होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मार्क्सवादी म्हणवली गेलेली क्रांती झाली रशियामध्ये आणि तीही काही, कामगारांनी उठून केली असं नाही. पहिल्या महायुद्धात रशियाला माघार घ्यावी लागली, पगारसुद्धा दिले न गेल्याने रशियन सैन्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली असे पगारसुद्धा न मिळालेले सैनिक जेव्हा मॉस्कोमध्ये आले तेव्हा त्यांनी केलेल्या उठावातून तथाकथित मार्क्सवादी क्रांतीचा उगम झाला. सन् यत् सेन नंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने अनेक वर्षे क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा जपानने चीनवर हल्ला केला त्यावेळी सगळी कम्युनिस्ट चळवळ थांबवून माओत्सेतुंगने राष्ट्रीय मध्यप्रवाहाबरोबर राहून जपान्यांविरुद्ध लढण्याची भूमिका घेतली. जपान्यांनी केलेल्या या हल्ल्यातून चिनी क्रांतीचा पाया घातला गेला.
क्रांती ही काही सरळ येत नाही. ती आकाशातून पडणाऱ्या विजेसारखी लवलवत वेड्यावाकड्या मार्गाने येत असते. आज देशामध्ये काश्मीरमध्ये काय घडते आहे, पंजाबमध्ये काय होते आहे याची आपल्याला विवंचना लागलेली आहे; देशातल्या देशात जातीजातींमध्ये जी काही भांडणं लागली आहेत त्यामुळे देश फुटतो का तुटतो अशी चिंता लागून राहिली आहे. अशा या अत्यंत निराशेच्या क्षणी एक शक्यता आहे, की शेतकरीक्रांतीची सगळ्यात मोठी संधी आपल्यापुढे येईल. ही संधी कोणत्या मार्गाने येईल, आजच्या या उत्पातांतून येईल की आणखी काही दुसरे उत्पात आपल्याला सहन करावे लागतील. कितीवेळा निराशा सहन करावी लागेल आणि किती वेळा अडचणींतून मार्ग काढून पुढे जावे लागेल हे काही सांगता येणार नाही.
पण जेव्हा उत्पादकांकडून त्यांनी तयार केलेल्या बचती हिरावून घेतल्या जाणार नाहीत आणि निसर्गामधला विकासाचा जो काही क्रम आहे तो उलटवला न जाता त्या निसर्गक्रमाप्रमाणे माणसाला माणूस म्हणून जगता येईल तेव्हाच इतिहासामध्ये जीवनशास्त्रीय उत्क्रांतीचा आणि सामाजिक उत्क्रांतीचा थोपवला गेलेला प्रवाह पुन्हा मोकळेपणाने चालू होईल. या कामात आपला सगळ्यांचा हातभार लागलेला असेल आणि हा प्रवाह मोकळा होईल तेव्हा आपण सगळे कार्यकर्ते हजर असू अशी आशा करूया.
(कृषी अर्थप्रबोधिनी प्रशिक्षण शिबीर ३ सप्टेंबर १९९०)
(शेतकरी संघटक २१ सप्टेंबर १९९०)
◼◼