Jump to content

पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व तो इथं आणला गेला. आज तो स्वस्थ आहे. पण तो जगण्यासाठी पूर्णत: माणसांवर अवलंबून आहे. मुख्य म्हणजे माणसाप्रती कृतज्ञ आहे. गाईड मला म्हणाला, “सर, हा आमच्याशी बोलतो. त्याची गर्जना, त्याचा आवाज आम्हाला समजतो. जेव्हा भोजनानंतर त्याचं पोट भरते, तो आम्हाला ‘बँक्यू' म्हणतो असं वाटतं."
 मी हेलावून गेलो तो सामा ही हत्तीण तीन पायावर चालताना पाहून. ती स्नानासाठी आली होती व अवजड वजन पेलत चालताना होणारी तिची अवस्था पाहून मन कळवळत होतं. बहुधा ती जमिनीत पेरलेल्या सुरुंगामुळे आपल्या एका पायाचा काही भाग गमावून बसली असावी. तिला कृत्रिम पाय बसवायचा प्रयत्न झाला. पण तो सूट झाला नाही, पण आज ती सुरक्षित जगते आहे.
 दुपार चढत होती. हत्तींच्या विश्रांतीची वेळ झाली होती. त्यामुळे आश्रम बंद करण्यात आला. आम्ही मधल्या काळात डोळे भरून चारपाच डझन हत्तीचे कळप मनसोक्त पाहून घेतले होते आणि मन भरल्या अवस्थेत अनाथ आश्रमाचा निरोप घेतला.
 मानवी प्रज्ञा वादातीत आहे पण हत्तींच्या अनाथ आश्रमाची कल्पना सुचणं, असाहाय्य, जखमी व माताविरहित एक दोन वर्षाच्या हत्तींना सुरक्षित जगवण्यासाठी अधार देण्याचं सुचणं हे प्रज्ञेबरोबर करुणेचं व मानवी भूतदयेचं काम आहे. पिनावीलचा हा हत्तींचा अनाथ आश्रम याचं साक्षात दर्शन आहे.
 आज जगावर दहशतवादाची दाट छाया पसरली आहे. माणसं माणसाला धर्म, भाषेच्या नावाखाली मारत आहेत. भारत त्याचा गेले दोन दशके सामना करीत आहे. श्रीलंकेतही इलम लढ्याच्या निमित्तानं त्याचा अनुभव आला आहे. माणसाला सुरक्षित वाटेनासं झालं आहे. अशावेळी वनखात्याची माणसं, खरीखुरी भूतदयावादी माणसं अनाथ हत्तींना घर देत आहेत, सुरक्षितता आणि प्रेम माया देत आहेत. जगण्यावर आणि माणसाच्या माणुसकीवर श्रद्धा बळकट करणारी ही मानवी कृती विलक्षण बोलकी आहे.

 जाताना मी प्रथम सामाच्या आखूड पायावरून गाईडच्या परवानगीने हात फिरवून मनोमन तिच्या त्या अवस्थेबद्दल ज्यानं ते दुष्कृत्य केलं त्याच्या वतीनं माफी मागितली. मग ‘राजा'च्या अंध पण पाणीदार डोळ्यात डोकावून पाहिलं, त्यातली निर्मळता पाहून त्यानं मानवी क्रौर्याला केव्हाच माफ केलं आहे असं वाटलं. असं मन मोठं करून प्रत्येक माणसाला माफ करता आलं तर हे जग अधिक सुंदर होईल असं मनात आलं.

लक्षदीप । २९१