पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ब्रिटिशांची विख्यात भेदनीति

रुपयांच्या मालमत्तेची व्यवस्था पंचांमार्फत होऊन लोकोपयोगी कार्यास सहाय्य झाले असते ते होऊ नये म्हणून ! स्थानिक अडचणी ठाऊक नसतांना यासंबंधी ढवळाढवळ करण्याविना त्यांचे काय अडले होते ?"

 अल्लीबंधूंना हा आजोळचा अहेर मिळाल्यामुळे विषयान्तर करण्यासाठी, ‘इराकांतील जनतेचे अंतिम साध्य काय आहे ?' हा प्रश्न मी विचारला. 'निर्भेळ स्वातंत्र्य ' हे उत्तर तत्काळ मिळाले आणि नंतर येथील निवडणूक, लोकमतनिदर्शन, मॅंंडेटरी सत्तेचे विरोधी प्रयत्न इत्यादिकांची माहिती सांगून इराकी 'विठ्ठलभाई ' हिंदी मुसलमानांकडे वळले. "ब्रिटिश राजनीतीचे 'भेद' हे तत्त्व आहे. तुमच्या हिंदुस्थानांत हिंदु व मुसलमान असा भेद पाडून तुम्ही स्वराज्याला योग्य नाही असे ते सिद्ध करीत आहेत; आणि वेडे अविचारी मुसलमान त्या भेदनीतीला बळी पडतात ! हिंदु-मुसलमान हा भेद विसरून एकाच राष्ट्रांतील घटक म्हणून सर्वजणांनी एकी केली तरच तुमचा तरणोपाय आहे. तुमच्याकडे प्रकार आहे तसाच आमच्याकडेही प्रयोग झाला ! येथे शिया व सुनी असे पंथ आहेत. त्यांचा फायदा घेऊन एकमेकांत वैमनस्य वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे भांडण सुरू झाल्यावर मग स्वातंत्र्याला आम्ही नालायक ठरावयाचेच! या सर्व प्रकारांना कोणीही बळी पडू नये. हिंदुस्थान स्वतंत्र व्हावे अशी आमची इच्छा फार आहे. कारण ब्रिटिशांचा साम्राज्यवादाचा मुख्य आधार तोच देश आहे. तुम्ही स्वतंत्र झालां म्हणजे आमच्या लढ्यांत आम्हांला जोर येईल. तुमच्याकडे आमचे डोळे लागले आहेत ते यासाठीच. पण तुम्ही आपसांतील तंटे मिटविल्याविना तुम्हांला स्वराज्य मिळणार नाही ही खात्री ठेवा."

७३