Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिए शिरखुर्मा भी नहीं बनाया. आपा अपने घरमें कुछ नहीं करती.' अशा रीतीने सुद्धा त्या बायका माझी वाट बघतात.
 आम्ही मंडळाचं काम करतो म्हणून त्यांना काही आम्ही असं सांगत नाही की नमाज पढू नका, रोजे ठेवू नका, देवाची प्रार्थना करू नका ! का, तर आम्ही काय करतो? धर्माचे दोन भाग करतो. एक इबादतचा. यात या सगळ्या गोष्टी येतात; ज्या, मला वाटतं की पर्सनल आहेत. आपल्याला दुसऱ्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आणि मला सुद्धा कोणाला विचारण्याचा अधिकार नाही की मी नमाज पढते का नाही! हा माझा प्रश्न आहे. तो तुमचा प्रश्न. पण दुसरी बाजू आहे आदतची. समाजाबरोबर जायचं असेल तर ती बदलायची का नाही बदलायची? बरं, एक गोष्ट आणखी आहे, हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, ते धर्माच्या विरुद्ध आहे असं म्हणून कसं चालेल? एखादी गोष्ट जर मुसलमानांच्या धर्माच्या कल्पनेत बसत नसेल, म्हणजे विरुद्ध जात असेल तर मग ती हाती घ्यायची की नाही घ्यायची? आणि जर ते बायकांवर अन्याय करणारं असेल तर धर्माला बाजूला ठेवायचं की नाही ठेवायचं? मला वाटतं, धर्म हे क्षेत्र आमचं नाहीये. मुल्ला मौलवींचं आहे. पंडितांचं आहे. तर त्यांनी त्याबद्दल बोलावं. त्यांना त्याच्यात काय करायचं आहे ते ठरवावं त्यांनी. पण लोकांना प्रेशराईज करू नये. त्यांच्यावर लादू नये. त्यांनी धर्माच्या नावावर अन्याय करू नये. धर्माच्या नावावर आम्हांला न्याय सुद्धा नको, का तर धर्माच्या मध्ये एकदा का आपण शिरलो तर इतकं खोलवर जाऊ! जसं चिखलात आपण रुतलो तर निघणं कठीण होईल तसं होणार. म्हणून धर्म आपलं क्षेत्र नाही. त्याची बेअदबी जर करायची नसेल तर धर्म बाजूला ठेवावा नि आपण सामाजिक न्याय मागावा. किंवा आपल्या घटनेत जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते का आपल्याला मिळू नयेत? आपण भारतीय आहोत की नाही? मग आपल्या धर्माच्या आधारावरच आपल्याला न्याय मागायची काय गरज आहे?

 ६ डिसेंबर १९९२ ला आणि नंतर जानेवारीमध्ये जी दंगल झाली आणि जे बाँबस्फोट झाले, त्या वेळी मी मिरजोळीस, माझ्या सासरी गेले होते. तिथे माझ्या मोठ्या नणंदेच्या मुलीचं लग्न सकाळी १० वाजता होतं. तऱ्हेतऱ्हेच्या बातम्या येत होत्या. हे सर्व ऐकून ताबडतोब मुंबईला जावं, तेथील लोकांची बातमी घ्यावी, असं फार वाटत होतं. अशा वेळी आपलं तिथे असणं जरुरीचं आहे. आणि तोंड लपवून बसणं काही खरं नाही. पण एस.टी. बंद. येण्याजाण्याचं काही साधन नसल्यामुळे

१८८ : मी भरून पावले आहे