पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२६ : शतपत्रे

असाच पैसा उडवावा, गरीब, आंधळे यांनी औषधाशिवाय, घराशिवाय मरावे, हेच बरे वाटते. व उद्धट, दांडगे, आगंतुक यांस पैसा मिळाला, म्हणजे मोठे कार्य झाले असे वाटते. यास्तव जसे पारशी लोक आपले जातीत व्यापारवृद्धीचे व विद्यावृद्धीचे उदाहरण दाखवीत आहेत, तसे ब्राह्मणांनी करून सरकारास मदत करावी. म्हणजे सरकार सर्व बेत सिद्धीस नेईल. ते न करून रडत बसतात. आणि सरकारास नाव ठेवितात. हे मूर्ख आहेत की नाही, याचा हे पत्र वाचणारे याणी विचार करावा.

♦ ♦


सुशिक्षा व पंतोजी आणि संस्कृत व इंग्रजी भाषा

पत्र नंबर ९७

 आमचे लोकांस सांप्रत काळी ही मोठी कुदशा प्राप्त झाली आहे. त्याचे मनात सुधारणा येत नाही. त्यांस पूर्वीच्या चाली ज्या आहेत त्या तशा रहाव्या हे फार चांगले वाटते. व बाजीरावासारखा धनी भटांची समृद्धी करण्याकरिता यावा असे वाटते.
 परंतु त्यांस अजून असा बोध झाला नाही की, या मागील चालीपैकी बहुतेक चाली वाईट आहेत; येणे करून लोक बुडाले. त्यांस काही कळत नाही. साधारण गोष्टीविषयी देखील त्याचे अज्ञान जात नाही. त्यांस मुळी शिक्षा नाही व सुसंगत नाही. ज्या संगतीत माणूस असते, तसे तयार होते, परंतु आमचे लोकांस खरी गोष्ट सांगणारे देखील जवळ नसतात. घरात भट असतो, तो पोरांस अगदी मूर्ख करतो. मूर्खपणाच्या गोष्टी लहानपणी मनात आल्या, म्हणजे त्या जात नाहीत. याकरिता लोकांनी प्रथम सुशिक्षा लागावी, याजकरिता चांगला बेत केला पाहिजे.
 सरकारी शाळा आहेत, त्यादेखील अजून चांगल्या झाल्या नाहीत, कारण पंतोजी जुनेच आहेत, ते भटाहून शहाणे नाहीत. याजकरिता मुख्य पंतोजी चांगले सुधारलेले व ज्ञानी पाहिजेत, तेव्हा सरकारच्या शाळा दुरुस्त चालतील. हल्ली जुने पंतोजी आहेत, ते केवळ अज्ञानाच्या राशी आहेत. त्यापासून कदापि लाभ होणार नाही. याकरिता मुख्य पंतोजी व ग्रंथ हे तयार झाले पाहिजेत.