Jump to content

पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काशीकर यांनी एक कल्पना काढली. एक दिवस सुट्टीचा समजून त्या दिवशी चूल बंद. त्या दिवशी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सर्वांनी सहकुटुंब वनभोजनासाठी जायचे. त्या दिवशी जी चर्चा होईल ती प्रामुख्याने महिलांना रुची वाटेल अशाच प्रश्नांवर व्हावी. तेही घडून गेले. पुढे सरोज वहिनी या प्रभा राव यांचा पराभव करून विधानसभेत निवडून आल्या. एवढेच नव्हे, तर अध्यक्षांच्या तालिकेतही त्यांचे मानाचे स्थान होते. आजपर्यंत अनेक वेळा मी त्यांच्यावर संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकांच्या समालोचनाचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि ती त्यांनी नेहमीच उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.
 चांदवडच्या अधिवेशनाच्या खूप आधी घडलेली आणखी एक घटना. सुरुवातीला अगदी तरुण कार्यकर्ते संघटनेत आले, यथावकाश त्यांची लग्ने होऊ लागली. अशाच एका कार्यकर्त्याच्या पत्नीने मला एक पत्रवजा विनंती केली, माझे पती स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते संघटनेचे काम करतात. हे काम चांगले आहे. याचा मलाही अभिमान आहे. पण या कामात माझे नेमके स्थान कोणते हे मला अजून समजलेले नाही. दिवसांमागून दिवस हे घराबाहेर राहतात आणि घरी आल्यावर आपल्यासंबंधीच्या अनेक आठवणी सांगतात. आणि माझी स्थिती समोरून पंचपक्वान्नांचे ताट जाऊन स्वतः उपाशी राहणाऱ्या प्राण्यासारखी होते. या विनंतीचा शेवट तिने मोठ्या धमकीने केला होता. तुम्ही जर का या प्रश्नाला योग्य उत्तर शोधले नाही तर मी या जगात फार दिवस राहू शकणार नाही, इतका माझ्या जिवाचा कोंडमारा होत आहे.'

 शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दुःखे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दुःखे व समस्या समजून घेण्याचे ठरवले. मराठवाड्यातील हळीहंडरगुळी येथील पहिल्याच बैठकीत अनेक प्रयत्न करूनही स्त्रियांना बोलते करण्याची कल्पना काही प्रत्यक्षात येईना. याच बैठकीत एक मधली सुटी घेऊन मी महिलांना भजन किंवा अभंग म्हणण्याची सूचना केली. त्यांनी ती चढाओढीने अमलात आणली. त्यानंतर महिला अहमहमिकेने चर्चेमध्ये भाग घेऊ लागल्या. ही परंपरा पुढे अनेक वर्षे टिकली. त्या वेळी माझ्यासोबत 'योद्धा शेतकरी'चे लेखक विजय परुळकर आणि त्यांच्या पत्नी सरोजा याही होत्या. विजय परुळकरांनी, सुरुवातीला बुजून गप्प बसलेल्या महिलांचा चर्चेत भाग घेण्याचा उत्साह पाहून मला एक चिठ्ठी लिहिली. मी स्वतःला Communication expert

राखेखालचे निखारे / १८