पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १४७

काळी त्या कोणी मुजाईम नव्हता. याजमुळे तो अर्थात सुखी असेल.
 असे काही दिवस चालल्यानंतर त्याचे कुटुंब वाढले आणि एका घरात रहात होते, तेच लोक फार होऊन त्यांचा गाव झाला. तेव्हा एकाने जमीन लागवडीस आणली. ती चांगली पाहून त्याचे भावांस लोभ उत्पन्न झाला; कारण लोभ, क्रोध, मोह हे मनुष्याचे मनात आहेतच; परंतु त्यांस प्रसंग आल्याशिवाय ते दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. सांप्रत ही मनुष्ये किती एक चोर व किती एक लबाड असे गुप्त रूपाने आहेत. जे चोर आहेत ते श्रीमंत असले म्हणजे त्यांस चोरी करावयाचे अगत्य असत नाही, हे पुष्कळांचे पाहण्यात आहे. एका मनुष्याने स्त्री केली म्हणजे तिचा स्वभाव भिन्न असल्यामुळे तिचा भ्रतार वारंवार क्रोधाविष्ट होतो आणि तिचे व त्याचे पटत नाही. पुढे ती स्त्री मेली म्हणजे दुसरी करतो. आणि ती सहनशील व नम्र असली म्हणजे तिचा भ्रतार पहिल्याने भांडत होता, तोच सुखाने तिजजवळ रहातो. याचे कारण काय की, क्रोध येण्याचे कारण कमी होते. आणि असेच जर सर्व मनुष्यास जसे पाहिजे तसे प्राप्त होईल, तर कोणी कोणास उपद्रव करणार नाही.
 परंतु ईश्वरी संकेत असा आहे की, जसजसे पदार्थ मनुष्यास पाहिजेत, तसतसे त्याने ते निर्माण केले पाहिजेत. ते जर फुकट मिळतील तर कोणी दुराचरण करणार नाही. परंतु या लोकी भ्रांती व अज्ञान फार आहे. तेणेकरून ईश्वराने मनुष्यास जे पदार्थ उद्योगाने शोधून काढण्यास सांगितले आहेत, त्यातून किती एक सांपडावयाचे आहेत, त्याचा अंत नाही. परंतु जर सर्व सापडतील तर सर्व लोक सुखी होतील; परंतु असा काळ कधी येईल हे तर्कानेही समजणे अशक्य आहे. यास्तव मनुष्यमात्राचा धर्म असा असावा की, हे पदार्थ शोधण्याचा उद्योग सर्वदा करावा. कवीने म्हटले आहे की,

अनर्थमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ।

 असा सर्वज्ञ मनुष्य कोठे आहे की, योग्यायोग्य जाणून विचार करील आणि असा वैद्य कोठे आहे की, ज्यास सर्व वनस्पतींचा निर्णय कळेल, आणि असा शब्दाचा अर्थ जाणणारा कोठे आहे की, प्रत्येक शब्दाचा अर्थ कोणत्या भाषेत, कसा होतो हे समजेल ? ही गोष्ट घडत नाही. तत्रापि मनुष्याने असा उद्योग करावा की, जितके समजेल तितके शिकत जावे. असे करता करता मरणानंतर तरी ईश्वर सर्व आपला खजिना त्यांस दाखवील व मग त्यांस अत्यंत सुख होईल. आणि सर्वज्ञ मनुष्य झाला, तर मग त्याचे हातून काही विपरीत