पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रथम आवृत्तीचे
प्रकाशकाचे निवेदन

 तीस वर्षांपूर्वी माझे मित्र आणि थोर समाजसुधारक हमीद दलवाई मला म्हणाले होते की, 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या विषयावर त्यांनी पुस्तक लिहायला घेतले आहे. मला हे ऐकून फार आनंद वाटला. कारण, भारतीय समाजाच्या परिवर्तनासंबंधीचे हमीद दलवाईंचे विचार मराठी वाचकांपर्यंत गेले पाहिजेत असे मला तीव्रतेने वाटे. नंतर राजकारणाला खूप गती आली आणि कामाच्या व्यापात मी ते विसरूनही गेलो. त्यानंतर हमीद आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. त्या वेळी, हे संकल्पित पुस्तक त्यांच्या हातून लिहून झाले नसावे असे मला वाटले.

 चार महिन्यांपूर्वी मेहरुन्निसा दलवाई माझ्याकडे हमीद दलवाईंचे एक हस्तलिखित घेऊन आल्या, त्या वेळी मला हे सारे आठवले. हस्तलिखिताची काही पाने हरवलेली होती. मी आणि भाई वैद्य यांनी ते वाचले आणि मी मेहरुन्निसांना म्हणालों, “हे पुस्तक पूर्वीच प्रसिद्ध व्हावयास हवे होते. ते का घडले नाही या वादात मला रस नाही. 'साधना'चे आणि हमीद दलवाईचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हमीद दलवाईचे विचार मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणे हे साधना ट्रस्टचे नैतिक कर्तव्यच आहे. 'साधना प्रकाशन' हे लवकरात लवकर प्रसिद्ध करील." मी मेहरुन्निसांना म्हणालो, 'जी पाने हरवली आहेत ती सुरुवातीच्या प्रकरणातील आहेत आणि ती नसली तरी पुस्तकाच्या पुढील विवेचनात अपूर्णता येत नाही. या विषयावर सरिता पदकी, भाई वैद्य, मेहरुन्निसा दलवाई आणि मी एकत्र बसून चर्चा केली. लेखकाच्या मूळ हस्तलिखितात एक शब्दाचाही फरक करावयाचा नाही ही नैतिक भूमिका 'साधना प्रकाशना'ला मान्यच आहे. जी पाने नव्हती त्यातील मजकुराचा आशय काय असावा हे सहज लक्षात येण्याजोगे होते. इस्लामचा प्रसार युरोपच्या कोणत्या भागात कसा झाला आणि तो कोठे थांबला हे हमीद दलवाईंनी लिहिले आहे. त्यापुढील पाने हरवली आहेत आणि नंतर एकदम, 'औरंगजेबाचा अस्त होईपर्यंत (इ. स. १७०७) भारतात अव्याहत मुसलमानांची सत्ता अस्तित्वात होती.' अशी सुरुवात झाली आहे. त्यावरून हमीद दलवाई यांनी भारतात मुसलमानी आक्रमण प्रथम केव्हा झाले तेव्हापासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांची माहिती या भागात दिली असावी हे स्पष्ट होते. या घटनांचा केवळ वस्तुनिष्ठ उल्लेख करणारी दोन पाने कंसात टाकली तर वाचकाला ती उपयुक्त वाटतील याबद्दल आम्हा चौघांचे एकमत

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/३