Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





भक्ती, युक्ती, शक्ती आणि तीन वर्षांत मुक्ती


 कांदा आणि उसाचे आंदोलन होऊन पुष्कळ दिवस होऊन गेले, तुम्हा सर्वांची आणि माझी भेट अशी नाही. शेवटची जी भेट झाली ती 'शेतकरी आंदोलनाचा विजय झाला आहे' अशा वातावरणात झाली. उसाला टनाला ८०० रुपये भाव हातात पडला आहे, कांद्याची खरेदी ६० ते ७५ रुपये प्रतिक्विटलच्या भावाने सुरू झाली आहे, अशा परिस्थितीत आपण शेवटचे भेटलो होतो आणि पहिल्यांदाच शेतकरी आंदोलन उभे राहिले ते विजय घेऊनच या आनंदाच्या भरात आपण शेतकरी परत औत धरायला गेलो.
 पण, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळविण्याचा हा लढा इतका सोपा नाही. एका वर्षात ४० ते ५० हजार किंवा दोनदोन लाख माणसे रस्त्यावर बसून हा प्रश्न सुटला असता तर तो इतकी शेकडो वर्षे रेंगाळत राहिला नसता. हा प्रश्न त्याहून कठीण आहे याची जाणीव मला होती, तुम्हाला होती. पिंपळगावच्या शेवटच्या मेळाव्यात मी आपल्याला एक धोक्याचा इशारा दिला होता, माधवराव खंडेरावांनीही तुम्हाला सांगितले होते की, 'एक वेळेस आपण या शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाला हातच घातला नसता तरी चालले असते. आपले आजोबा अशाच दारिद्र्यात मेले, वडीलही तसेच खपले, आपणही तसेच खपून गेलो असतो. पण -
 पण आता आपण या सापाला हात लावलाय. सापाला हात लावून आणि तसाच सोडून दिला तर तो येऊन आपला सूड उगवल्याशिवाय राहणार नाही.'

 आणि जी परिस्थिती तुमच्यापुढे सांगायला मी उभा राहिलो आहे ती नेमकी हीच आहे की हा दुखवून पळालेला साप परत आला आहे. त्यावर काय करायचे आहे ते आपण इथे सगळ्यांनी एकत्र बसून ठरवायचे आहे. माझे काम एवढेच आहे, की शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत जी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे ती तुम्हाला समजावून सांगणे; एवढेच नव्हे तर, या परिस्थितीवर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७