥

 अर्थ- देवाचे स्वाधीन सर्व जग आहे व देव मंत्राचे स्वाधीन आहेत; पण ते मंत्र ब्राह्मणांचे स्वाधीन; म्हणून ब्राह्मण हे माझे स्वतःचे दैवत आहे असे खुद्ध परमेश्वर म्हणतो.
 आता याजवरून ब्राह्मण हे देवाक्षाही जास्ती आहेत, असे झाले; परंतु असले मत मूर्खाशिवाय कोणी ऐकेल काय ? जेव्हा लोक अनाडी होते, तेव्हा ब्राह्मणांनी आपला शक पराकाष्ठेचा चालविला. इतर लोक ज्ञानी होतील आणि त्यांचा नफा व फुकट जेवण बुडेल, याजकरिता त्यांनी असा नेम केला की, दुसरे जातीने शिकू नये. जे काय वाचणे ते ब्राह्मणांचे तोंडून इतर लोकांनी ऐकावे. येणेकरून पुराणिकांचे तांदूळ, भटांची दक्षिणा, श्राद्धाची क्षीर व लग्नाच्या पोळ्या ब्राह्मणांनी आपल्याकडे पुष्कळ पिकविल्या व त्याप्रमाणे हे आजपर्यंत निभावले, परंतु आता निभणे मला दिसत नाही; कारण आता चारी जातीचे लोक हुशार झाले आहेत. आणि जे ब्राह्मणांनी आपल्या नफ्याकरिता ठरविलेले होते, ते अलीकडे मोडले आहे.
 विद्येचा सर्वांस सारखा उपयोग होत आहे व विद्याही चौपट वाढली आणि कृत्रिमपणाचा थोरपणा बुडत चालला. विद्या झाकलेली होती, तोपर्यंत तिचा मोठा बाऊ वाटत होता; पण आता उघड झाली, तेव्हा सर्व न्यायच होईल. मला वाटते की, ब्राह्मणासारखा गर्विष्ठ पृथ्वीवर दुसरा कोणी नसेल; कारण त्यांनी जरी आपला धर्म व कर्म सोडिले, किती एक लबाड लुच्चे आहेत, किती एक मूर्ख आहेत, किती एक भडवेपणाचे रोजगार करतात,