पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४ : शतपत्रे

असे मानणार नाहीत. दुसऱ्यास शहाणा म्हणणे हे मोठे अपमानाचे कारण आहे, असे सर्व लोक समजतात. ब्राह्मण तर मुख्यत्वेकरून असे समजतातच.
 जर एक पंडित दुसऱ्यापेक्षा शहाणा असेल, तर त्याशी शत्रुत्व करून व त्याजवर कुतर्क करून, त्यांस सभेत निरुत्तर करावे म्हणजे त्याचा अपमान करण्यात आपला मान वृद्धिंगत झाला असे समजतात. दुसऱ्यास प्राण गेला तरी शहाणा म्हणत नाहीत. सांप्रत कोणत्याही ब्राह्मणास पुसा की, इंग्रज शहाणे आहेत की काय ? तर ते म्हणतील 'छिः छिः' शहाणे कशाने ? त्यांस काय येत आहे ? त्याची विद्या व शास्त्रे, ज्ञाने सर्व आमच्याहून कमी आहेत, परंतु ते श्रीमान आहेत म्हणून त्यांचे शहाणपणाचे प्रगटीकरण होते आणि आमचे शहाणपणाचे प्रगटीकरण होत नाही.' साधारण वैद्यास पुसा की, इंग्रजांचे वैद्यक व शारीर तुमच्यापेक्षा अधिक आहे की काय ? तर मूर्ख वैद्यही म्हणेल की 'छिः ! कशाचे वैद्यक व कशाचे शारीर ? आमच्यामध्ये सर्व आहे. किंबहुना जास्ती आहे. परंतु हे सांगण्यास त्याने इंग्रजी वैद्यक पहावयास नको. ते पाहिल्याशिवाय व अनुभव घेतल्याशिवाय तो म्हणेल की, छिः ! यात काही नाही. हा त्याचा स्वभावच.
 ब्राह्मणास आपलेहून वरिष्ठ कोणीच वाटत नाही. व कोणाचाही ग्रंथ त्याचे हातात द्याल तर ते म्हणतील की, 'दगड आहे यात.' नाव देखील वाचून पहावयाचे नाहीत. आणि म्हणतील की, यात गोष्टी आहेत. जळल्या त्या गोष्टी. ही बुके आपली उगाच छापतात. त्यात काही नाही. प्राण गेला तरी त्या बुकात काय आहे, ते पाहणार नाहीत; व त्याचे एक पानही उलटून पाहणार नाहीत. भट वैदिक हे सगळे संहिता पाठ करतील, पण वर्तमानपत्राची एक ओळ वाचणार नाहीत.
 तसेच शास्त्री, पंडित यांस तर सर्व तुच्छ वाटते. आपले ठिकाणी गर्व करून ते बसतात आणि आपल्यास ते व्याकरणी म्हणवितात. परंतु त्यांस साधारण गोष्टीचे देखील ज्ञान नसते. पुणे शहर येथील मोठे कामदार व मोठे पंडित यांस आणून पुसा की, येथे लष्कर किती आहे ? व साहेब व मुख्य कोण आहे ? तर त्यांस समजणार नाही. आणि पाहिले तर साठ हजार कौमुदी पाठ करतात व साधारण नित्यातील ज्या जरुरीच्या गोष्टी त्याविषयी मूर्ख असतात. जर कोणी शहाणे मनुष्याने त्यांचे बोलणे ऐकले, तर त्यांस असे वाटेल की, हा काय वेडा आहे? किंवा मूर्ख आहे ? किंवा भ्रांतिवट आहे ? असे मूर्ख असोन आणखी प्रतिष्ठा लोकांत मिरवितात आणि लोकांस तर कोणाची प्रतिष्ठा करावी, हे समजत नाही. असे असोन मोठ्या शालजोड्या अंगावर घेऊन